Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कृष्णेच्या शेतकी अधिकार्‍यासह पाच जणांना शिक्षा
ऐक्य समूह
Saturday, October 07, 2017 AT 11:38 AM (IST)
Tags: re2
5कराड, दि.6 : ऊस वाहतूकदारासह कंत्राटदार अशा सहा ते सात लोकांना कृष्णा कारखान्यासह ओंड येथील शेतकी कार्यालयात कोंडून ठेवल्या प्रकरणी कारखान्याच्या शेतकी अधिकार्‍यासह पाच जणांना प्रत्येकी 1 वर्षाची शिक्षा व 500 रुपये दंड न्यायालयाने ठोठावला. या प्रकरणी किशोर दिनकर डांगे (रा. वाघेरी, ता. कराड) यांनी फिर्याद दिली होती.
सरकारी वकिलांकडून मिळा-लेली माहिती अशी, ऊस मजूर वाहतुकीच्या करारातील 4 लाख 50 हजारांची रक्कम वसूल करण्यासाठी शेतकरी अधिकारी सुजय पवार याने फिर्यादी किशोर डांगे यांना बोलावून घेतले होते. डांगे यांनी रक्कम भरण्यास मुदत मागितल्यावर शेतकरी अधिकारी पवार याने वॉचमन जयवंत तातोबा थोरात,  बाबासाहेब दिनकर पाटील, जुबेर आलम मुल्ला, उमाजी बाबूराव सूर्यवंशी यांना बोलवत डांगे यांच्यासह इतर ऊस वाहतूकदार व कंत्राटदार अशा 7 जणांना दि.13 डिसेंबर 2011 ते दि.27 डिसेंबर 2011 या कालावधीत कोंडून ठेवले. त्यांची पोलिसांनी सुटका करून किशोर डांगे यांच्या फिर्यादीवरून कराड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. ए. तळेकर यांनी केला. तळेकर यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याची  सुनावणी न्यायाधीश आर. टी. घोगले यांच्यासमोर सुरू होती. सरकार पक्षातर्फे 11 साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षाचा पुरावा ग्राह्य मानून कोंडून ठेवल्याबद्दल 3 महिने शिक्षा तर दहा दिवसांपेक्षा जास्त दिवस कोंडून ठेवल्याबद्दल सहा महिने व प्रत्येकी 500 रुपये दंडाची शिक्षा सुनावली. गुप्त ठिकाणी ठेवल्याबद्दल प्रत्येकी 1 वर्षाची कैदेची शिक्षा सुनावली. या सुनावणीकामी सहाय्यक फौजदार कोळी व हवालदार आवाड यांनी सहकार्य केले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: