Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  स्तंभ लेख  >>  बातम्या

भारतीय सर्वाधिक आळशी?
ऐक्य समूह
Tuesday, July 25, 2017 AT 11:26 AM (IST)
Tags: st1
भारतीय लोक जगातील सर्वाधिक आळशी लोकांमध्ये मोडतात असा निष्कर्ष एका संशोधनातून पुढे आला आहे. जपानसारखा छोटासा देश अणुबाँबच्या हाहाकारातूनही झपाट्याने पुढे आला; मात्र प्रचंड लोकसंख्या असूनही भारताला महासत्ता होण्याच्या दिशेने पावले टाकायला स्वातंत्र्यानंतर 70 वर्षांहून अधिक कालावधी लागला.,
याचे उत्तर या संशोधनातच दडले आहे. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी यावर शिक्कामोर्तब
केले आहे
भारतीय लोक सध्या अनेक बाबतीत  प्रगतिपथावर आहेत. क्रीडाक्षेत्र असो वा विज्ञान-तंत्रज्ञान, जगावर भारतीयांच्या बुद्धिमत्तेची छाप पडत आहे. परंतु तरीही भारताची म्हणावी तशी प्रगती होत नाही. प्रचंड लोकसंख्या हा देशावरचा बोजा ठरत आहे, प्रचंड मनुष्यबळ म्हणून त्याची गणती करणे अद्यापही भारताला शक्य झालेले नाही. भारत हा काही वर्षांमध्येच सर्वाधिक तरुणांचा देश होणार असला तरी या तरुणांच्या ऊर्जेचा, कार्यशक्तीचा वापर योग्य प्रकारे करून घेतला जाणार का, याविषयीच्या प्रश्‍नचिन्हामुळे अद्याप आपण अमूक वर्षांतच महासत्ता बनू असे भाकित आपण ठामपणे वर्तवू शकत नाही. भले इतर देशाचे नेते तसे म्हणोत! हे असे का, या प्रश्‍नाचे ‘आळस’ असं आहे. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी नुकतेच जगात सर्वाधिक आळशी लोक कोण आहेत, याविषयी संशोधन केले. त्यामधून त्यांनी काढलेल्या निष्कर्षानुसार एकूण 46 देशांमधील लोकांमध्ये सक्रियतेमध्ये भारतीयांचा 39 वा क्रमांक लागतो. याचा अर्थ तळाच्या सर्वाधिक दहा आळशी देशांमध्ये भारतीय लोक आहेत. यासाठी या संशोधकांनी रोज सरासरी लोक किती पावले चालतात याचा आढावा घेतला. त्यावेळी भारतीय रोज सरासरी 4,297 पावले चालतात असे स्पष्ट झाले. जवळच्या ठिकाणी जायचे असले तरीही भारतीय लोक कारचा वापर करतात. तोंडाने ‘वॉकिंग डिस्टन्स’ असे म्हणत असले तरी प्रत्यक्षात ते तिथपर्यंत चालत जात नाहीत, असे या संशोधनातून स्पष्ट झालं आहे. त्यामुळे इंधनावर अकारण खर्च करणार्‍या देशांमध्येही आपण आघाडीवर असल्याचे हा निष्कर्ष सांगतो.
चालण्याचा आळस
  या संशोधनासाठी स्मार्टफोन्सचा वापर करण्यात आला. त्यांच्यामध्ये चालली गेलेली पावले मोजण्यासाठी ‘स्टेपकाऊंटर्स’ बसवण्यात आले होते. थोडक्यात, स्मार्टफोनमध्ये चालण्याच्या किंवा पावले टाकण्याच्या हालचालीची आपोआप नोंद करणारे सेन्सर्स म्हणजेच अ‍ॅक्सलेरोमीटर बसवून व्यक्ती किती पावले चालली हे मोजण्यात आले. एकूण सात लाख लोकांच्या सवयी यासाठी तपासण्यात आल्या. ‘नेचर’ या जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले असून विशेषतः हाँगकाँग आणि चिनी लोक सर्वाधिक सक्रिय आहेत. ते रोज सरासरी 6,880 पावले चालतात असे दिसून आले आहे. हाँगकाँगमधील लोक या बाबतीत चिनी लोकांहूनही उजवे असल्याचे आढळले आहे. या संशोधनात इंडोनेशियन लोकांचा क्रमांक सर्वात तळाचा आहे. तेथील सुमारे निम्मे लोक दैनंदिन सरासरी 3,513 पावलेच चालतात असे आढळले आहे. जगभरची चालण्याची दैनंदिन सरासरी 4,961 पावले आहे. भारतीय लोक या सरासरीच्या खाली आहेत. म्हणूनच ते सर्वाधिक आळशी लोकांच्या गटात आरामात बसतात. यातील स्वारस्यपूर्ण बाब म्हणजे अमेरिकाही या सरासरीच्या खाली आहे. अमेरिकन लोक सरासरी 4,774 पावले चालतात, मात्र इतर काही देश त्यांच्याहूनही आळशी असल्यामुळे अमेरिकेवर अद्याप आळशी देशाचा शिक्का बसलेला नाही.
आरोग्याशी संबंध
सर्वेक्षण करण्यात आलेल्या देशांचा विचार करता सक्रिय देशांच्या यादीतील वरच्या अर्ध्या भागात येणार्‍या देशांमध्ये हाँगकाँग, चीन, युक्रेन आणि जपान यांचा समावेश होतो. तिथे लोक रोज 6,000 हून अधिक पावले चालतात. तळाशी असलेल्या देशांमध्ये इंडोनेशियाखेरीज मलेशिया आणि सौदी अरेबिया या देशांचाही समावेश होतो. या आकडेवारीवरून आणखीही काही बाबी समोर आल्या आहेत. महिला भरपूर आणि विविध प्रकारची कामं करत असल्या तरी चालण्याच्या बाबतीत पुरुषांच्या तुलनेत मागे असल्याचे दिसून आलं आहे. भारतीयांचा विचार करता महिला रोज जेमतेम 3,684 पावले चालतात तर पुरुष 4,606 पावले चालतात. या अभ्यासाचं महत्त्व काय आहे असा प्रश्‍न इथे उपस्थित होणे साहजिक आहे. याचा संबंध थेट आरोग्याशी जोडला गेला आहे. संशोधकांनी रोजचे चालणे आणि आरोग्य यांचा संबंध तपासला हा यातील महत्त्वाचा भाग आहे. त्यांना अधिक प्रमाणात चालणार्‍या लोकांचे आरोग्य अधिक चांगले असल्याचे आढळले. त्यांच्यामध्ये लठ्ठपणा कमी असतो आणि आजारही कमी असतात. त्यामुळेच अद्यापही भारतीय महिलांचे आरोग्य पुरुषांच्या तुलनेत चांगले नाही असे आढळते.
भारतीय महिलांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण झपाट्याने वाढत चालल्याचा निष्कर्ष या अभ्यासातून काढण्यात आला आहे. यामागे महिलांचे चालणे कमी झाले हे महत्त्वाचे कारण असल्याचे या संशोधकांनी म्हटले आहे. पूर्वीप्रमाणे कष्टाची कामे नाहीत, शिवाय चालणे-फिरणेही कमी असल्यामुळे भारतीय महिलांमध्ये गेल्या काही वर्षांच्या तुलनेत लठ्ठपणाचे प्रमाण 232 टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले आहे. त्याउलट पुरुष अद्यापही बर्‍यापैकी चालत असल्यामुळे पूर्वीच्या तुलनेत शारीरिक हालचाली कमी झाल्या असल्या तरी त्यांच्यातील लठ्ठपणाचे प्रमाण 67 टक्क्यांनी वाढले आहे. महिलांच्या तुलनेत ते इतर अनेक प्रकारांनी शारीरिकदृष्ट्या अधिक कष्टाची कामं करतात किंवा सक्रिय असतात. या संदर्भात विविध आहारतज्ज्ञही चालण्याचे महत्त्व मान्य करतात. आधुनिक आहारशास्त्रानुसार रोज किमान दहा हजार पावले चालल्याखेरीज योग्य प्रकारे आरोग्य राखता येत नाही. शिवाय त्यांच्या मते केवळ सकाळी तासभर फिरले, की शरीर आकारबद्ध राहते हा सुद्धा गैरसमज आहे. आरोग्य चांगले राहणे आणि शरीर सुदृढ राहणे यासाठी दिवसभर सक्रियता राखली गेली पाहिजे. दिवसाची झोप टाळून लवकर उठणे आणि रात्री लवकर झोपणे या गोष्टी केल्यास वजनातील वाढही आटोक्यात राहते. म्हणूनच चिनी लोक भारतीय लोकांच्या तुलनेत सडपातळ आणि अधिक आरोग्यसंपन्न असतात. अधिक प्रमाणात चालणार्‍या आणि न चालणार्‍या लोकांच्या आरोग्यात मोठी तफावत आढळते असेही या अहवालात म्हटले गेले आहे.
लोकजागृतीसाठी संशोधन
‘नेचर’मध्ये प्रसिद्ध झालेल्या या संशोधनात असंही म्हटले गेले आहे, की शारीरिक निष्क्रियतेशी संबंधित आजारांनी दरवर्षी जगातील सुमारे 53 लाख लोक मरण पावतात. याविषयी लोकांमध्ये जागृती करण्यासाठी हे संशोधन हाती घेण्यात आले होते. संगणकशास्त्रज्ञ जुरे लेस्कोव्हेक आणि जैवअभियंता स्कॉट डेल्प यांनी सक्रियतेतील असमानताच लठ्ठपणाला कारणीभूत असल्याचा दावा केला आहे. याआधी अमेरिकेत या संदर्भात करण्यात आलेल्या संशोधनातून असे दिसून आले होते, की शहरांमधील चालण्यावर विपरीत परिणाम होतो. ज्या ठिकाणी शहरी वातावरण चालण्यास अनुकूल असेल, चांगले पदपथ असतील तिथे लोक अधिक प्रमाणात चालतात. यासाठी त्यांनी सॅन फ्रान्सिस्को, सॅन जोस आणि फ्रिमाँट या तीन शहरांचा अभ्यास करून असे दाखवून दिले होते की सॅन फ्रान्सिस्को येथील पदपथ आणि रस्ते चालण्यास अधिक प्रोत्साहन देणारे असल्याने इथे लोक अधिक प्रमाणात चालतात. त्यामुळे इथे इतर शहरांच्या तुलनेत लठ्ठ लोकांचे प्रमाण कमी आढळतं. भविष्यात चालण्याचा आणि शारीरिक सक्रियतेचा मानसिकतेवर होणारा परिणाम हे संशोधक तपासणार आहेत. विशेषतः तणाव व्यवस्थापना-साठी चालण्याचा व्यायाम कितपत उपयुक्त ठरतो याचे शास्त्रशुद्ध विश्‍लेषण करण्यात येणार आहे. शिवाय पुढच्या प्रकल्पात हे संशोधक सभोवतालच्या वातावरणाचा चालण्यावर किंवा शारीरिक सक्रियतेवर कसा परिणाम होतो यावर संशोधन करणार आहेत.
          - उर्मिला राजोपाध्ये
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: