Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  विशेष लेख  >>  बातम्या

मोदी सरकार गोरक्षकांना रोखेल का?
vasudeo kulkarni
Monday, July 17, 2017 AT 11:34 AM (IST)
Tags: vi1
गोरक्षकांचा हिंसाचार म्हणजेच गोमांस खाण्यावरून एखाद्याला ठार मारणे. हा प्रकार भारतात एक नव्याने समस्या म्हणून पुढे आला आहे. हा प्रकार संपुष्टात आणण्यासाठी काय करता येईल? जेव्हा हरियाणा व महाराष्ट्रात भाजपचे सरकार आले आणि त्यांनी गोमांसावर बंदी घातली, त्यानंतर गोमांस खाण्याच्या मुद्द्यावरून हत्येचे प्रकार वाढू लागले आहेत. गेल्या काही आठवड्यांतच हा हिंसाचार भारतभर कसा वाढतो आहे, याची काही उदाहरणे आहेत.
झारखंड राज्यातील रांचीजवळील रामबाग येथे 29 जून रोजी हैमुद्दीन हन्सारी या व्यापार्‍याला ठेचून ठार मारण्यात आले. त्या अगोदर झारखंडमध्येच 27 जूनला उस्मान अन्सारी या दुधाचा व्यवसाय करणार्‍या शेतकर्‍याला शंभर जणांच्या जमावाने मिळून मारहाण केली. त्याच्या घराला या जमावाने आगही लावली. त्या आगीत अन्सारीच्या घराचा काही भाग भस्मसात झाला. अन्सारीवर हल्ला करण्यामागचे कारण असे की, त्याच्या घराजवळ मेलेली गाय सापडली.
पश्‍चिम बंगालमध्ये 24 जून रोजी नसीरुद्दीन हक, मोहंमद समीरुद्दीन, मोहंमद नसीद या तीन बांधकाम मजुरांना मरेपर्यंत मारण्यात आले. त्यांच्यावर गाय चोरल्याचा आरोप होता. या घटनेनंतर पोलिसांनी तिघा जणांना अटक करून त्यांच्यावर खुनाचा आरोप ठेवला.
22 जूनला हरियाणामध्ये जुनैद खान या 15 वर्षांच्या मुलाला रेल्वे डब्यात एका टोळक्याने ठार मारले. या टोळक्याने जुनैद हा गोमांस खात असल्याचा कांगावा केला व त्याला भोसकले. नंतर त्याच्या कवटीचा भाग तोडण्यात आला. या मारामारीत जुनैदचा भाऊदेखील गंभीर जखमी झाला. ज्यांनी हे दृश्य पाहिले ते सांगतात की, सुमारे 20 जणांचे टोळके जुनैदवर हल्ला करण्यासाठी
सरसावले होते. या प्रकरणात हरियाणा पोलिसांनी केवळ एका जणाला अटक केली.
30 एप्रिलला आसाममधील नागाव येथे जमावाने अबू अलिफा आणि रेमुद्दीन अली या दोन मुस्लिमांना ठेचून मारले. त्यांच्यावर तथाकथित गोरक्षकांचा गाय चोरल्याचा संशय होता. पोलिसांनी या गोरक्षकांवर खुनाचा आरोप दाखल केला आहे. पण कोणालाच अटक केलेली नाही.
27 जूनच्या झारखंडमधील घटनेनंतर अनेक नागरिकांनी देशभर या गोरक्षकांच्या केलेल्या हत्येच्या विरोधात सरकारविरुद्ध निदर्शने केली. आणि हे सारे थांबवायला पाहिजे असे सांगितले. काही दिवसांनी मोदी यांनी ट्विट केले, की ‘हिंसाचाराला भारतात स्थान नाही. आपण असा भारत बनवूया ज्याचा गांधीजींना अभिमान वाटेल.’ या ट्विटला जोडून दोन मिनिटे आणि सोळा सेकंदांची भाषणाची फीत आहे. 29 रोजी गुजरातमध्ये दिलेले भाषण आहे.
जोपर्यंत हे सरकार गोमांसाचा मुद्दा रेटत राहील तोपर्यंत भारतात गोरक्षक तयार होत राहतील. दुसरा प्रश्‍न हा आहे की, मोदी आणि भाजपवाले हे स्वीकारतच नाहीत की, या सार्‍या घटनांमागे धर्मांधतेचा पाया आहे. गोमांस खाणे, गोमांस विक्री आणि कातडे कमावणे या गोष्टी मुस्लीम आणि दलितांच्या व्यवसायाचा भाग आहेत. त्यात आता गोरक्षणामुळे हे दोन्ही समाज हिंसेचे बळी ठरतील, अशी परिस्थिती नाकारणे म्हणजेच दांभिकपणा होईल.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: