Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
खंड्या व साथीदारांची मालमत्ता तपासण्याचे काम पोलिसांकडून सुरू
ऐक्य समूह
Saturday, August 05, 2017 AT 11:23 AM (IST)
Tags: lo2
5सातारा, दि. 4 : बेकायदा सावकारी प्रकरणात पोलीस कोठडीत असलेल्या प्रमोद उर्फ खंड्या बाळासाहेब धाराशिवकर (वय 32, रा.न्यू विकासनगर) याच्यासह त्याच्या सर्व साथीदारांच्या मालमत्तांची तपासणी पोलिसांनी सुरू केली आहे. खंड्यासह त्याच्या साथीदाराच्या नावावर असलेल्या मालमत्तेबाबत जिल्ह्यातील निबंधकाकडे असलेल्या नोंदी मागवण्यात आल्या आहेत. त्यामुळे सावकारीच्या पैशातून गोळा केलेली संशयितांची मालमत्ता अडचणीत आली आहे. खंड्यावर पोलिसांनी केलेल्या ठोस कारवाईमुळे तक्रारी देण्यासाठी तक्रारदार पुढे येत आहेत.   शुक्रवारी काही तक्रारदारांनी पोलिसांशी संपर्क साधून आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, बेकायदा सावकारी, दरोडा, जबरी चोरी, खंडणी यासह गंभीर गुन्हे खंड्या धाराशिवकरविरुद्ध दाखल आहेत. गुन्हे दाखल झाल्यानंतर खंड्या पसार झाला होता. पोलीस त्याचा शोध घेत असताना अखेर दोन महिन्यानंतर त्याला पकडण्यात आले. 
गुरुवारी त्याला अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस कोठडीत खंड्याकडे कसून चौकशी केली जात आहे. चौकशीत तो देत असलेली माहिती खरी आहे का याची तपासणी केली जाणार आहे.  खंड्याचे  कुटुंबीय व साथीदारांकडे किती मालमत्ता आहे याचाही  शोध घेतला जाणार आहे. खंड्याच्या बँक खात्याचा तपास केला जाणार असून पोलीस बॅँकांना तसा पत्रव्यवहार करणार आहेत.
 खंड्याने कोट्यवधी रुपयांची मालमत्ता उभी केली आहे. ही मालमत्ता कुटुंबीय व समाजात वावरणार्‍या मातब्बरांच्या नावावर असल्याची चर्चा आहे. त्यामुळे  खंड्या जबाबात कोणाकोणाची नावे सांगणार याकडे लक्ष लागले आहे. त्यासाठी पोलिसांनी सर्व बाजूंनी तपास करावा, अशी मागणी होत आहे. गैरमार्गाने, जबरदस्तीने घेतलेल्या मालमत्ता कोणाच्या नावावर केल्या आहेत त्यांची नावे समाजासमोर आणून त्यांनाही बेड्या ठोकाव्यात, अशी मागणी होत आहे. शुक्रवारी काही तक्रारदारांनी पोलिसांशी संपर्क साधला असून तक्रारदारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. खंड्या अथवा त्याच्या साथीदारांना न घाबरता अन्याय झालेल्या नागरिकांनी तक्रारी देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: