Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
घरातील ज्येष्ठांच्या सतर्कतेमुळे चोरटा जेरबंद
ऐक्य समूह
Saturday, September 09, 2017 AT 11:18 AM (IST)
Tags: re1
सुरुर येथील घटना, 10 तोळे सोने वाचले
5भुईंज, दि. 8 : सुरुर, ता.वाई येथे मध्यरात्रीच्या वेळी घराच्या छपराची कौले काढून, आत प्रवेश करून सुमारे अडीच लाखांचे 10 तोळ्याचे दागिने घेवून पलायन करण्याच्या तयारीत असलेल्या चोरट्याला घरातील ज्येष्ठ नागरिकांच्या सतर्कतेमुळे पकडण्यात यश आले. दरम्यान, नागरिकांनी चोरट्यास पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. भूषण हेमंत चव्हाण यांनी पोलिसात तक्रार दिली आहे.
याबाबत भुईंज पोलिसांनी दिलेली माहिती अशी,  गुरुवार, दि.7 रोजी रात्री 11 च्या सुमारास भूषण चव्हाण व त्यांचे कुटुंबीय जेवण करून झोपी गेले. रात्री 12.15 च्या सुमारास आजोबा ग्यानबा दिनकर चव्हाण हे उठले. बाथरूमला जावून घरात येताना अचानक घरात शिरलेल्या चोरट्याने घराबाहेर पळण्याचा प्रयत्न केला. या आवाजाने भूषण चव्हाण जागे झाले व घराबाहेर पडू पाहणार्‍या चोरट्याचा ओरडत पाठलाग करू लागले. पावसाची रिपरिप असल्याने चोरटा चिखलात घसरून पडला. त्यास भूषण यांनी जावून पकडले व तसेच दाबून धरले. यावेळी झालेल्या आरडाओरड्यामुळे गावातील ग्राम सुरक्षा दलातील गस्तीवर असणारे अश्‍विन विठ्ठल चव्हाण, विक्रम शंकर चव्हाण, सागर शिवाजी चव्हाण, सनी चव्हाण, अक्षय सर्जेराव चव्हाण, दत्तात्रय शंकर चव्हाण व वडील हेमंत ग्यानबा चव्हाण तेथे आले व त्यांनी चोरट्यास पकडले. तेव्हा तो गावातील जकल्या रंग्या काळे असल्याचे लक्षात आले. त्यावेळी त्याच्या उजव्या हातात धारदार कुकरी सुद्धा ग्रामस्थांना आढळून आली. ती सागर चव्हाण याने काढून घेतली. भूषण हेमंत चव्हाण यांनी घरातील साहित्याची पाहणी केली तेव्हा कपाटातील साहित्य विस्कटलेले होते. कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे लक्षात आले. त्यामध्ये 4 तोळे सोन्याची चेन किंमत 1 लाख रुपये, दीड तोळेवजनाचा नेकलेस   किंमत 37 हजार 500 रुपये, 12 ग्रॅम वजनाचा सोन्याचा राणीहार किंमत 30 हजार रुपये, 5 गॅ्रम वजनाची सोन्याची अंगठी किंमत 12 हजार 500 रुपये असा सुमारे 10 तोळे 10 ग्रॅम किंमतीचा सुमारे 2 लाख 55 हजार रुपयांचा ऐवज जकल्या रंग्या काळे याच्याकडून सुमारे अर्ध्या तासात हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी जकल्या काळे याच्याविरोधी शस्त्रअस्त्र बाळगणे, त्याचा धाक दाखवून लुटणे आदी गुन्हे दाखल केले आहेत. या घटनेची नोंद भुईंज पोलिसात झाली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्गानंद साळी तपास करीत आहेत.


© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: