Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

शिखर धवन, चेतेश्‍वर पुजारा यांची शतके
ऐक्य समूह
Thursday, July 27, 2017 AT 11:28 AM (IST)
Tags: sp1
पहिल्या कसोटीवर भारताची मजबूत पकड
5गॉल, दि. 26 (वृत्तसंस्था) : सलामीवीर शिखर धवन व मधल्या फळीतील चेतेश्‍वर पुजारा यांची शतके आणि दोघांच्या अडीचशे धावांच्या भागीदारीच्या जोरावर गॉल येथील पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताने पहिल्या डावात 3 बाद 399 अशी दणदणीत मजल मारली आहे. आपल्या विजयी अभियानाची सुरुवात 2015 मध्ये श्रीलंकेमध्येच करणार्‍या भारतीय संघाने या दौर्‍याची सुरुवात जोरदार केली आहे. मात्र, धवनचे द्विशतक केवळ दहा धावांनी हुकल्याची चुटपूट भारतीय क्रिकेट रसिकांना लागली. दिवसाचा खेळ संपला तेव्हा पुजारा 145 तर अजिंक्य रहाणे 39 धावांवर नाबाद होता. एकाच दिवसात भारताने उभारलेली ही दुसर्‍या क्रमांकाची मोठी धावसंख्या आहे. धवनला दिलेले जीवदान लंकेला चांगलेच महागात पडले.
श्रीलंका दौर्‍याच्या प्रारंभीच नाणेफेकीचा कौल भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या बाजूने लागला. त्याने क्षणाचाही विलंब न लावता प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. लोकेश राहुलच्या जागी संधी मिळालेला अभिनव मुकुंद लवकर बाद झाल्याने भारतीय संघ अडचणीत आला होता. पाटा खेळपट्टीवरही मुकुंदला धावा करता आल्या नाहीत. बर्‍याच खंडानंतर लंकेच्या संघात पुनरागमन केलेल्या नुवान प्रसादने त्याला अवघ्या 12 धावांवर तंबूत धाडले. मात्र, धवन आणि पुजारा यांच्या द्विशतकी भागीदारीच्या जोरावर भारताने धावांचा डोंगर उभारला.
मुकुंद बाद झाल्यानंतर चेतेश्‍वर पुजारा तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजीला उतरला. त्यानंतर खेळाचा नूरच पालटला. शिखर धवनने लंकेच्या गोलंदाजांची पिसे काढायला सुरुवात केली. धवनच्या आक्रमणासमोर लंकेचे गोलंदाज क्लब दर्जाचे भासत होते. दुसर्‍या बाजूला पुजाराने गोलंदाजांचा थोडा आदर करताना शैलीदार फलंदाजी केली. त्यातच धवनला असेला गुणरत्नेने दुसर्‍या स्लीपमध्ये जीवदान दिले. हा झेल घेण्याच्या प्रयत्नात गुणरत्नेचे मनगट दुखावल्याने तो कसोटीच्या उर्वरित खेळाला मुकणार आहे. गुणरत्नेने दिलेले जीवदान लंकेला खूपच महागात पडले. उपहारापर्यंत धवनने 64 धावांपर्यंत मजल मारली होती. उपहारानंतर धवनने आणखी रुद्रावतार धारण करताना मैदानाच्या चौफेर टोलेबाजी करत चहापानापर्यंतच्या सत्रात तब्बल 126 धावा कुटल्या. दिवसाच्या एकाच सत्रात सर्वाधिक धावा करणार्‍या भारतीय फलंदाजांमध्ये धवनने वीरेंद्र सेहवागनंतर दुसरा क्रमांक पटकावला आहे. सेहवागने लंकेविरुद्धच 2009-10 च्या हंगामात एकाच सत्रात 133 धावा ठोकल्या होत्या. शैलीदार फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणनेही 2000 मध्ये सिडनीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकाच सत्रात 121 धावा फटकावल्या होत्या.
द्विशतकाच्या दिशेने वाटचाल करणार्‍या धवनने चहापानाला काही मिनिटे बाकी असताना प्रदीपच्या गोलंदाजीवर अँजेलो मॅथ्यूजच्या हातात झेल दिला. धवनने 168 चेंडूत 190 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने तब्बल 31 चौकार लगावले. त्याने पुजाराच्या साथीत दुसर्‍या विकेटसाठी 253 धावांची भागीदारी केली. लंका दौर्‍यासाठी भारतीय संघात आधी धवनला स्थान देण्यात आले नव्हते. मात्र, सलामीवीर मुरली विजय खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने ऐन वेळी धवनचा संघात समावेश करण्यात आला. या संधीचे धवनने सोने केले.
श्रीलंकेचा कर्णधार रंगना हेराथसह अन्य गोलंदाजांच्या मार्‍यात अजिबात भेदकता नव्हती. एकट्या प्रदीपने उत्कृष्ट गोलंदाजी करताना भारताचे तिन्ही फलंदाज तंबूत धाडले. धवनचा बळी घेतल्यानंतर प्रदीपने भारताचा कर्णधार विराट कोहलीलाही झटपट तंबूत धाडले. कोहलीला या डावात फारशी चमक दाखवता आली नाही. तो अवघ्या तीन धावांवर तंबूत परतला. त्यानंतर पुजारा व अजिंक्य रहाणे यांनी आणखी पडझड होऊ दिली नाही. या दरम्यान पुजारानेही आपल्या कारकिर्दीतील 12 वे शतक साजरे करताना दिवसअखेरीस 145 धावा केल्या. या खेळीत पुजाराने 12 चौकार ठोकले. त्याला रहाणेने चांगली साथ देत नाबाद 39 धावा केल्या. पहिल्या दिवशी मजबूत पायाभरणी झाल्याने उद्या दुसर्‍या दिवशी धावांचा डोंगर उभारून सामन्यावरील पकड घट्ट करण्याचा भारतीय संघाचा निर्धार आहे.
धावफलक : भारत (पहिला डाव) : शिखर धवन झे. मॅथ्यूज गो. प्रदीप 190, अभिनव मुकुंद झे. डिकवेला गो. प्रदीप 12, चेतेश्‍वर पुजारा नाबाद 145, विराट कोहली झे. डिकवेला गो. प्रदीप 3, अजिंक्य रहाणे नाबाद 39, अवांतर 11, एकूण 90 षटकांत 3 बाद 399.
गोलंदाजी : नुवान प्रदीप 18-1-64-3, लाहिरू कुमारा 16-0-95-0, कुशल परेरा 25-1-103-0, रंगना हेराथ 24-4-92-0, धनुष्का गुणतिलक 7-0-41-0.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: