Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
शिवराज चौकातील उड्डाण पूल वाहतुकीस खुला होणार कधी?
ऐक्य समूह
Monday, August 07, 2017 AT 11:35 AM (IST)
Tags: lo2
5सातारा, दि. 6 : पुणे-बंगळूर महामार्गाच्या सहा पदरीकरणाचे काम जागो जागी सुरू आहे. महामार्गावरील अजंठा चौक व शिवराज पेट्रोल पंपाजवळील उड्डाण पुलाचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. या पुलांचे राहिलेले काम त्वरित पूर्ण करुन हा उड्डाण पूल वाहतुकीस खुला करावा, अशी मागणी स्थानिकांबरोबरच वाहन चालकांमधून होत आहे.
उड्डाण पुलांचे काम अद्याप बाकी असल्यामुळे वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे. रस्ते अपुरे असल्यामुळे वाहतुकीवर ताण येत आहे.  त्यातच छेद रस्ता अथवा उड्डाण पुलाच्या परिसरातील ग्रामपंचायतींना जोडणारे रस्ते या रस्त्याला येऊन मिळत असल्यामुळे रस्ता ओलांडताना ग्रामस्थांना मोठी कसरत करावी लागते. अपघाताचे प्रमाण लक्षात घेवून अजंठा चौक व शिवराज पेट्रोल पंप येथे उड्डाण पूल व भुयारी मार्ग उभारण्यात आला आहे. पुलाचे काम बहुतांशी पूर्ण झाले आहे. रस्त्याचे काम काही ठिकाणी बाकी आहे. विलासपूर व संभाजीनगरला जोडणार्‍या शिवराज चौकातील भुयारी मार्गावरुन मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू आहे. वाहनांची संख्या पाहता हा भुयारी मार्ग वाहतुकीस अतिशय अरुंद आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. उड्डाण पुलाचे काम लवकर संपवून वाढलेली वाहतूक पुलावरुन वळविल्यास ताण कमी होण्यास मदत होणार आहे.
गेल्या दीड वर्षांपासून रिलायन्स कंपनीद्वारे हे काम सुरू होते. पुलाच्या व भुयारी मार्गाच्या कामामुळे या मार्गावरील वाहतूक सेवा रस्त्याने वळवण्यात आली होती. या काळात परिसरात राहणारे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, कामानिमित्त शहरात येणार्‍या जाणार्‍यांना बरीच पायपीट करावी लागत होती. परिणामी सर्वांनाच आर्थिक भुर्दंड सोसावा लागत होता. सध्या या दोन्ही ठिकाणच्या उड्डाण पुलाचे व भुयारी मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. परंतु इंदिरानगर ते बारावकरनगर या भागात वीज वाहक तार महामार्गावरुन जात असल्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेवून वाहतूक सुरू करण्यात आली नव्हती.
आता वीज मंडळाकडून अंडरग्राऊंड वायरिंगचे काम पूर्ण करण्यात आले आहे. महामार्गावरुन गेलेल्या वीज वाहक ताराही हटविण्यात आल्या आहेत. वीज वाहक तारांचा अडथळाही आता दूर झाला असल्यामुळे अजंठा चौक ते शिवराज चौक या दरम्यान सुरू असलेली सेवा रस्त्यावरील वाहतूक वळवून ती उड्डाण पुलावरुन सुरू केल्यास सेवा रस्त्यावरील वाहतुकीचा लोड कमी होवून त्याचा त्रास  कोणालाही होणार नाही. शिवाय अपघाताची टांगती तलवारही राहणार नाही.
अजंठा चौक परिसरातीलभुयारी मार्गावर विजेची सोय करा
कोडोली मार्गे रहिमतपूरकडे जाणार्‍या रस्त्यावर अजंठा चौकात उड्डाण पुलाचे काम पूर्ण झाले असले तरी पुलाखालून रहिमतपूरकडे जाण्यासाठी अद्याप हा मार्ग खुला करण्यात आलेला नाही. त्यामुळे वाहनांना पर्यायी भुयारी मार्गाचा वापर करावा लागतो. या रस्त्याच्या एका बाजूला वसाहत तर दुसर्‍या बाजूला पीडब्ल्यूडीची जागा आहे.  रात्रीच्या वेळी या भुयारी मार्गावर अंधार असतो. त्यामुळे कुटुंबासह प्रवास करणे धोक्याचे ठरते. अंधाराचा फायदा घेत या भुयारी मार्गावर अनेक वेळा लुटालुटीचे प्रकार झाले आहेत. तरी सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी वीजेची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
नव्या पुलांवर दारुच्या बाटल्यांचा खच
सध्या अजंठा चौक व शिवराज पेट्रोल पंप येथे सहापदरीकरणाचे काम सुरू आहे. महामार्गावर उभारण्यात आलेल्या उड्डाण पुलाच्या परिसरातील काही काम बाकी असल्यामुळे हा उड्डाण पूल वाहतुकीस बंद आहे. नेमका त्याचाच फायदा घेत परिसरातील लोकांच्या या पुलावर व पर्यायाने नव्या रस्त्यावर दारुच्या पार्ट्या रंगत आहेत. बिअरबार अथवा हॉटेल, ढाब्यावर बसून दारू पिणे महागात पडत असल्यामुळे दारुचे चाहते चार भिंत, कास पठार, अजिंक्यतारा, यवतेश्‍वर घाट, पाण्याची टाकी परिसरात बसून आपले शोक पूर्ण करतात. या जागा कमी पडत असतील म्हणून आता नव्या महामार्गावर रात्रीच्या पार्ट्या रंगू लागल्या आहेत. दारु पिल्यानंतर हे आंबट शौकीन बाटल्या महामार्गावरच फोडत असल्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर फुटलेल्या बाटल्या पहावयास मिळत आहेत. याची वेळीच दखल घेणे गरजेचे ठरणार आहे.
वाढे फाट्यावरील पुलाचे काय
अजंठा चौक, शिवराज पेट्रोल पंपाचा चौक त्याचप्रमाणे वाढे फाटा हे अपघाताचे ठिकाण म्हणून ओळखले जातात. अजंठा चौक, शिवराज पेट्रोल पंप परिसरात उड्डाण पूल व भुयारी मार्ग करण्यात आला आहे. परंतु वाढे फाट्यावरील उड्डाण पुलाचे काम रेंगाळले आहे. हे काम लवकरात लवकर हाती घेवून हा पूल लवकर पूर्ण करावा, अशी मागणी होत आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: