Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कोल्हापूरची अंबाबाई बडव्यांपासून मुक्त करणार
ऐक्य समूह
Friday, August 11, 2017 AT 11:35 AM (IST)
Tags: mn3
पगारदार पुजारी नेमणार : गृह राज्यमंत्र्यांचे आश्‍वासन
5मुंबई, दि. 10 (प्रतिनिधी) : गेली अनेक वर्षे मंदिरात ठाण मांडून बसलेल्या बडव्यांच्या कचाट्यातून आता कोल्हापूरच्या अंबाबाईची सुटका होणार आहे. या बडव्यांच्या जागी पगारदार पुजार्‍यांची नेमणूक करण्यात येणार असून त्याबाबतचा निर्णय येत्या तीन महिन्यांत घेतला जाईल. त्यासाठी पंढरपूर, शिर्डी देवस्थानच्या धर्तीवर कोल्हापूरच्या अंबाबाई देवस्थानासाठीही स्वतंत्र कायदा करणार असल्याचे गृह राज्यमंत्री रणजित पाटील यांनी गुरुवारी विधानसभेत सांगितले.
महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या कोल्हापूरच्या अंबाबाईला घागरा-चोळी नेसवण्याचा वाद आज विधिमंडळापर्यंत पोहोचला. कोल्हापूरचे शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर, प्रकाश आबिटकर, डॉ. सुजित मिणचेकर, चंद्रदीप नरके, काँग्रेसचे सत्यजित पाटील-सरुडकर यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. मुख्यमंत्र्यांनी अडीच वर्षांपूर्वी पश्‍चिम देवस्थान समितीच्या कोट्यवधींच्या घोटाळ्याची सीआयडी चौकशी करण्याची घोषणा केली होती. या घोषणेला अडीच वर्षे झाली तरी पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने केलेल्या भ्रष्टाचार प्रकरणी कारवाई होत नाही.
सीआयडी चौकशीचे पुढे काय झाले, हे स्पष्ट झालेले नाही, असे निदर्शनास आणून दिले. मंदिरातील गाभार्‍याच्या आतले पुजार्‍यांनी लुटायचे आणि बाहेरचे पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने लुटायचे, असा भाविकांच्या लुटालुटीचा खेळ वर्षानुवर्षे सुरू असल्याचा आरोप राजेश क्षीरसागर यांनी केला.
शिवसेनाप्रमुखांनी दिलेले धनुष्यबाण गायब
मंदिरातील सोन्याचे अलंकार, देवीचे चांदीचे दागिने, कोट्यवधींची रोकड, भाविकांनी देवीला अर्पण केलेल्या किंमती ऐवजावर पुजारी असलेल्या बडव्यांनीच डल्ला मारला आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी युती सरकार असताना अंबाबाईला अर्पण केलेले दोन किलो चांदीचे धनुष्यबाणही गायब झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. देवीच्या मूर्तीतून मोठ्या प्रमाणात एमसील व धातूच्या पट्ट्याही मिळाल्या आहेत. 1995 साली राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार असताना हे धातू मूर्तीत नव्हते, मग त्यानंतर ते कसे आढळून आले, असा सवालही करण्यात आला. अजित ठाणेकर या बडव्याने अंबाबाईचा साडीचोळी ही पारंपरिक वेशभूषा बदलून घागरा-चोळीची वेशभूषा परिधान केली. इतकेच नव्हे तर या पुजार्‍यांनी यापूर्वी अंबाबाईचे दोन डोळेही चोरले होते. बडव्यांकडून मूर्तीची विटंबना सुरू असून राजरोस होत असलेल्या या लुटीची एसआयटी चौकशी करण्याची मागणी करत अंबाबाईला बडव्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी शिवसेना आमदारांनी केली.
विधी आणि न्याय विभागाचा अभिप्राय घेऊन येत्या तीन महिन्यात याबाबत राज्य सरकार निर्णय घेईल. कोल्हापुरातील आमदारांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन याबाबत स्वतंत्र बैठक येत्या 15 दिवसांत घेण्यात येईल. सीआयडी चौकशीचा अहवाल अंतिम टप्प्यात असून येत्या 15 दिवसांत तो खुला केला जाईल, असेही राज्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
52 कोटींचा वाद न्यायालयात
गाभार्‍याबाहेरील जमा होणारी वर्षाची 52 कोटींची देणगी बडव्यांना न देता समितीला देण्याची मागणी पश्‍चिम देवस्थान समितीने केली होती. त्याला बडव्यांनी न्यायालयात आव्हान दिले. मात्र, गाभार्‍याच्या आतील कोट्यवधींच्या देणग्या, अलंकार पुजार्‍यांच्या खिशात जात असून वर्षाला हे पुजारी 350 कोटींची मालमत्ता जमवत असल्याचा गौप्यस्फोट क्षीरसागर यांनी केला. त्यामुळे अजित ठाणेकर या पुजार्‍याकडून देवीच्या पूजेचा हक्क काढून तो बहुजन समाजातील जुन्याजाणत्या मंडळींना देऊन त्यांना राज्य सरकारने पगारावर नेमावे, अशी सूचना शिवसेनेचे चंद्रदीप नरके यांनी केली. शासननियुक्त पुजार्‍याची नियुक्ती अंबाबाई मंदिरात करावी, असे त्यांनी सांगितले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: