Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  लोलक  >>  बातम्या

रेल्वे प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ
ऐक्य समूह
Wednesday, July 26, 2017 AT 11:12 AM (IST)
Tags: lolak1
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वेच्या कारभारात, प्रशासनात आमूलाग्र सुधारणा धडाक्याने घडवून आणतानाच, रेल्वेच्या प्रवाशांची सुरक्षितता आणि त्यांना दर्जेदार स्वच्छ अन्न मिळेल, यासाठी प्रभावी उपाययोजना अंमलात आणल्याच्या दाव्याच्या चिंधड्या ‘द कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल’ (‘कॅग’)च्या अहवालाने उडाल्या आहेत.
रेल्वेच्या प्रवाशांना दिले जाणारे अन्न, हे अन्नपदार्थ शिजवायसाठीची स्वयंपाकगृहे, रेल्वे स्थानकावरील स्वच्छता, पिण्याचे पाणी या सार्‍या व्यवस्थेची कॅगच्या तपासणी पथकाने देशातल्या 74 स्थानके आणि 80 प्रवासी रेल्वेत प्रवास करून पहाणी केल्यावर, तयार केलेल्या या अहवालात रेल्वेने प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ सुरू केल्याचा निष्कर्ष काढला आहे. रेल्वेमध्ये रेल्वे केटरिंग सुविधेद्वारे प्रवाशांना दिल्या जाणार्‍या भोजनाचा आणि अन्नपदार्थांचा दर्जा अत्यंत निकृष्ट प्रतीचा तर आहेच, पण हे अन्न माणसांना खाण्याच्या लायकीचे सुद्धा नाही, असा सणसणीत शेराही मारला आहे. वेष्टन बंद पदार्थ, फळांचा रस, बिस्किटे, दूध आणि बाटलीबंद पाण्याचा रेल्वे खात्याकडून होणारा पुरवठा सुद्धा हानिकारक असल्याचे, या अहवालात नमूद करण्यात आले आहे. रेल्वेच्या गलथान आणि ढिसाळ खाद्यपदार्थ सेवेचा पंचनामा करताना कॅगने, वर्षोनुवर्षे तेच कंत्राटदार आणि तेच गैरप्रकार सुरू असल्याने, रेल्वेच्या प्रवाशांना निकृष्ट प्रतीच्या अन्नाचा आणि पदार्थांचा पुरवठा सुरू आहे. प्रवासी गाड्यांमध्येच नव्हे तर एक्स्प्रेस गाड्यांमध्येही प्रवाशांना असे निकृष्ट प्रतीचेच अन्न दिले जाते. खानपान व्यवस्थेची कंत्राटे घेणार्‍या आणि प्रवाशांना लुटणार्‍या ठेकेदारावर कोणतीही कारवाई प्रशासनाकडून होत नाही. अन्नाच्या गुणवत्तेबद्दल तडजोडी करून प्रवाशांच्या आरोग्याला धोकादायक ठरणार्‍या अन्नपदार्थांची राजरोसपणे आणि अधिक दरात विक्री केली जाते. अन्नपदार्थांचे वजन रेल्वेने प्रमााणित केलेल्या वजनापेक्षा कमी असते. पिण्याचे पाणी शुद्ध आणि स्वच्छ असेल, याची खात्री नसते. मुदत संपलेल्या वेष्टन बंद पदार्थांची विक्री केली जाते. परवानगी नसलेल्या पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांची विक्री करताना, किमान किंमतीपेक्षा अधिक किंमत वसूल केली जाते. अन्न उघडे ठेवले गेल्याने त्यावर धूळ आणि माशा घोंघावतात. तेच पदार्थ प्रवाशांना विकले जातात आणि उरलेले अन्न पुन्हा शिजवून प्रवाशांना दिले जाते. दूरांतो एक्स्प्रेससह अनेक एक्स्प्रेस गाड्यांच्या स्वयंपाकघराच्या डब्यात (पेंट्री कार) झुरळ, उंदीर, पाली आढळल्या आहेत. कानपूर, दिल्ली एक्स्प्रेसमध्ये विक्री न झालेले पराठे परत गरम करून प्रवाशांना विक्री करण्यात आले. ज्या रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रवाशांसाठी दुपारी आणि रात्रीच्या भोजन शिजवले जाते तेथील स्वयंपाकगृहे अत्यंत अस्वच्छ आणि घाणीच्या साम्राज्याने दुर्गंधी युक्त झाली आहेत. हे अन्नपदार्थ शिजवताना आचारी कधीही स्वच्छतेची काळजी घेत नाही. प्रवाशांना पुरवठा केल्या जाणार्‍या अन्नपदार्थ आणि किंमतीचे पत्रक दिले जात नाही. निष्काळजीपणे अन्नपदार्थ शिजवले जात असल्याने कटलेटमध्ये लोखंडी खिळाही आढळल्याची घटना घडली आहे.
रेल्वे प्रवाशांनी रेल्वेमध्ये दिले जाणारे अन्नपदार्थ आणि भोजनाच्या निकृष्ट दर्जाबाबत वारंवार तक्रार झाल्यावर 2005 मध्ये रेल्वेतील भोजन आणि खाद्यपदार्थांची जबाबदारी इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कार्पोरेशनकडे देण्यात आली. 2010 मध्ये या धोरणात बदल करून याच कंपनीकडे फ्रुट प्लाझा आणि फास्टफूडची जबाबदारी दिली. फेब्रुवारी 2017 मध्ये हे धोरण बदलून खानपानाची जबाबदारी याच कंपनीला दिली गेली. रेल्वे खात्याने फक्त धोरणात बदल केले, पण रेल्वे प्रवाशांना दिल्या जाणार्‍याअन्न पदार्थ आणि खाद्यपदार्थांच्या दर्जात मात्र काहीही सुधारणा झाली नसल्याचे कॅगने या अहवालात नमूद करताना,
अनेक गैरप्रकारांचा आणि घटनांचाही
पंचनामा पुराव्यासह केल्याने प्रभू यांचा दावा खोटा ठरला आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: