Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
तरडगावच्या वैद्यकीय अधिकार्‍याकडून नऊ लाखाची
ऐक्य समूह
Saturday, September 09, 2017 AT 11:35 AM (IST)
Tags: re4
खंडणी घेताना दोघा पशुवैद्यकीय अधिकार्‍यांना अटक
5लोणंद, दि. 8 : तरडगाव, ता. फलटण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी अनिल कदम यांनी माझ्या पत्नीचा गर्भपात केल्याचा आरोप व तक्रार करत पंधरा लाख रुपये द्या, अन्यथा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकरणात गुंतवू असे म्हणून वारंवार ब्लॅकमेल करून खंडणी मागणार्‍या पशुवैद्यकीय अधिकारी प्रवीण कदम व डॉ. नितीन टेळे (रा. गलांडवाडी, ता. दौंड, जि. पुणे) यांना सातारा गुन्हे अन्वेषण विभागाने नऊ लाखाची खंडणी घेताना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी दोघांच्या विरोधात लोणंद  पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे.
 तरडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या 20 वर्षांपासून  वैद्यकीय अधिकारी म्हणून नोकरी करणारे अनिल तुकाराम कदम  (वय 42,  रा. गिरवी, ता. फलटण) हे दि. 12/06/2017 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्रात दैनंदिन काम करत असताना सायंकाळी 5 च्या सुमारास सौ. हेमांगी कदम (रा. गलांडवाडी, ता. दौंड, जि. पुणे, माहेर करंजे, ता. बारामती) या स्वतःच्या आईबरोबर उपचारासाठी आल्या होत्या. विचारणा केल्यानंतर त्यांनी मी 5 महिन्यांची गरोदर असून अंगावरून पाणी व रक्त जात असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांनी अ‍ॅडमिट करून घेऊन उपचार करणे गरजेचे होते. 
यांना होणार्‍या अधिक त्रासामुळे त्यांचा गर्भपात झाला असल्याची माहिती त्यांच्या आईला व वडिलांना दवाखान्यातच दिली गेली. अधिक तपासाअंती त्या डॉ. प्रवीण कदम यांच्या पत्नी असल्याचे समोर आले. तद्नंतर एक महिन्याच्या कालावधीनंतर डॉ. प्रवीण कदम यांनी झालेल्या गर्भपाताची माहिती, माहिती अधिकारात मागितली. परंतु त्यांनी मागणी केलेल्या माहितीपैकी बरीचशी माहिती गोपनीय असल्याने डॉ. अनिल कदम यांना देता आली नाही. माहिती मिळावी म्हणून डॉ. प्रवीण कदम हे वारंवार मोबाईलद्वारे डॉ. अनिल तुकाराम कदम यांना संपर्क करू लागले व त्यांना शिवीगाळ, जिवे मारण्याची धमकी देऊ लागले.  होत असलेल्या अधिक त्रासामुळे डॉ.प्रवीण कदम यांचे नंबर डॉ. अनिल तुकाराम कदम यांनी ब्लॉक लिस्टमध्ये टाकले. या प्रकारानंतर डॉ. प्रवीण कदम यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे व जिल्हा शल्य चिकित्सकांकडे तक्रारी अर्ज केले. यानंतर विशेष तपासणी पथकही आले. त्यांना डॉ. अनिल कदम यांनी संपूर्ण माहिती दिली.  त्यानंतरही डॉ. प्रवीण कदम यांनी डॉ. अनिल कदम यांची व्हॉट्सअ‍ॅपद्वारे बदनामी सुरू केली. तसेच आरोग्यमंत्र्यांना या प्रकरणी कारवाई करण्यासाठी उपोषणास बसण्याचा इशारा अर्ज दिला. या सर्वांच्याकडील तक्रारी मागे घेतो म्हणून डॉ. प्रवीण कदम यांचे मित्र डॉ. नितीन टेळे (रा. दौंड) यांनी मोबाईलवर संपर्क साधून मध्यस्थीची भूमिका घेत डॉ. प्रवीण कदम यांना 15 लाख रुपये देण्याची मागणी केली. परंतु डॉ. अनिल कदम यांनी मी योग्य उपचार केले असून पैसे कशाला देऊ, असे उत्तर देताच आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या प्रकरणात गुंतवू, अशी धमकी दिली.
अखेर तडजोडकामी 10 लाखांची मागणी केली. पैसे फलटण येथे आणून देण्याचेही ठरले.  डॉ. अनिल कदम यांनी याबाबतची सर्व माहिती व हकिकत सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी घनवट यांना सांगून तक्रार दिली.  त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव यांनी सहकारी पोलीस कर्मचारी घेऊन सापळा लावून त्यास फलटण येथील ठिकाण बदलून तरडगाव नजीक वाईकर पेट्रोल पंप येथे बोलवण्यास सांगितले. 9 लाख रुपये देऊन हे प्रकरण इथेच तडजोडीने मिटवण्याचा बनाव झाला. त्या पद्धतीने वर व खाली 2 हजार रुपयांच्या नोटा व मध्य भागात कागद असलेले बंडल तयार करण्यात आले.  तरडगावनजीक वाईकर पेट्रोल पंपा जवळील धनश्री रेस्टॉरंट येथे डॉ. प्रवीण कदम व डॉ. नितीन टेळे हे पैसे घेण्यासाठी आले असता स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव यांनी  दोघांनाही  ताब्यात घेतले व लोणंद पोलीस ठाण्यात आणले.  याबाबत डॉ. अनिल तुकाराम कदम यांनी डॉ. प्रवीण कदम व डॉ. नितीन टेळे यांच्या विरोधात खंडणीची  तक्रार दिली आहे. लोणंद पोलीस ठाण्याचे सहाय्यक  पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश पवार  तपास करत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: