Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कोयना धरणातील पाणीसाठा शतकाच्या उंबरठ्यावर
ऐक्य समूह
Thursday, August 31, 2017 AT 11:21 AM (IST)
Tags: re3
99 टीएमसी पाणीसाठा; आ. शंभूराज देसाई यांनी केले जलपूजन
5पाटण, दि. 30 : कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून  बुधवारी शिवसागर जलाशयातील पाणी-साठा शतकाच्या उंबरठ्यावर पोहोचला. धरणात 40 हजार 662 क्युसेक्स प्रतिसेकंद पाण्याची आवक होत आहे.
पाणलोट क्षेत्रात सातत्याने समाधानकारक पाऊस पडत असल्याने कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरण्याकडे वाटचाल करत आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत कोयना धरणात 99 टीएमसी पाणीसाठा झाला होता.
कोयना धरण आजमितीस 94.06 टक्के भरले आहे. दरम्यान, आ. शंभूराज देसाई यांच्या हस्ते बुधवारी सकाळी विधिवत पूजा-अर्चा झाल्यानंतर शिवसागर जलाशयातील पाण्याचे जलपूजन करून खणा नारळाने ओटी भरण्यात आली.
यावेळी त्यांच्यासोबत कोयना धरणाच्या अधीक्षक अभियंता वैशाली नारकर, प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, कार्यकारी अभियंता ज्ञानेश्‍वर बागडे, उपविभागीय अभियंता शशिकांत चव्हाण, भूकंप संशोधन सहाय्यक डी. एम. चौधरी, कोयनानगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख जयवंतराव शेलार, माजी पंचायत समिती सदस्य हरीष भोमकर, साखर कारखान्याचे संचालक बबनराव भिसे, अशोकराव पाटील, शैलेंद्र शेलार, अभिजित पाटील व कोयना विभागातील ग्रामस्थ उपस्थित होते. 
याप्रसंगी उपविभागीय अभियंता शशिकांत चव्हाण हे सेवानिवृत्त होणार असल्याने त्यांचा सत्कार आ. शंभूराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आला. 
महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणार्‍या कोयना धरणाकडे सातत्याने महाराष्ट्रासह इतर राज्यातील जनतेचे काटेकोरपणे लक्ष असते. कर्नाटक राज्यातील जनतेसाठीही कोयना धरण वरदायिनी ठरले आहे. चालूवर्षी कोयना पाणलोट परिसरात चांगला पाऊस झाल्याने धरणाच्या
जलाशयात समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे कोयना
धरण पूर्ण क्षमतेने भरणार यात तीळमात्र शंका नाही. वीजनिर्मिती व पूर्वेकडे सिंचनासाठी महत्त्वाकांक्षी असणारा हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने
भरला तर जनतेमध्ये समाधानाचे वातावरण असते. जलाशयात पुरेसा पाणीसाठा झाल्याने राज्यातील सिंचनाचा प्रश्‍न व भारनियमनाचे संकट टळले आहे.
गेल्या चोवीस तासात कोयनानगर येथे 32 (3986), महाबळेश्‍वर 54 (4721), महाबळेश्‍वर 25 (3998) मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.  जलपातळी 2158 फूट 8 इंच व 657.962 मीटर  झाली आहे. परिसरात पावसाचा जोर कायम असल्याने जलाशयातील पाण्याची आवकही मोठ्या प्रमाणात वाढली असून 40 हजार 662 क्युसेक्स प्रतिसेकंद पाणी जलाशयात येत आहे. त्यामुळे धरणातील
पाणीसाठा आजमितीस 99 टीएमसी एवढा झाला आहे. गतवर्षी याच तारखेला कोयना धरणात तब्बल 102.65 टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक होता.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: