Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
खिंडवाडी येथे अचानक ट्रक पेटल्याने वाहतूक ठप्प
ऐक्य समूह
Friday, September 01, 2017 AT 11:29 AM (IST)
Tags: lo3
वेलचीची पोती जळून खाक
5सातारा, दि. 31 : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खिंडवाडी येथे गुरुवारी सायंकाळी 6 वाजता ट्रकने अचानक पेट घेतल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. या घटनेने महामार्गावर खळबळ उडाली होती.  या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. दरम्यान, या दुर्घटनेत ट्रकमधील वेलचीचीपोती जळून खाक झाली तर ट्रकचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, बंगलोरवरुन खाण्याची वेलचीची पोती भरुन मुंबईकडे निघालेला ट्रक  (क्र. एम. एच. 11 -ए. एल. 5132) गुरुवारी सायंकाळी सातारा हद्दीतील खिंडवाडी येथे आल्यानंतर ट्रक चालकाला ट्रकच्या पाठीमागून धूर येत असल्याचे दिसले. त्याचवेळी अन्य वाहन चालकांनीही ट्रक चालकाला ट्रक थांबवण्यास सांगून गडबड असल्याचे सांगितले. चालकाने प्रसंगावधान राखत ट्रक रस्त्याच्या कडेला घेतला. ट्रक थांबवल्यानंतर तत्काळ ट्रकमधून बाहेर येवून पाठीमागे पाहिले असता ट्रकला आग लागली होती. ट्रक विझवण्यासाठी अग्नीशमन दलाच्या गाड्या पोहचेपर्यंत आगीने ट्रकला वेढला होता. ही आग भीषण होती. 
 त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती.  शहर पोलिसांना व अग्निशामक दलाला याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशामक दल आल्यानंतर आग विझवण्याचे प्रयत्न सुरु झालेे. अर्ध्या तासानंतर आग आटोक्यात आली. या सर्व घटनेनंतर दोन्ही लेनमधील प्रवाशांनी थरारक अनुभव घेत मोबाईलमध्ये फोटो काढले. फोटो काढण्यासाठीच मोठी गर्दी झाली होती.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: