Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ल्यात ‘तोयबा’चा हात
ऐक्य समूह
Monday, August 07, 2017 AT 11:31 AM (IST)
Tags: na2
5जम्मू, दि. 6 (वृत्तसंस्था) : अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला जवळपास महिना होत असताना या प्रकरणी जम्मू-काश्मीर पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) तीन दहशतवाद्यांना रविवारी अटक केली. या तिघांच्या चौकशीतून हा हल्ला ‘लष्कर-ए-तोयबा’ या दहशतवादी संघटनेने केल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी माहिती काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक मुनीर खान यांनी दिली. या हल्ल्यातील सर्व दहशतवाद्यांची ओळख पटली असून या हल्ल्याचा सूत्रधार व उर्वरित दोन दहशतवाद्यांनाही लवकरच पकडले जाईल किंवा त्यांचा खात्मा केला जाईल,
असा विश्‍वास खान यांनी व्यक्त केला. खान म्हणाले, ‘तोयबा’चा पाकिस्तानी दहशतवादी अबू इस्माइल हा अमरनाथ यात्रेकरूंवर 10 जुलैच्या रात्री झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आहे. त्याने दोन स्थानिक काश्मिरी दहशतवाद्यांच्या मदतीने हा हल्ला घडवून आणला होता. इस्माइलसह इतर दोन दहशतवादी फरार आहेत. रविवारी अटक करण्यात आलेल्या तीन दहशतवाद्यांचा हल्ल्याचा कट रचण्यात आणि प्रत्यक्ष हल्ला करणार्‍या दहशतवाद्यांना मदत करण्यात सहभाग होता. आधी या दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) किंवा अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर 9 जुलै रोजी हल्ला करण्याची योजना आखली होती. मात्र, त्या दिवशी दहशतवाद्यांना सीआरपीएफ किंवा यात्रेकरूंच्या बसेस निर्जन ठिकाणी आढळल्या नाहीत. त्यामुळे दुसर्‍या दिवशी अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर हल्ला करण्यात आला. दहशतवाद्यांनी यात्रेकरूंच्या बससाठी ‘शौकत’ हा परवलीचा शब्द तर सीआरपीएफच्या बससाठी ‘बिलाल’ हा परवलीचा शब्द ठेवला होता.  या दहशतवाद्यांनी चौकशीत हल्ल्याच्या पद्धतीबद्दल सर्व माहिती दिली. दहशतवाद्यांनी 10 जुलै रोजी रात्री अनंतनाग जिल्ह्यात अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर हल्ला केला होता. या हल्ल्यात दहा यात्रेकरूंचा मृत्यू झाला होता तर 30 यात्रेकरू जखमी झाले होते. दुचाकीवर स्वार झालेले दहशतवादी यात्रेकरूंच्या बसवर अंधाधुंद गोळीबार करून पसार झाले होते. दहशतवाद्यांचा उद्देश खरे तर जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील पोलीस चौकीवर हल्ला करण्याचा होता. मात्र, दुर्दैवाने त्याच वेळी यात्रेकरूंची बस तेथे आली, असे खान म्हणाले. अटक करण्यात आलेल्या तीन दहशतवाद्यांनी प्रत्यक्ष हल्ला करणार्‍या चार दहशतवाद्यांना वाहन आणि सुरक्षित आश्रयस्थान पुरविले होते, असेही खान यांनी सांगितले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: