Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
लाचखोर शाखा अभियंत्यास चार वर्षे सक्तमजुरीची शिक्षा
ऐक्य समूह
Friday, October 06, 2017 AT 11:35 AM (IST)
Tags: lo3
5सातारा, दि. 5 : कोरेगाव येथील लघु पाटबंधारे विभागाच्या धोम डावा कालवा शाखेचा अभियंता जयंत नारायण माने (वय 50) याला लाच मागणे व लाच स्वीकारल्या प्रकरणी 4 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली असून 25 हजार रूपये दंडही करण्यात आला आहे. 
याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदाराला धोम डाव्या कालव्याच्या क्रॉसिंगमधून पाइप-लाइन टाकण्यासाठी मंजुरी देण्यासाठी माने याने 10 हजार रूपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती 9 हजार रूपये देण्याचे ठरले होते. त्यानंतर तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाशी संपर्क साधला. त्यानंतर अधिकार्‍यांनी या प्रकरणाची खातरजमा केल्यानंतर माने याला सापळा रचून लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. याप्रकरणी मानेवर 20 ऑगस्ट 2015 रोजी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. 
या प्रकरणात एकूण 6 साक्षीदार तपासण्यात आले. त्यांची साक्ष ग्राह्य धरून 4 थे जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. के. चव्हाण यांनी माने याला लाच मागितल्या प्रकरणी 3 वर्ष सक्तमजुरी  व 10 हजार रूपये दंड आणि लाच स्वीकारल्या प्रकरणी 4 वर्षे सक्तमजुरी आणि 15 हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. या दोन्ही शिक्षा एकदमच भोगाव्या लागणार असल्याने माने याला एकूण 4 वर्षे सक्तमजुरी आणि 25 हजार दंड अशी शिक्षा झाली आहे.
सरकारी पक्षाच्या बाजूने सरकारी वकील अ‍ॅड. उर्मिला फडतरे यांनी काम पाहिले. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक बयाजी कुरणे यांनी केला. या कार्यवाहीत प्रॉसिक्युशन स्कॉडचे अनिल शिंदे, नंदा झांजुर्णे, विजय काटवटे, एल. पी. बेंद्रे यांनी सहकार्य केले.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: