Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

भारतीय महिलांसमोर बलाढ्य ऑस्ट्रेलियाचे आव्हान
ऐक्य समूह
Thursday, July 20, 2017 AT 11:25 AM (IST)
Tags: sp1
5लंडन, दि. 19 (वृत्तसंस्था) :
यंदाच्या महिला विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करणार्‍या मिताली राजच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघासमोर उपांत्य फेरीच्या दुसर्‍या सामन्यात उद्या सहा वेळच्या जगज्जेत्या बलाढ्य ऑस्ट्रेलियन महिलांचे आव्हान आहे. या  स्पर्धेत सलग चार सामने जिंकून दमदार वाटचाल करणार्‍या भारतीय महिलांसमोर उद्याचा सामना म्हणजे एखाद्या पर्वतशिखरावर चढाई करण्यासारखा आहे.
मिताली राजच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघांनी यंदाच्या विश्‍वचषक स्पर्धेत सातपैकी पाच सामने जिंकून उपांत्य फेरी गाठली आहे. स्पर्धेच्या प्रारंभीच यजमान इंग्लंडच्या बलाढ्य संघाला 35 धावांनी धूळ चारून भारतीय संघाने विजयी सलामी दिली होती. त्यानंतर सलग तीन सामने जिंकून भारतीय महिलांनी स्पर्धेत खळबळ उडवून दिली होती. मात्र, दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघासमोर भारतीय महिलांनी सपशेल शरणागती पत्करली. दक्षिण आफ्रिकेने हा सामना 115 धावांनी जिंकला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या बलाढ्य संघानेही भारताचा धुव्वा उडवत आठ गडी राखून विजय मिळवला होता. त्यामुळे भारतीय महिला संघ उपांत्य फेरी गाठणार का, असा प्रश्‍न उपस्थित होत होता. त्याला भारतीय महिलांनी आपल्या कामगिरीने चोख उत्तर दिले. साखळी सामन्यातील शेवटची लढत भारतीय महिलांसाठी उपांत्यपूर्व फेरीसारखीच होती. मात्र, भारतीय महिलांनी न्यूझीलंडची धूळधाण उडवत दिमाखात उपांत्य फेरी गाठली आहे.
या संपूर्ण वाटचालीत भारतीय संघाची भिस्त कोणा एका खेळाडूवर राहिलेली नाही. भारताची कामगिरी सांघिक राहिली आहे. मितालीने जवळपास प्रत्येक सामन्यात कर्णधारपदाच्या लौकिकाला जागत दमदार खेळी केली आहे. उर्वरित खेळाडूंपैकी प्रत्येकीने कोणत्या
ना कोणत्या सामन्यात चांगले योगदान दिले आहे. इंग्लंडविरुद्ध स्मृती मानधना, पूनम
राऊत व मिताली राज यांनी अर्धशतके फटकावली होती. गोलंदाजांनीही अचूक मारा करत संघाला विजयी सलामी मिळवून दिली होती. त्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्ध स्मृती मानधनाने तडाखेबंद शतक झळकवले होते.
त्या सामन्यात दीप्ती शर्मा, पूनम यादव, हरमनप्रीत कौर व एकता बिश्त या सर्वच गोलंदाजांनी बळी मिळवत भारताचा विजय सुकर केला होता.
श्रीलंकेविरुद्ध दीप्ती शर्मा व मिताली राज यांनी अर्धशतके फटकावली होती तर झूलन गोस्वामी व पूनम राऊत यांनी भेदक गोलंदाजी करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात एकता बिश्त ही विजयाची शिल्पकार ठरली होती. पूनम राऊतने 47 धावांची झुंजार खेळी करूनही भारतीय महिलांना केवळ 170 धावा करता आल्या होत्या. मात्र, एकता बिश्तने केवळ 18 धावांत 5 बळी घेऊन भारताला विजय मिळवून दिला होता. सलग चार विजय मिळवून भारतीय महिलांनी आपला दबदबा निर्माण केला. मात्र, दक्षिण आफ्रिकेने तब्बल 115 धावांनी विजय मिळवून भारतीय महिलांना  स्पर्धेतील पहिल्या पराभवाची चव चाखायला लावली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियन महिलांनीही भारतावर 8 गडी राखून दणदणीत विजय मिळवला होता. या सामन्यात मात्र पूनम राऊतचे शतक आणि मितालीचे अर्धशतक
व्यर्थ ठरले होते. त्यामुळे भारतीय महिला उपांत्य फेरी गाठणार का, असा प्रश्‍न उपस्थित झाला होता. मात्र, भारतीय महिलांनी पुढच्याच सामन्यात जोरदार उसळी घेत न्यूझीलंडच्या बलाढ्य संघाचा अवघ्या 80 धावांत खुर्दा उडवला होता. मिताली राजने पुन्हा
एकदा कर्णधाराला साजेशी फलंदाजी करत शतकी खेळी साकारली होती. हरमनप्रीतचे संयमी शतक आणि वेदा कृष्णमूर्तीच्या
धुवाँधार अर्धशतकी खेळीनंतर डावखुरी फिरकीपटू राजेश्‍वरी गायकवाडने न्यूझीलंडचे पाच बळी घेतले होते.
आता भारतीय महिलांचा मुकाबला पुन्हा ऑसी महिलांशी होत आहे. या दोन संघांमध्ये आतापर्यंत झालेल्या 42 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतीय महिलांना केवळ 8 विजय मिळवता आले आहेत. ऑस्ट्रेलियन संघाने तब्बल 34 विजय मिळवून भारतावरील वर्चस्व कायम राखले आहे. मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघ बलाढ्य असून या संघाने सहा वेळा विश्‍वचषक जिंकण्याचा भीमपराक्रम केला आहे. लॅनिंगच्या अनुपस्थितीतही ऑस्ट्रेलियन संघाने दक्षिण आफ्रिकेचा 59 धावांनी पराभव करून उपांत्य फेरी गाठली आहे. या स्पर्धेत लॅनिंगने सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्यामुळे भारतीय महिलांपुढील आव्हान कठीण आहे. उद्याच्या सामन्यात भारताला प्रथम फलंदाजीची
संधी मिळाल्यास मोठी धावसंख्या उभारावी लागेल. त्यासाठी स्मृती मानधना व पूनम
राऊत यांच्याकडून मोठ्या सलामीची अपेक्षा आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यांचा अपवाद वगळता मानधना
इतर सामन्यांमध्ये अपयशी ठरली आहे.
मात्र, उपांत्य फेरीच्या सामन्याआधी मिळालेल्या पाच दिवसांच्या विश्रांतीचा तिला आपले डावपेच ठरवण्यासाठी फायदा झाला
असेल. उद्याच्या सामन्यात नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय
घेईल, यात शंका नाही.  ऑस्ट्रेलियन संघ बलाढ्य असला तरी अभेद्य नाही.
त्यामुळे भारतीय महिलांच्या विजयाची
अपेक्षा आहे, असे मत भारताची माजी कर्णधार अंजुम चोप्राने व्यक्त केले आहे. या
सामन्यात भारतीय महिलांच्या मानसिकतेची कसोटी लागेल.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: