Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
बोगस जमीन व्यवहार प्रकरणी शिवसेनेच्या
ऐक्य समूह
Wednesday, September 13, 2017 AT 11:23 AM (IST)
Tags: re1
तालुका उपप्रमुखासह तिघांना 14 पर्यंत कोठडी
अनेक गैरव्यवहार उजेडात येण्याची शक्यता
5पाटण, दि. 12 : बनावट कागदपत्रांद्वारे संगन-मताने 3 एकर 7 गुंठे जमीन परस्पर विकून फसवणूक केल्या प्रकरणी सणबूर, ता. पाटण येथील 3 आरोपींना पाटणच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी गुरुवार दि. 14 पर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, यातील एक आरोपी सचिन पांडुरंग जाधव हा शिवसेनेचा तालुका उपप्रमुख असून त्याच्या अटकेने सणबूर परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, सणबूर, ता. पाटण येथील मंगल पांडुरंग जाधव (मयत), सचिन पांडुरंग जाधव, संभाजी परशराम शेवाळे, पांडुरंग आबा जाधव यांनी संगनमताने बनावट कागदपत्रांची पूर्तता करून दिनकर विठ्ठल जाधव यांच्या नावे असणार्‍या एकूण 3 एकर 7 गुंठे जमिनीचा पाटण येथील दुय्यम निबंधक कार्यालयात फिर्यादी मुंबईस्थित असताना   दि. 18 डिसेंबर 2012 रोजी बोगस दस्त केला व परस्पर जमीन विकून फसवणूक केली होती. याची फिर्याद दिनकर विठ्ठल जाधव (54, रा. सणबूर, सध्या. रा. कोपरखैरणे, नवी मुंबई) यांनी पाटण पोलिसात दिली होती. या प्रकरणी पाटण पोलिसांनी सणबूर येथील सचिन पांडुरंग जाधव, संभाजी परशराम शेवाळे, पांडुरंग आबा जाधव या तिघांना सोमवार, दि. 11 रोजी अटक करून पाटण येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले. त्या ठिकाणी गुन्ह्यातील बनावट कागदपत्रे तयार करण्यासाठी आरोपींना कोणी कोणी मदत केली, बनावट कागदपत्रांचा आरोपींनी आणखी कोठे वापर करून फसवणूक केली, बँक खाते आदी गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी न्यायालयात सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली. मात्र न्यायाधीशांनी वरील तिघा आरोपींना गुरुवार दि. 14 पर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक के. के. काळे करत आहेत.
दरम्यान, आरोपी सचिन पांडुरंग जाधव हा सणबूर येथील असून तो शिवसेनेचा पाटण तालुका उपप्रमुख म्हणून कार्यरत आहे. त्याने सणबूरसह परिसरातील अनेक जणांची फसवणूक केल्याची चर्चा परिसरात आहे. त्याच्या अटकेमुळे शिवसेना गोटात मोठी खळबळ माजली आहे. सचिन पांडुरंग जाधव याने कोपरखैरणे येथे पाटण तालुका रहिवासी मंडळाची स्थापना करून त्याचा तो स्वयंघोषित अध्यक्ष झाला होता. त्या माध्यमातून आपल्या पाठीमागे खूप मोठी युवकांची शक्ती असल्याचे त्याने पाटण तालुक्यातील शिवसेनेच्या नेतृत्वाला भासवल्यामुळे शिवसेनेच्या नेतृत्वाने सचिन जाधव याला पाटण तालुका शिवसेना उपप्रमुखपद बहाल केले. पंचायत समितीच्या निवडणुकीदरम्यान सचिन जाधव याने शिवसेनेकडे तिकीट मागितले असता ते नाकारल्यावरून त्याने भाजपमधून उमेदवारी भरली. त्या निवडणुकीत त्याला जेमतेम तीनचारशे मते मिळाली. तद्नंतर त्याने पुन्हा शिवसेना पक्षात प्रवेश केला. मात्र त्याचे एक एक काळे उपद्व्याप व कारनामे बाहेर येवू लागल्याने शिवसेनेच्या गोटात व ढेबेवाडी परिसरात मोठी खळबळ माजली असून त्याने अजून सहा- सात बोगस व्यवहार केले असल्याची चर्चा या विभागात सुरू आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: