Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  विशेष लेख  >>  बातम्या

पुन्हा पाथर्डी...
vasudeo kulkarni
Tuesday, July 25, 2017 AT 11:27 AM (IST)
Tags: vi1
अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यातल्या कोपर्डी गावातल्या एका शाळकरी मुलीवर झालेल्या बलात्कार आणि खुनाच्या घटनेमुळेच, महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. बलात्कार्‍यांना फाशी द्यावी, या मागणीसाठी राज्यभरात लाखोंचे मराठा क्रांती मोर्चे निघाले. जनतेच्या या असंतोषाच्या ज्वालामुखी-च्या स्फोटाने, महाराष्ट्रात सामाजिक जागृती आणि महिलांवर अत्याचार करायला कुणी नराधम धजणार नाही, असा सामाजिक दबाव निर्माण झाला.  पण, अद्यापही मानसिक विकृतीने पछाडलेल्या मानवी लांडग्यांना कायदा आणि समाजाचा धाक वाटत नसल्याचे, पाथर्डी तालुक्यातल्याच तिसगाव येथे शाळकरी मुलीवर नुकत्याच झालेल्या बलात्काराच्या घटनेने उघड झाले आहे. या घटनेचे तीव्र पडसाद पाथर्डी तालुक्यात उमटले आणि तिसगाव आणि पाथर्डीत जनतेबरोबरच शाळकरी मुलींनीही रस्ता रोको आंदोलन करून निषेध व्यक्त केला.
तिसगाव जवळच्या मांडवे या गावातल्या दलित कुटुंबातली ही पीडित मुलगी तिसगावच्या प्राथमिक शाळेत सातवीत शिकते. तिचे आई-वडील शेतमजुरी आणि साखर कारखाने सुरू झाल्यावर ऊस तोडणीसाठी जातात. तिची शाळा घरापासून चार किलोमीटर अंतरावर असल्याने ती दररोज शाळेला पायीच ये-जा करीत असे. काही वेळा रस्त्याने जाणार्‍या वाहनधारकांना विनंती करून लिफ्ट मागून शाळेला जात असे. गेल्या शुक्रवारी ती आणि तिची आई वाहनाची वाट पहात थांबलेले असताना एक अनोळखी दुचाकीस्वार थांबला. त्याने या मुलीला शाळेत सोडू असे तिच्या आईला सांगितले. पण, रस्त्याच्या बाजूला दुचाकी नेऊन त्याने शेतात तिच्यावर बलात्कार केला आणि कुणाला, काही सांगू नकोस, अशी धमकी दिली. तिच्यावर बलात्कार केल्यावर त्या दुचाकीस्वाराने तिला पुन्हा दुचाकीवर बसवून तिसगावच्या चौकात सोडून दिले. या अत्याचाराने घाबरलेली ती दुर्दैवी मुलगी चौकत रडत असतानाच गावातल्या लोकांनी तिची विचारपूस केली, तेव्हा तिने तिच्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती दिली. गावातल्या युवकांनी पीडित मुलीला तातडीने अहमदनगरच्या जिल्हा रुग्णा-लयात उपचारासाठी पोहोचवले. घटनास्थळी पोलिसांना येण्यास चार तासांचा उशीर झाल्याने संतप्त झालेल्या जमावाने नगर-पाथर्डी रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन करून, पोलिसांचाही निषेध केला. पोलिसांनी संशयित गुन्हेगाराला तातडीने अटक करायचे आश्‍वासन दिले असले, तरी अद्यापही तो सापडलेला नाही. नगरच्या जिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक रजेवर असल्याने, त्यांचा पदभार नेमका कुणाकडे आहे, याची माहिती घेण्यास वेळ लागल्यामुळे, पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी होण्यातही वेळ गेला. त्यामुळे जमाव अधिकच संतापला. या घटनेमुळे परगावी शाळेसाठी मुलींना पाठवणार्‍या ग्रामीण पालकांनी, या असुरक्षित स्थितीत मुलींना शाळेत कसे पाठवायचे असा सवाल पोलिसांना केला आहे. ही घटना समाजाला काळीमा फासणारी तर आहेच, पण यामुळे ग्रामीण भागातील शालेय मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्‍नही ऐरणीवर आला  आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: