Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
जळगावमध्ये वीज पडून आई व मुलाचा मृत्यू; वडील जखमी
ऐक्य समूह
Saturday, October 07, 2017 AT 11:35 AM (IST)
Tags: re1
5कोरेगाव, दि. 6 : जळगाव, ता. कोरेगाव येथे शुक्रवारी दुपारी वीज अंगावर पडल्याने सौ. शकुंतला भिकू कुंभार (वय 35) व त्यांचा मुलगा किशोर भिकू कुंभार वय 20 यांचा मृत्यू झाला. सौ. शकुंतला यांचे पती भिकू लक्ष्मण कुंभार यांना विजेचा जोरात धक्का बसला असून  त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी, भिकू कुंभार यांनी जळगाव-आसगाव रस्त्यावर असलेल्या आटाळी नावाच्या शिवारात एक एकर जमीन खंडाने घेतली असून त्यांची तिथे वहिवाट आहे. यावर्षी त्यांनी घेवड्याचे पीक घेतले होते. दोन दिवस अधून-मधून पाऊस येत असल्याने घेवड्याची काढणी लांबणीवर पडली होती. शुक्रवारी सकाळपासून पावसाने उघडीप घेतल्याने भिकू कुंभार, सौ. शकुंतला व किशोर हे तिघे जण शेतात गेले. 
त्यांनी घेवड्याचे पीक कापले आणि तेवढ्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली. तिघे जण घेवड्याचे ओझे डोक्यावर घेऊन एकामागे एक असे चालत घरी निघाले होते. तेवढ्याच कडकडाट होऊन वीज दोघांच्या अंगावर पडली. सौ. शुकंतला व किशोर यांचा जागीच मृत्यू झाला तर भिकू हे लांब फेकले गेले. विजेच्या धक्यामुळे ते बेशुद्ध झाले. दुपारपर्यंत पाऊस सुरू असल्याने आटाळी शिवाराकडे कोणीच फिरकले नाही. त्यामुळे कुंभार कुटुंबीयांवर वीज पडल्याची माहिती कोणालाच समजली नाही. सायंकाळी भिकू कुंभार यांना शुद्ध आल्यानंतर त्यांना पत्नी व मुलाचा मृत्यू झाल्याचे दिसले आणि त्यांनी जागेवरच हंबरडा फोडला. त्यांनी गावात जाऊन घटनेची माहिती दिली. त्यानंतर कोरेगाव पोलीस ठाण्यात घटनेची रीतसर माहिती देण्यात आली. पोलीस नाईक उदय जाधव, सनी आवटे, विशाल पवार यांच्यासह पोलीस कर्मचार्‍यांनी जळगाव येथे जाऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. भिकू कुंभार यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रात्री उशिरा सौ. शकुंतला व किशोर यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी कोरेगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. भिकू कुंभार यांनी
दिलेल्या फिर्यादीवरून दोघांची  आकस्मिक मृत्यू अशी पोलीस दफ्तरी नोंद करण्यात आली. हवालदार सत्यवान बसवंत व सहकारी तपास करत आहेत.
दोघांचा मृत्यू तर दोघे बचावले; कुंभार कुटुंबीयांवर काळाचा घाला
भिकू कुंभार हे गावात अजातशत्रू व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कुटुंबीयांना जमीन नसल्याने त्यांनी खंडाने शेती केली होती. यावर्षी पावसाने बर्‍यापैकी साथ दिल्याने त्यांनी घेवडा हे नगदी पीक घेतले होते. दिवाळीपूर्वी घेवडा काढायचा, असे त्यांचे नियोजन होते. त्याप्रमाणे त्यांनी शुक्रवारी शेतातून घेवडा काढला. पत्नी सौ. शकुंतला व मुलगा किशोर यांचा मृत्यू झाला असला तरी भिकू हे नशिबाने वाचले आहेत. त्यांची मुलगी अश्‍विनी ही कोरेगावात एका महाविद्यालयात शिक्षण घेते. शुक्रवारी ती महाविद्यालयात गेली असल्याने सुदैवाने बचावली. एकूणच कुंभार कुटुंबात दोघांचा मृत्यू झाला तर दोघे बचावले आहेत. जळगावमध्ये शोककळा पसरली असून किशोरच्या मृत्यूबाबत युवक वर्गातून हळहळ व्यक्त केली
जात आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: