Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
डॉ. अनिल पंडित यांचे निधन
ऐक्य समूह
Thursday, August 31, 2017 AT 11:13 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 30 : येथील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ, सामाजिक कार्यात अग्रणी असणारे पर्यावरणप्रेमी आणि सामान्य गोरगरीब रुग्णांचे आधार असलेल्या जीवनज्योत हॉस्पिटलचे संस्थापक डॉ. अनिल पंडित यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. ते 69 वर्षांचे होते. त्यांनी मरणोत्तर देहदान करून समाजापुढे आदर्श ठेवला आहे.
1976 पासून स्त्रीरोग तज्ञ म्हणून त्यांनी आपल्या वैद्यकीय व्यवसायास प्रारंभ केला. सामान्य परिस्थितीतून शिक्षण घेवून त्यांनी वैद्यकीय व्यवसायास वाहून घेतले. शांत, निगर्वी  व मनमिळावू स्वभावाचे डॉ. अनिल पंडित गोरगरिबांना आपला आधार वाटत असत. रुग्णसेवा हे त्यांच्या जीवनाचे ध्येय होते. पैसा मिळवण्यासाठी त्यांनी आपल्या ध्येयाशी तडजोडी केल्या नाहीत. निसर्ग आणि पर्यावरणाचे त्यांना विलक्षण वेड होते. गोडोली शाहूनगरमधील आपल्या ‘फिनिक्स’ बंगल्याच्या परिसरात त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावून त्यांचे संगोपनही केले होते. आपल्या बंगल्यात त्यांनी प्रारंभीच्या काळात रोपवाटिका तयार करून शहरातील शेकडो लोकांना फुलझाडे आणि अन्य रोपेही दिली होती.
त्यांचे गोड बोलणेही रुग्णांना दिलासा देणारे असे. सातारा शहरातल्या अनेक स्त्री रोगतज्ञांना त्यांनी सातत्याने मार्गदर्शन केले होते.
सकाळी त्यांच्या निधनाची बातमी समजताच शहरातील डॉक्टर्स तसेच विविध क्षेत्रातील असंख्य व्यक्तींनी त्यांचे अंत्यदर्शन घेवून त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यांच्या पश्‍चात पत्नी डॉ. क्षितिजा पंडित, मुलगा चिन्मय, मुलगी अनुजा असा परिवार आहे.
कॅन्सरशी झुंज देतानाही डॉ. पंडित यांचा हसतमुख स्वभाव कायम राहिला. 
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: