Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
राज्यातील 7 हजार 576 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर
ऐक्य समूह
Saturday, September 02, 2017 AT 11:37 AM (IST)
Tags: mn3
सरपंचांची थेट निवडणूक, 7 व 14 ऑक्टोबरला दोन टप्प्यात मतदान
5मुंबई, दि. 1 (प्रतिनिधी) राज्यातील 7 हजार 576 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम राज्याचे निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी शुक्रवारी जाहीर केला. या निवडणुकीसाठी 7 आणि 14 ऑक्टोबर रोजी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. यावेळी प्रथमच सरपंचपदासाठी थेट निवडणूक होणार आहे. एकूण 80 हजार सदस्य ग्रामपंचायतींवर निवडून जाणार असून त्यातील पन्नास टक्के म्हणजे 40 हजार सदस्य या महिला असणार आहेत. निवडणूक होत असलेल्या क्षेत्रात शुक्रवारपासूनच आचारसंहिता लागू झाल्याची घोषणा निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी केली.
ज. स. सहारिया यांनी 7 हजार 576 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. नाशिक, औरंगाबाद, अमरावतीमधील 18 जिल्ह्यातील 3 हजार 884 ग्रामपंचायतींसाठी 7 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे तर 9 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. कोकण, पुणे, नागपूर महसुली विभागातील 16 जिल्ह्यातील 3 हजार 692 ग्रामपंचायतींसाठी 14 ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून 16 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.
प्रथमच सरपंचाची थेट निवडणूक
नगराध्यक्षपदाप्रमाणे प्रथमच सरपंच-पदासाठी थेट निवडणूक होणार आहे. मात्र ही निवड राजकीय पक्षाच्या आधारावर होणार नाही. त्यामुळे सरपंचपदाच्या उमेदवारांना राजकीय पक्षाचे चिन्ह वापरता येणार नाही. सरपंचपदाची 1 जानेवारी 1995 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेली व्यक्ती उमेदवार असल्यास तिला किमान सातवी इयत्ता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मतपत्रिकांना विविध रंगही देण्यात येणार आहेत.     सरपंचपदासाठीच्या मतपत्रिकेचा रंग फिकट निळा, अनुसूचित जातीच्या जागेसाठीचा रंग फिका गुलाबी, अनुसूचित जमातीसाठीचा फिका हिरवा, ओबीसीसाठी पिवळा तर सर्वसाधारण जागेसाठी रंग पांढरा असणार आहे. ज्या जिल्ह्यात एकूण ग्रामपंचायतींच्या 50 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त ग्रामपंचायतींच्या निवडणुका असल्यास संपूर्ण जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आचारसंहिता लागू असणार आहे. निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतीच्या लगतच्या भागातही आचारसंहिता लागू असणार आहे, असे सहारिया यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात 7 ऑक्टोबर रोजी मतदान होणार्‍या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या अशी : नाशिक-1170, धुळे-108, जळगाव-138, नंदुरबार-51, अहमदनगर- 204, औरंगाबाद- 212, बीड- 703, नांदेड- 171, परभणी- 126, उस्मानाबाद- 165, जालना-240, लातूर- 353, हिंगोली- 49, अमरावती-262, अकोला- 272, यवतमाळ- 93 वाशिम-287 आणि बुलडाणा- 280. एकूण-3884. दुसर्‍या टप्यात 14 ऑक्टोबर रोजी मतदान होणार्‍या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या अशी : ठाणे- 41, पालघर- 56, रायगड- 242, रत्नागिरी- 222, सिंधुदुर्ग- 325, पुणे-221, सोलापूर- 192, सातारा- 319, सांगली-453, कोल्हापूर- 478, नागपूर- 238, वर्धा-112, चंद्रपूर- 52, भंडारा- 362, गोंदिया-353 आणि गडचिरोली- 26. एकूण-3692.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: