Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
दोषींवर कडक कारवाई करणार : संदीप पाटील
ऐक्य समूह
Saturday, October 07, 2017 AT 11:21 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 6 :सातार्‍यात शुक्रवारी मध्य-रात्री सुरुची बंगल्यासमोर झालेल्या दोन गटातील मारामारीतील दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला आहे. सातार्‍यातील जनजीवन सुरळीत असून नागरिकांनी अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले.
पाटील म्हणाले, आनेवाडी टोलनाक्याच्या अनुषंगाने आणि दोन्ही गटातील मारामारीच्या प्रसंगावेळी पोलिसांनी संयमाची भूमिका घेऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ दिला नाही. दोन गटात मारामारी आणि बाचाबाची सुरु असताना पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. या प्रकरणी तीन गुन्हे दाखल झाले आहेत. शाहूपुरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, खासदार उदयनराजे भोसले गटाच्यावतीने अजिंक्य मोहिते, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाच्यावतीने विक्रम पवार यांनी  फिर्यादी दिल्या आहेत. त्यानुसार गुन्हे दाखल झाले असून आरोपींना पकडण्यासाठी पोलीस पथके तयार करण्यात आली आहेत. घटना घडल्यानंतर पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याने रात्री आणि शुक्रवारी शहरातील जनजीवन सुरळीत होते. समाजकंटकांवर पोलीस लक्ष ठेवून होते. घटना घडण्यापूर्वी पोलिसांनी दोन्ही गट आमने-सामने येऊ नयेत यासाठी आवश्यक ती काळजी घेतली होती. खासदार उदयनराजे यांना चार ठिकाणी अडवण्याचा प्रयत्नही पोलिसांनी केला. तरीही अनेपक्षित घटना घडली, त्या परिस्थितीत उपलब्ध पोलीस फौजफाट्यासह पोलिसांनी नियंत्रण मिळवले. घटनेच्या
ठिकाणी गोळीबार झाला असून हा गोळीबार पोलिसांनी केलेला नाही त्यामुळे तो कोणी केला याबाबत शोध सुरु आहे.  पोलिसांनी ठिकठिकाणी बंदोबस्त ठेवला होता. सुरुची बंगला आणि जलमंदिरकडे जाणारे रस्ते बंद करुन प्रतिबंधात्मक बंदोबस्त
ठेवला होता.
कायदा हा सर्वांना सारखाच आहे. लोकप्रतिनिधींवर कारवाई करताना सबळ पुरावा आवश्यक असतो. त्यामुळे कारवाईस वेळ लागतो. या प्रकरणाचा सखोल तपास होणार असून सर्व ठिकाणचे सी.सी.टी.व्ही. फुटेज ताब्यात घेऊन, पुरावे बघून दोषी असणार्‍या सर्वांवर कारवाई होणार आहे. पोलीस दल कृतीतून जनतेचा विश्‍वास संपादन करेल, जनतेमध्ये विश्‍वासार्ह वातावरण निर्माण होईल, अशी कठोर भूमिका घेऊ, असेही पाटील यांनी सांगितले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: