Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  लोलक  >>  बातम्या

सोनू तुला भरोसा नाय का?
vasudeo kulkarni
Friday, July 28, 2017 AT 11:31 AM (IST)
Tags: lolak1
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या महानगरी मुंबईच्या मोहात देश-विदेशातले कोट्यवधी लोक पडतात. कधीही न झोपणारे आणि कधीही, कुणाला उपाशी न ठेवणारी असा या नगरीचा लौकिक. मुंबईकरांना रोजच्या दगदगीच्या प्रवासाची-धावपळीची, वाहतुकीच्या कोंडीची सवय अंगवळणी पडल्यानं, त्यांना या त्रासाचं फारसं काही वाटत नाही. मुसळधार पाऊस पडताच मुंबईतली मोठी गटारं तुंबतात, काही भागातल्या रस्त्यात दीड दोन फूट उंचीचं पाणी साठतं. या नैसर्गिक संकटावर मात करीत चाकरमाने मुंबईकर आपआपल्या कामावर जातात आणि परतही येतात. पण, आता मात्र याच मुंबईकरांना महापालिकेच्या रस्त्यातल्या प्रचंड खड्ड्यांच्या समस्येनं हैराण केलं आहे. दुचाकी, मोटार, टॅक्सी किंवा बसनं प्रवास करतानाही ही वाहनं वारंवार खड्ड्यात जात असल्यानं बसणार्‍या हिसक्यानं मुंबईकरांचे मणके खिळखिळे झाले आहेत. मानदुखी, पाठदुखीनं संत्रस्त झालेले मुंबईकर महापालिकेच्या गलथान-अंदाधुंदीच्या-बेपर्वाईच्या कारभाराचा कधी उघड तर कधी मनातल्या मनात शिव्या देऊन पंचनामा करतात. खड्ड्यात साठलेलं पावसाचं पाणी अंगावर उडाल्यानं त्या अभिषेकात चिंब भिजणार्‍या मुंबईकरांचा संताप अनावर होतो. पण, करणार काय? महापालिकेचा कारभार याच मुंबईकरांनी लोकहितदक्ष शिवसेनेकडेच पुन्हा दिल्यानं तक्रारीची काही सोय नाही. तक्रारी केल्याच तर प्रशासन त्यांची दखल घेत नाही. मुंबईतल्या या खड्डेमय रस्त्यामुळं मुंबईकरांच्या मनात खदखदत असलेल्या असंतोषाला अर्जी मलिशा या गायिकेनं, ‘मुंबा ऽऽऽ ई तुला बीएमसीवर भरोसा नाय का?’ या शिर्षकाचं विडंबन गीत सोशल मीडियावर प्रसारित केलं आणि त्याला मुंबईकरांचा प्रचंड प्रतिसादही मिळाला. ‘मुंबईचे रस्ते कसे गोल गोल गोल आणि त्यात कसा झाला झोल झोल झोल’, अशा उपहासात्मक ओळींचा समावेशही या छोट्याशा गीतात आहे. हे गीत अवघ्या दोन चार दिवसातच मंबई आणि महाराष्ट्रातही लोकप्रिय झालं. लाखो जण हे गाणं सहजपणे गुणगुणायला लागले. मुंबई महापालिकेची बदनामी झाली. मग महापालिकेच्या कर्तव्यदक्ष आरोग्य अधिकार्‍यांनी मालिशाच्या घराची झडती घेतली, तेव्हा घराबाहेरच्या कट्ट्यावर ठेवलेल्या झाडाच्या कुंडीत त्यांना म्हणे ‘डेंग्यूच्या’ अळ्या सापडल्या. अर्थातच महापालिकेच्या या कारवाईवर कुणाचा विश्‍वास बसणं शक्य नव्हतं, हे ओघानं आलंच.
मुंबईतल्या असंख्य खड्ड्यांचं आणि त्यामुळं जनतेला सोसाव्या लागणार्‍या असह्य त्रासाचं भेदक वर्णन करणारं हे गाणं राज्यभर लोकप्रिय तर झालंच, पण विरोधी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनाही सरकारवर तोफा डागायसाठी ते उपयोगी पडलं. मग ‘सोनू तुला सरकारवर भरोसा नाय काय?’, ‘तुला मोदीवर भरोसा नाय काय?’, कर्जमाफीसाठी शेतकर्‍यांना उद्देशून, ‘सोनू तुला देवेंद्रवर भरोसा नाय काय?’, अशा नवनव्या गाण्यांची रेलचेल सध्या सोशल मीडियावर झाली आहे. गाण्याचा मुखडा मात्र तोच! फक्त गाण्याच्या बाकीच्या ओळी आपल्याला हव्या तशा बदलायच्या आणि संबंधितांवर या गाण्याद्वारे टीका करायची, असं स्तोम माजलं आहे.
मुंबई महापालिकेचा उपहास करणारं हे छोटं गाणं असं प्रचंड गाजेल असं मालिशाला वाटलंही नव्हतं. पण, सोशल मीडियामुळं ते मुंबईसह राज्यातल्या घरा-घरात अल्पावधीत पोहचलं आणि वाजायला-गाजायलाही लागलं. विरोधकांना सरकारची कोंडी करायला हेच गाणं असं उपयोगीही
पडलं आहे.
सोशल मीडियावर प्रसारित होणारं कोणतं गाणं कसं गाजेल, हे काही सांगता येत नाही. पण, राज्यभरातल्या रस्त्यावरच्या लाखो खड्ड्यांच्या स्थितीनं या गाण्यानं जनता ‘राज्यातले रस्ते कसे खोल खोल खोल’ जनतेचा झाला कसा झोल झोल झोल’ असं म्हणत, सोनू तुला सरकारवर भरोसा नाय काय? असं विचारते आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: