Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

पहिल्या कसोटीवर भारताची मजबूत पकड
ऐक्य समूह
Friday, July 28, 2017 AT 11:33 AM (IST)
Tags: sp1
5गॉल, दि. 27 (वृत्तसंस्था) : शिखर धवन व चेतेश्‍वर पुजारा यांच्या शतकांनंतर अजिंक्य रहाणे व हार्दिक पांड्या यांची अर्धशतके आणि अश्‍विन व मोहम्मद शमी यांच्या फटकेबाजीच्या जोरावर भारतीय क्रिकेट संघाने श्रीलंकेविरुद्ध पहिल्या डावात 600 धावांचा डोंगर रचला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी अचूक मारा करत श्रीलंकेचा निम्मा संघ माघारी धाडला. त्यामुळे कसोटीच्या दुसर्‍याच दिवशी भारताने कसोटीवर मजबूत पकड घेतली आहे. दुसर्‍या दिवसाचा खेळ संपला तेव्हा श्रीलंकेची अवस्था 5 बाद 154 अशी झाली होती.
भारतीय फलंदाजांनी धावांचा डोंगर रचल्यानंतर श्रीलंकेची सुरुवात अडखळती झाली. वेगवान गोलंदाज उमेश यादव व मोहम्मद शमी यांनी यजमानांना जोरदार धक्के दिले. सलामीवीर दिमुथ करुणरत्नेला उमेश यादवने स्वस्तात माघारी धाडले. त्यानंतर उपुल थरंगा आणि कसोटी पदार्पण करणारा धनुष्का गुणतलिका यांनी लंकेचा डाव काहीसा सावरत दुसर्‍या विकेटसाठी 61 नावांची अर्धशतकी भागीदारी केली. त्यानंतर मोहम्मद शमीने गुणतिलका आणि कुशल मेंडिस यांना बाद करत श्रीलंकेची अवस्था बिकट केली. श्रीलंकेचे तीन फलंदाज 100 धावांच्या आतच माघारी परतले. माजी कर्णधार अँजेलो मॅथ्यूज आणि थरंगा या जोडीने श्रीलंकेची धावसंख्या सव्वाशेपर्यंत नेली. त्यानंतर चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न थरंगाच्या अंगलट आला. अभिनव मुकुंदच्या चपळ क्षेत्ररक्षणामुळे तो धावबाद झाला. मॅथ्यूज आणि तरंगाने चौथ्या विकेटसाठी 57 धावांची भागीदारी केली. थरंगाने अर्धशतकी खेळी करताना 10 चौकार लगावले. हा धक्का लंकेला पचतो न पचतो तोच अश्‍विनच्या गोलंदाजीवर मुकुंदने नीरोशान डिकवेलाचा अप्रतिम झेल पकडला. त्यानंतर मॅथ्यूजने कुशल परेराला हाताशी धरत आणखी पडझड थांबवली. या दोघांनी उर्वरित चार षटके खेळून काढली. श्रीलंकेसाठी मॅथ्यूजची फलंदाजी हेच एकमेव आशास्थान आहे. तो अद्यापही खेळपट्टीवर कायम असल्याने लंकेला झुंज देता येईल. मॅथ्यूजने भारतीय गोलंदाजीचा चांगला सामना करत नाबाद 54 धावा केल्या.
तत्पूर्वी, भारताने पहिल्या डावात सर्वबाद 600 धावा केल्या. कसोटीत पदार्पण केलेल्या हार्दिक पांड्याने तळातल्या फलंदाजांना हाताशी घेत अर्धशतक साजरे केल्याने भारताला मोठी धावसंख्या उभारता आली. पांड्याने 49 चेंडूंमध्ये 5 चौकार आणि 3 षटकारांच्या सहाय्याने 50 धावांची खेळी केली. अखेर लाहिरू कुमाराने त्याला झेलबाद करत भारताचा डाव संपवला.
सकाळच्या सत्रात चेतेश्‍वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेला झटपट माघारी धाडण्यात श्रीलंकेचे गोलंदाज यशस्वी झाले. दरम्यान, अजिंक्य रहाणेने सकाळी अर्धशतक साजरे केलेे. मात्र, लाहिरू कुमाराच्या गोलंदाजीवर करुणरत्नेकडे झेल देऊन तो माघारी परतला. त्या आधी नुवान प्रदीपने चेतेश्‍वर पुजाराला डिकवेलाकडे झेल द्यायला भाग पाडले. त्यानंतर अश्‍विन आणि वृद्धीमान साहा यांनी सहाव्या विकेटसाठी 59 धावांची भागीदारी केली. ही जमलेली जोडी श्रीलंकेचा कर्णधार रंगना हेराथने फोडली. त्याने वृद्धीमान साहाला बाद केला. त्यानंतर अश्‍विनला प्रदीपने यष्टीरक्षक डिकवेलाकडे झेल द्यायला लावला. पन्नासावी कसोटी खेळणार्‍या अश्‍विनला अर्धशतक साजरे करण्याची संधी प्रदीपने दिली नाही. अश्‍विननंतर रवींद्र जडेजाही फारसे काही करू शकला नाही. तो 15 धावांवर बाद झाला. तोपर्यंत खेळपट्टीवर जम बसवलेल्या हार्दिक पांड्याने मोहम्मद शमीच्या साथीत नवव्या विकेटसाठी 62 धावांची भागीदारी केली. पांड्या आणि शमी यांनी श्रीलंकेच्या गोलंदाजांवर हल्लाबोल करत उत्तुंग षटकार खेचले. लाहिरू कुमारच्या गोलंदाजीवर उंच फटका खेळण्याच्या नादात शमी बाद झाला. उमेश यादवनेही एक षटकार व एक चौकार खेचला. अखेर पांड्याने उत्तुंग फटका मारण्याच्या प्रयत्नात कुमाराच्या गोलंदाजीवर बदली क्षेत्ररक्षकाकडे झेल दिला आणि भारताचा डाव संपुष्टात आला. श्रीलंकेकडून नुवान प्रदीपने अप्रतिम गोलंदाजी केली. भारताचे सहा फलंदाज त्याने माघारी धाडले. लाहिरू कुमाराने तीन तर रंगना हेराथने एक बळी घेतला. श्रीलंकेचे इतर गोलंदाज निष्प्रभ ठरले.
धावफलक : भारत (पहिला डाव) : (3 बाद 399 वरून पुढे) चेतेश्‍वर पुजारा झे. डिकवेला गो. प्रदीप 153, अजिंक्य रहाणे झे. करुणरत्ने गो. कुमारा 57, अश्‍विन झे. डिकवेला गो. प्रदीप 47, वृद्धीमान साहा झे. परेरा गो. हेराथ 16, हार्दिक पांड्या झे. बदली खेळाडू (डिसिल्वा) गो. कुमारा 50, रवींद्र जडेजा त्रि. गो. प्रदीप 15, मोहम्मद शमी झे. थरंगा गो. कुमारा 30, उमेश यादव नाबाद 11, अवांतर 16, एकूण 133.1 षटकांत सर्वबाद 600.
गोलंदाजी : नुवान प्रदीप 31-1-132-6, लाहिरू कुमारा 25.1-3-131-3, कुशल परेरा 30-1-130-0, रंगना हेराथ 40-6-159-1, धनुष्का गुणतिलका 7-0-41-0.
श्रीलंका (पहिला डाव) : दिमुथ करुणरत्ने पायचित गो. यादव 2, उपुल थरंगा धावबाद 64, धनुष्का गुणतिलका झे. धवन गो. शमी 16, कुशल मेंडिस झे. धवन गो. शमी 0, अँजेलो मॅथ्यूज नाबाद 54, नीरोशान डिकवेला झे. मुकुंद गो. अश्‍विन 8, कुशल परेरा नाबाद 6, अवांतर 4, एकूण 44 षटकांत 5 बाद 154.
गोलंदाजी : मोहम्मद शमी 9-2-30-2, उमेश यादव 8-1-50-1, आर. अश्‍विन 18-2-49-1, रवींद्र जडेजा 9-1-22-0.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: