Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मृत्यूच्या दाखल्यासाठीही ‘आधार’ बंधनकारक
ऐक्य समूह
Saturday, August 05, 2017 AT 11:22 AM (IST)
Tags: na2
1 ऑक्टोबरपासून निर्णयाची अंमलबजावणी
5नवी दिल्ली, दि. 4 (वृत्तसंस्था) :सरकारी लाभाच्या योजना, पॅनकार्ड, प्राप्तिकर विवरणपत्रे आणि सिमकार्डसाठी ‘आधार’सक्ती केल्यानंतर आता केंद्र सरकारने मृत्यूच्या प्रमाणपत्रासाठीही आधार क्रमांक बंधनकारक केला आहे. मृत्यूचा दाखला काढताना मृत्यू झालेल्या व्यक्तीचा आधार क्रमांकही द्यावा लागणार आहे. 1 ऑक्टोबरपासून हा निर्णय लागू होणार आहे.
शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्रालयांतर्गत येणार्‍या रजिस्ट्रार जनरल इंडियाने परिपत्रक काढून  मृत्यूच्या दाखल्यासाठी असलेल्या नवीन नियमाची माहिती दिली आहे. मृत्यूचा दाखला काढताना मयत व्यक्तीचा आधार क्रमांक अर्जामध्ये द्यावा लागणार आहे. त्यामुळे मयत व्यक्तीच्या ओळखीमध्ये कोणताही घोळ होणार. मृत व्यक्तीची माहितीही सरकारला उपलब्ध होईल. त्याचबरोबर मृत्यूच्या दाखल्यासाठी यापूर्वी आवश्यक असलेली कागदपत्रेही सादर करण्याची गरज राहणार नाही, असे अधिकार्‍यांनी सांगितले. मेघालय, आसाम आणि जम्मू-काश्मीर वगळता देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी हा निर्णय लागू असेल. राज्यांच्या संबंधित यंत्रणांनी या निर्णयाची अंमलबजावणी करावी, असे या परिपत्रकात म्हटले आहे. मृत व्यक्तीच्या नावे आधारकार्ड नसल्यास तसे प्रमाणपत्र अर्जदाराला द्यावे लागेल. त्यामध्ये मृत व्यक्तीच्या नावेे आधारकार्ड नसल्याची माहिती नमूद करावी लागेल. या निर्णयामुळे मृत व्यक्तीचे वारस व कुटुंबीयांना सरकारी कामांमध्ये येणार्‍या अडचणींना सामोरे जावे लागणार नाही, असा दावा करण्यात आला आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: