Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पाकिस्तानमधील दहशतवादाचा मुद्दा ब्रिक्समध्ये उपस्थित करू नका
ऐक्य समूह
Saturday, September 02, 2017 AT 11:28 AM (IST)
Tags: na1
चीनचा मोदींना संदेश
5बिजींग, दि. 1 (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनमध्ये पार पडणार्‍या ब्रिक्स परिषदेला हजेरी लावणार आहेत. यावेळी पाकिस्तानशी संबंधित दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करू नका, असा अप्रत्यक्ष संदेश चीनने मोदी यांना दिला आहे. पाकिस्तानशी संबंधित दहशतवादाचा मुद्दा चर्चेला आल्यास आपला आक्षेप असेल असे चीनने सांगितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गतवर्षी गोवामध्ये पार पडलेल्या ब्रिक्स परिषदेत बोलताना पाकिस्तान म्हणजे दहशतवाद्यांचा अड्डा असल्याचं बोलले होते. यामुळे चीनला पुन्हा एकदा मोदी हा उल्लेख करतील अशी चिंता आहे.
पाकिस्तानशी संबंधित दहशत-वादाचा मुद्दा आला, की भारत नेहमीच आपली चिंता व्यक्त करताना दिसतो. ब्रिक्स परिषदेत चर्चा करण्यासाठी   हा योग्य विषय आहे असे मला वाटत नाही, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी सांगितले. हा विषय चर्चेला आला तर चिनी नेते आपला मित्रराष्ट्र पाकिस्तानची बाजू घेतील, ज्याचा परिणाम ब्रिक्स परिषदेवर होईल, असेही हुआ चुनयिंग यांनी सांगितले. ब्रिक्स परिषदेकडे जगाचे लक्ष लागलेले आहे. परिषद यशस्वी व्हावी याकरिता संबंधित पक्ष मदत करतील, अशी अपेक्षा आहे, असेही हुआ चुनयिंग यांनी सांगितले. ब्रिक्समधील पाचही देशांना त्यांचे हे आवाहन होते, ज्यामध्ये भारताचाही समावेश आहे. 3 सप्टेंबरला ब्रिक्स परिषद पार पडत आहे. भारत सध्या मजबूत स्थितीत आहे. कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीदेखील दहशतवाद्यांना आश्रय देण्यावरून पाकिस्तानला सुनावले आहे. आर्थिक मदत रोखण्याची धमकी दिली आहे. परिषदेत चिनी नेते पाकिस्तानचा बचाव करण्यासाठी पुढे सरसावण्याची शक्यता आहे. अफगाणिस्तानात हल्ले करणार्‍या देशांतर्गत दहशतवादी संघटनांचा बीमोड केला तरच 255 दशलक्ष डॉलर्सची लष्करी मदत मिळेल, असे अमेरिकेने पाकिस्तानला सुनावले आहे. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने ही माहिती काँग्रेसला दिली आहे. पाकिस्तानला लष्करी सहाय्य मिळेल, परंतु त्यासाठी दहशतवादाविरुद्ध त्यांनी लढा देण्याची पूर्वअट आहे, असे अमेरिकेने आवर्जून नमूद केले आहे. थोडक्यात, अमेरिकेने पाकिस्तानसाठी 255 दशलक्ष डॉलर्सच्या लष्करी सहाय्याची तरतूद केली आहे आणि पाकिस्तानने दहशतवादी संघटनांना काबूत ठेवले तरच ती रक्कम त्यांना प्रत्यक्षात मिळेल, अशी तजवीज केली आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: