Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  लोलक  >>  बातम्या

विश्‍वचषक हुकला, पण...
vasudeo kulkarni
Tuesday, July 25, 2017 AT 11:28 AM (IST)
Tags: lolak1
इंग्लंडच्या लॉर्डस् मैदानावर महिला क्रिकेट विश्‍वकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंग्लंडच्या संघाशी, भारतीय महिला क्रिकेट संघाने चिवट झुंज देवूनही, अवघ्या 9 धावांनी इंग्लंडच्या संघाचा विजय झाला आणि भारतीय संघाचे विश्‍वचषक जिंकायचे स्वप्न भंगले. या सामन्यात भारतीय संघाचा विजय होईल, अशी क्रिकेट रसिकांची अपेक्षा होती. पण, संघातल्या खेळाडूंनी आक्रमकपणे खेळ विजय मिळवायचा निर्धार करायच्या नादात इंग्लंडच्या संघाची धाव संख्या ओलांडता आली नाही आणि पराभव पत्करावा लागला. या निसटत्या पराभवाने क्रिकेट रसिकांनी हळहळ व्यक्त केली असली, तरी तब्बल 12 वर्षांनी महिला क्रिकेट संघाने विश्‍व चषकाच्या अंतिम सामन्यापर्यंत मारलेली धडक प्रशंसनीय आहे. या आधी महिला क्रिकेट संघाला फारसे महत्त्व देशात दिलेच जात नव्हते. यावेळच्या विश्‍वचषक स्पर्धेतल्या सामन्यांनी मात्र भारतीय महिला क्रिकेट संघ आणि या संघातल्या खेळाडूंबद्दल क्रिकेट रसिकात उत्सुकता निर्माण झाली. या संघाकडे पहायचा दृष्टिकोन बदलला हे ही विशेष होय.
अंतिम सामन्यात मिताली राजच्या नेतृत्वाखालच्या महिला संघातल्या जुलन गोस्वामीच्या वेगवान गोलंदाजीला, फिरकी गोलंदाजांची चांगली साथ मिळाल्याने इंग्लंडच्या संघाची धावसंख्या 227 वर रोखण्यात यश मिळाले. इंग्लंडच्या संघाची कर्णधार हेथर नाईट हिचा अवघ्या 1 धाव असतानाच बळी घेण्यात भारतीय गोलंदाजांना यश मिळाले. इंग्लंडची धाव संख्या ओलांडून विजय मिळवायची जिद्द बाळगणार्‍या भारतीय संघातल्या पूनम राऊत, हरमनप्रीत यांनी चांगली धावसंख्या रचून, विजयाचा मार्ग मोकळा केला होता. पण, भरवशाची फलंदाज मिताली राजला अवघ्या 17 धावांवर बाद व्हावे लागले. तिने पूनम राऊतशी 38 धावांची भागीदारी केली. मितालीने चांगली फलंदाजी केली असती, तर हा अंतिम सामनाही भारतीय संघाला जिंकता आला असता. इंग्लंडच्या श्‍वसबोलने 46 धावात 6 बळी घेऊन आपल्या संघाचा विजयाचा मार्ग खुला केला. 29 धावांसाठी 7 विकेट गमावणार्‍या भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. 2005 मध्ये मिताली राजच्या नेतृत्वाखालीच भारतीय संघाने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. या वेळच्या जागतिक विश्‍वचषक स्पर्धेत जगातली सर्वाधिक म्हणजे 6 हजार धावा करणारी ती पहिली महिला क्रिकेट फलंदाज ठरली आहे. या स्पर्धेत तिच्यासह भारतीय संघातल्या सर्वच महिला खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी केल्याने 1983 मध्ये कपिल देवच्या संघाने इंग्लंडमध्ये जिंकलेल्या विश्‍व चषकाची पुनरावृत्ती होईल, अशी अपेक्षा होती. इंग्लंडच्या संघाने हा चषक चौथ्यांदा जिंकत महिला क्रिकेट विश्‍वात आपला दबदबा कायम ठेवण्यात यश मिळवले.
उपविजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कामगिरीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही प्रशंसा करताना, या संघाचा भारताला अभिमान वाटत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही, भारतीय संघातल्या सर्व खेळाडूंना प्रत्येकी 50 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करून, महिला क्रिकेटला प्रोत्साहन द्यायचा घेतलेला निर्णय, या क्षेत्रातली पुरुष संघाची मक्तेदारी मोडून काढायला उपयुक्त ठरेल. गेली 20-25 वर्षे भारतीय महिला क्रिकेट संघ देश-विदेशात खेळत असला, तरी नियामक मंडळाने या संघाची उपेक्षाच केली. संघातल्या अनेक खेळाडूंना मंडळाने प्रशिक्षण आणि अन्य सुविधाही प्रारंभीच्या काळात उपलब्ध करून दिल्या नव्हत्या. महिला क्रिकेट खेळाडूंना भत्ताही दिला जात नसे. आता मात्र नियामक मंडळाने आपले धोरण बदललेले दिसते. महिला क्रिकेटबाबत नियामक मंडळ आणि देशातले क्रिकेट रसिकही उदासीन असल्यानेच, या संघाची आणि खेळाडूंचीही उपेक्षा झाली होती. निदान यावेळी महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज आणि तिच्या सहकारी खेळाडूंच्या खेळाची चर्चा तरी सुरू झाली. तुझा आवडता क्रिकेट खेळाडू कोण? असा प्रश्‍न राजला पत्रकारांनी केला, तेव्हा भारतीय क्रिकेट संघातल्या खेळाडूंना आणि कर्णधाराला तुमची आवडती महिला क्रिकेट खेळाडू कोण? असा प्रश्‍न का विचारीत नाही? असे उत्तर देत महिला क्रिकेटच्या संघातील खेळाडूबाबत उपेक्षा झाल्याची खंत व्यक्त केली होती. निदान या पुढच्या काळात तरी महिला क्रिकेट खेळाडूंना नियामक मंडळाने अधिक प्रोत्साहन, प्रशिक्षणाची सुविधा द्यावी, अशी अपेक्षा आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: