Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  स्तंभ लेख  >>  बातम्या

ते ’अदृश्य हात’ कोणते?
ऐक्य समूह
Monday, July 24, 2017 AT 11:41 AM (IST)
Tags: st1
  आपल्या पाठिंब्यावरच राज्यातले सरकार सत्तेवर असल्याचा दावा सातत्याने करणार्‍या शिवसेनेला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी कोविंद यांना विरोधी पक्षांच्या काही आमदारांनी मतदान केल्याचा संदर्भ देत, सरकारला मदत करणारे अदृश्य हात आहेत, असा इशारा दिल्याने नवा संशयकल्लोळ सुरू झाला आहे. 
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवार दिनांक 24 जुलै (आज) पासून सुरु होत आहे. सर्वसाधारणतः अधिवेशन म्हटले, की सरकारच्या पोटात गोळा येतो. सरकारकडे मजबूत संख्याबळ असले तरी आणि विरोधक फारसे त्रासदायक नसले तरी अधिवेशनात अनेक प्रश्‍नांना उत्तरे द्यावी लागतात. विरोधकांना व्यासपीठ मिळते. अनेकदा घरचे आहेर स्वीकारावे लागतात. त्यामुळे अधिवेशन शक्य तेवढ्या लवकर गुंडाळण्याकडे सरकारचा कल असतो. विद्यमान फडणवीस सरकार त्याला अपवाद असण्याचे काही कारण नाही. सत्ताधारी पक्षाकडे मजबूत बहुमत असले तरी शिवसेनेसारख्या मित्रापेक्षा राष्ट्रवादीसारखा शत्रू परवडला असेच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना वाटत असेल, तर आश्‍चर्य वाटू नये. परंतु पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर सरकारला दिलासा देणार्‍या घटना घडत असल्याने सत्ताधारी सुखावले असतील. नुकत्याच झालेल्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत भाजप उमेदवार रामनाथ कोविंद यांना तब्बल दोनशे आठ मते मिळाली. तर काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीला केवळ 77 मते मिळाली. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांची तब्बल बारा मते या निवडणुकीत फुटली. भाजप-शिवसेनेचे मिळून 185 आमदार असताना कोविंद यांना 208 म्हणजे 23 मते अधिक मिळाली. कुंपणावरच्या 11 मतांचे दान कोविंद यांच्या पारड्यात पडले. यामुळे शिवसेनेचे 63 वगळून आमच्याकडे 145 आमदारांचे पाठबळ असल्याकडे लक्ष वेधून भाजपने सेनेला सूचक इशारा देण्याचा प्रयत्न केला. फुटलेल्या मतावरून विरोधकांमध्ये अधिवेशनाच्या तोंडावर ‘ब्लेम गेम’ सुरू झालेला असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, आपल्या सरकारला कोणताही धोका नाही. सरकार टिकावे यासाठी अनेक अदृश्य हात मदत करत आहेत’, असे सूचक विधान करून संशय कल्लोळ निर्माण केला आहे. सरकारला मदत करणारे हे अदृश्य हात कोणते याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या पार्श्‍वभूमीवर अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षात फूट पडली. विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या बंगल्यावर प्रथेप्रमाणे होणार्‍या विरोधकांच्या बैठकीवर राष्ट्रवादीने बहिष्कार घातला. अनेक अडचणीचे विषय असताना विरोधी पक्षात दुफळी पडल्यामुळे सरकारचा मार्ग सुकर झाला आहे. त्यामुळे ‘अदृश्य हात’ कामाला लागल्याची चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार असे भाकीत शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी केले होते. या संभाव्य भूकंपाची शक्यता लक्षात घेऊन भाजपने भूकंप व्यवस्थापनात तज्ञ असलेल्या अदृश्य मित्राच्या मदतीने ‘आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा’ कार्यरत केलेली दिसत आहे. त्यामुळे नजीकच्या काळात काही नाट्यमय घटना घडताना दिसल्या तर फार आश्‍चर्य वाटायला नको. काँग्रेस आणि शिवसेनेने पुढील काळात थोडे जपून
राहावे, त्यांच्या कुंडलीत गळतीचा योग असल्याचे भाकीत काही राजज्योतिषी खाजगीत व्यक्त करत आहेत.
महाराष्ट्रातील वाघेला कोण?
गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांनी मागच्या आठवड्यात काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. वाघेला यांनी काँग्रेसला रामराम ठोकला असला तरी अद्याप भाजपत प्रवेश केलेला नाही. भविष्यात कुठे जाणार याबाबत त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली नसली तरी ते जे काय करतील त्याचा अप्रत्यक्ष फायदा भाजपला
होणार आहे. गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रात काँग्रेसला धक्का बसेल अशी सूचक वक्तव्ये भाजपचे नेते करत आहेत. मध्यंतरी माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते नारायण राणे भाजपत जाणार अशी चर्चा होती. त्यांनी अहमदाबादला जाऊन भाजप अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतल्याचेही पुढे आले होते. परंतु राणे यांना पक्षात घेण्यास विरोध असलेल्या एका भाजपच्याच नेत्याने ही बातमी
फोडून त्यांच्या मार्गात कोलदांडा घातल्याची चर्चा आहे. राणे अजून काँग्रेसमध्येच असले तरी त्यांच्या
भाजप प्रवेशाची चर्चा बँड झालेली नाही. मुंबई-गोवा महामार्गाच्या भूमिपूजनाच्या वेळी राणे आणि भाजप सरकारची व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाची केलेली प्रशंसा चर्चेचा विषय झाली आहे. पण सरकारचे गुणगौरव गाणारे ते एकटेच नेते नाहीत. विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून काम करणारे राधाकृष्ण विखे-पाटील हे सुद्धा त्यांचे प्रशंसक आहेत. दोन आठवड्यापूर्वी त्यांनी मागच्या सरकारपेक्षा हे सरकार अधिक चांगले असल्याचे प्रमाणपत्र दिले. त्यामुळेही अनेकांच्या भुवया उंचावल्या. नेत्यांच्या अशा निसरड्या भूमिकांमुळे सरकारशी दोन हात करण्याची तयारी असलेल्या कार्यकर्त्यांचा अवसानघात होतो अशी टीका होत आहे. स्वाभाविकच विरोधकांमधील हा गोंधळ सरकारच्या पथ्यावर पडत आहे.
प्रश्‍न पण मांडले जातील का ?
अर्थसंकल्पीय अधिवेशन शेतकरी कर्जमाफीच्या मागणीमुळे गाजले होते. गदारोळ, आमदारांचे निलंबन, त्यानंतरची संघर्ष यात्रा यातच अधिवेशन संपले होते. अधिवेशनानंतर कर्जमाफीचा संघर्ष रस्त्यावर आला. पुणतांब्याच्या शेतकर्‍यांनी कर्जमाफीसाठी सुरू केलेल्या अधिवेशनाचे लोण राज्यभर पसरले. आंदोलनाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे सरकारचे धाबे दणाणले. गेली पावणेतीन वर्ष कर्जमाफीसाठी ‘योग्य वेळेची’ वाट बघणार्‍या सरकारला कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागला. शेतकर्‍यांचे 34 हजार कोटींचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली. परंतु सरसकट कर्जमाफीला दिलेला नकार आणि कर्जमाफीसाठी घातलेल्या अटींमुळे वादंग अजूनही सुरूच आहे. नेमक्या किती शेतकार्‍यांना या निर्णयाचा लाभ होणार हे अजून गुलदस्त्यात आहे. मुख्यमंत्र्यांनी यादी जाहीर करून विरोधकांची तोंडं बंद करण्याचा प्रयत्न केला. पण यात मुंबईतले ‘शेतकरी’ आल्याने तोंड दुःखेपर्यंत स्पष्टीकरण द्यावे लागले. त्यामुळे या अधिवेशनात सरकारची प्रश्‍नांना उत्तरे देताना दमछाक होऊ शकते. पण हे प्रश्‍न विचारणार आणि लावून धरणार कोण हा प्रश्‍न आहे. देशभरात जीएसटी करप्रणाली लागू करण्यात आली आहे. याचे परिणाम दिसायला लागले आहेत. राज्याच्या महसुलात यामुळे होणारी घट केंद्राकडून मिळणार्‍या नुकसानभरपाईपेक्षा मोठी असेल. त्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या अर्थव्यवस्थेवरील ताण वाढणार आहे. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाविरुद्ध वाढत चाललेले आंदोलन, नेवाळी आंदोलन, एसआरए घोटाळा, मंजुळा शेट्ये मृत्यू प्रकरण असे अनेक विषय विरोधकांकडे आहेत. परंतु काँग्रेस-राष्ट्रवादीत पडलेली फूट, काँग्रेस नेत्यांमाधील गोंधळ याचा विचार करता हे विषय प्रभावीपणे मांडले जातील की नाही याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
गाण्याचा धसका !
‘सोनू तुझा माझ्यावर भरवसा नाय का? या गाण्याने सध्या सगळीकडे धुमाकूळ घातला आहे. त्याच चालीवर प्रसिद्ध रेडिओ जॉकी मलिष्का हिने मुंबई तुझा भरवसा नाय का? हे गाणे तयार करून त्याचा व्हिडिओ पोस्ट केला व तो खूप लोकप्रियही झाला. त्यात मुंबईच्या रस्त्यावरील खड्डे, त्यातील झोल याची खिल्ली उडवण्यात आली होती. खरेतर ही टीका जिव्हारी लागण्याएवढी जहरी नव्हती. किरीट सोमय्या, आशिष शेलार या भाजप नेत्यांनी निवडणुकीच्या काळात केलेल्या टीकेच्या तुलनेत तर अगदीच किरकोळ प्रकार होता. पण ही टीका शिवसेनेला चांगलीच झोबली. दुसर्‍या दिवशी महापालिकेचे अधिकारी मलिष्काच्या घरी गेले. तेथे मनिप्लान्टच्या पाण्यात त्यांना लगेच डेंग्यूच्या आळ्या सापडल्या व त्यांनी कारवाई केली. मलिष्कावर अब्रू नुकसानीचा खटला भरण्याची मागणी मनपा आयुक्तांकडे केली. याची अत्यंत तिखट प्रतिक्रिया उमटून शिवसेनेला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले.
मुंबईत साथीच्या रोगाने थैमान घातले आहे. गेल्या दोन महिन्यात डेंग्यू, मलेरिया आणि स्वाइन फ्लू ने पन्नासहून अधिक लोकांचा बळी घेतला आहे. सततच्या पावसाने रस्त्यांची चाळण झालीय. त्याबाबत काही करण्याऐवजी मलिष्का-च्या गाण्यावर तातडीने कारवाई करणार्‍या शिवसेना नेत्यांची कीव करावी तेवढी थोडीच आहे. लोकाभिमुख काम केले तर टीकेने किंवा आरोपामुळे फारसा फरक पडत नाही हे किमान मागची निवडणूक जिंकल्यावर तरी शिवसेना नेत्यांच्या लक्षात यायला हवे होते. पण तो कौल देणार्‍या सरकारवर शिवसेनेचा भरवसा उरलेला दिसत नाही.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: