Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
अमोल कांबळेला सात दिवसांची पोलीस कोठडी
ऐक्य समूह
Friday, August 11, 2017 AT 11:34 AM (IST)
Tags: re3
5वडूज, दि. 10 : खरीप निधीतील तीन कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी व खटावचा तत्कालीन तहसीलदार डॉ. अमोल कांबळे याला येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी. एम. झाटे यांनी सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
याबाबत माहिती अशी, खरीप निधीतील सुमारे तीन कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी तत्कालीन तहसीलदार डॉ. कांबळे याच्या विरोधात प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी वडूज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानंतर डॉ. कांबळे हा गायब होता. त्याचा शोध घेण्यासाठी वडूज पोलीस ठाण्यातील विशेष पथकाने उस्मानाबाद व अन्यत्र तपास केला होता. मात्र, डॉ. कांबळे हा अटकपूर्व जामिनासाठी सातारा येथे आल्याची माहिती मिळताच त्याला पोलिसांनी बुधवारी (दि. 9) सापळा रचून अटक केली होती. त्यानंतर गुरुवारी त्याला येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी झाटे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. शेतकर्‍यांसाठी आलेल्या खरीप पीक हंगामातील नुकसान भरपाईमधील दोन कोटी 93 लाख रुपयांचा अपहार झाला आहे. या अपहाराची व्याप्ती मोठी आहे. या प्रकरणाच्या चौकशीत डॉ. कांबळे याने लिपिक व एका व्यक्तीचा सहभाग असल्याची माहिती दिली आहे. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सखोल चौकशी करण्यासाठी त्यास दहा दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत शिर्के यांनी केली. संशयितावर शासनाच्या निधीचा अपहार केल्याचा गुन्हा आहे. या गुन्ह्यात भादंवि 409 या कलमाचा समावेश करण्यात यावा, असे मत सरकारी वकील अभिजित गोपलकर यांनी मांडले. डॉ. कांबळे याचे वकील पी. जी. नलवडे यांनीही बाजू मांडली. या प्रकरणातील बँक व्यवहारा-बाबत सर्व कागदपत्रे तहसीलदार कार्यालय व पोलिसांकडे आहेत.  
त्यामुळे डॉ. कांबळे याला पोलीस कोठडीची गरज नसल्याचा युक्तिवाद त्यांनी केला. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर झाटे यांनी डॉ. कांबळे याला सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. यावेळी न्यायालयाबाहेर नागरिकांची गर्दी झाली होती.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: