Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
गिलानीच्या वकिलावर ‘एनआयए’चे छापे
ऐक्य समूह
Monday, July 31, 2017 AT 11:15 AM (IST)
Tags: na1
‘टेरर फंडिंग’ : गिलानीच्या मुलांना चौकशीसाठी समन्स
5जम्मू/नवी दिल्ली, दि. 30 (वृत्तसंस्था) : पाकस्थित दहशतवादी संघटनांकडून मिळवलेला निधी जम्मू-काश्मीरमधील हिंसक कारवायांसाठी वापरल्याच्या आरोपांवरून राष्ट्रीय तपास यंत्रणेने आपला तपास आणखी व्यापक केला आहे. ‘हुर्रियत’ नेता सईद अली शाह गिलानी याच्या वकिलाच्या कार्यालयावर आणि निवासस्थानावर एनआयएच्या अधिकार्‍यांनी रविवारी छापे टाकले. गिलानीच्या एका मुलाला सोमवारी तर दुसर्‍या मुलाला बुधवारी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.
सईद अली शाह गिलानीचा वकील देविंदरसिंग बहल याच्या घरावर व कार्यालयावर आज छापे टाकण्यात आले. बहल हा जम्मू-काश्मीर सोशल पीस फोरम (जेकेएसपीएफ) या संघटनेचा चेअरमन असून ही संस्था सईद अली शाह गिलानीच्या ‘तहरिक-ई-हुर्रियत’शी संलग्न आहे. बहल हा फुटीरतावाद्यांची एकीकृत संघटना ‘हुर्रियत कॉन्फरन्स’चा कायदेविषयक सल्लागार असून तो गिलानींचा निकटवर्तीय आहे. सुरक्षा दलांच्या कारवायांमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारप्रसंगी तो अनेकदा उपस्थित असल्याचे दिसले आहे, असे एनआयएच्या प्रवक्त्याने सांगितले.
पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांकडून मिळणारा निधी फुटीरतावाद्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी बहल हा कुरियर म्हणून काम करत असल्याचा संशय आहे. बहल याच्या कार्यालयावर व  निवासस्थानावर टाकलेल्या छाप्यात चार मोबाईल फोन, एक टॅब्लेट आणि काही आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणी गिलानीचा धाकटा मुलगा नसीम याला बुधवारी नवी दिल्लीत चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. त्याचबरोबर गिलानीचा थोरला मुलगा नईम याला उद्या चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र, त्याने छातीत दुखत असल्याची तक्रार केल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहितीही या प्रवक्त्याने दिली. नईम हा पेशाने शल्यचिकित्सक असून तो 11 वर्षे पाकिस्तानात राहून 2010 साली काश्मीरमध्ये परतला होता. ‘हुर्रियत कॉन्फरन्स’चे नेतृत्व सईद अली शाह गिलानींकडे असून नईम हा त्यांचा वारसदार समजला जात आहे. ‘जमात-उद-दवा’ व ‘लष्कर-ए-तोयबा’ या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांचा म्होरक्या हाफीज सईद याच्याविरुद्ध एनआयएने या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून नईम याचे त्याच्याशी थेट संबंध असल्याचा संशय आहे. त्यामुळे त्याची चौकशी करण्यात येणार आहे. ‘हुर्रियत कॉन्फरन्स’मधील गिलानी यांच्या जहालमतवादी गटातील आणि मीरवैज उमर फारुख यांच्या मवाळवादी गटातील काही नेत्यांवर एनआयएने या आधीच गुन्हा दाखल केला आहे. त्यामध्ये ‘हिजबुल मुजाहिद्दीन’ आणि महिला दहशतवाद्यांची संघटना ‘दुख्तरन-ए-मिल्लत’ यातील काही सदस्यांची नावेही प्राथमिक तपास अहवालात समाविष्ट करण्यात आली आहेत. या प्रकरणी एनआयएने गिलानीचा जावई अल्ताफ अहमद शाह उर्फ अल्ताफ फंटूश, ‘तहरिक-इ-हुर्रियत’चा प्रवक्ता अयाज अकबर, पीर सफिउल्ला, मीरवैज उमर फारुख यांच्या गटाचा प्रवक्ता शाहीद-उल-इस्लाम, मेहराजुद्दीन कलवाल, नईम खान आणि फारुख अहमद दार उर्फ बिट्टा कराटे यांना एनआयएने आधीच अटक केली असून त्यांना दिल्लीतील न्यायालयाने दहा दिवसांची एनआयए कोठडी दिली आहे. जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी आणि हिंसक कारवायांसाठी पाकस्थित दहशतवाद्यांकडून आर्थिक रसद गोळा केल्याच्या प्रकरणात एनआयएने 30 मे रोजी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी हुर्रियतच्या नेत्यांची घरे, निवासस्थाने यासह त्यांच्या साथीदारांच्या हरियाणा, नवी दिल्ली व काश्मीरमधील मालमत्तांवर एनआयएने नुकतेच छापे टाकले होते. या छाप्यांमध्ये कोट्यवधींची रोकड, मोबाईल, संगणक संच, आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: