Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
चोरट्यांचा पाच लाखांच्या ऐवजावर डल्ला
ऐक्य समूह
Tuesday, October 10, 2017 AT 11:28 AM (IST)
Tags: re1
कराडच्या रुक्मिणीनगरमध्ये भरदिवसा घरफोडी

5कराड, दि. 9 : येथील रुक्मिणीनगरमधील यश-लक्ष्मी अपार्टमेंटमधील प्रमोद बबन पाटील (मूळ रा. वारुंजी, ता. कराड) यांचा फ्लॅट सोमवारी दुपारी फोडून चोरट्यांनी सुमारे पाच लाखांची रोकड व दागिन्यांवर डल्ला मारला. याबाबत प्रमोद पाटील यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या चोरीमुळे परिसरातील लोकांमध्येभीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेलीमाहिती अशी, वारुंजी, ता. कराड येथील प्रमोद बबन पाटील हे अनेक दिवसांपासून कराडच्या रुक्मिणीनगर येथे यशलक्ष्मी अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये वास्तव्यास आहेत. ते मुलाच्या वाढदिवसानिमित्त पत्नीसह कुटुंबातील सर्वांना घेवून रविवारी (दि. 8) वारुंजी येथे गेले होते. वाढदिवस साजरा करून ते सोमवारी दुपारी 3 च्या सुमारास कराडला परतले असता त्यांच्या फ्लॅटचा मुख्य दरवाजा उघडा असल्याचे दिसले. त्यांनी आत जाऊन पाहिले असता बेडरूममधील कपाट उघडे होते. कपाटातील चारही ड्रॉव्हर उचकटलेले दिसत होते. त्यांनी या घटनेची माहिती कराड शहर पोलिसांना दिली.
पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे हनुमंत गायकवाड व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. बेडरूममधील ड्रॉव्हरमधील सुमारे पाच लाख रुपयांची रोकड व सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे निष्पन्न झाले. 
 फ्लॅटच्या मुख्य दरवाजाचे कुलूप चावीनेच उघडल्याचे दिसत असून ते बनावट चावीच्या सहाय्याने उघडले असावे, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रमोद पाटील यांनी कपाटातील ड्रॉव्हरमध्ये प्लास्टिकच्या तीन पिशव्यांमध्ये साडेचार ते पाच लाख रुपयांची रक्कम ठेवली होती. चोरट्यांनी रोकड लांबवताना प्लास्टिकच्या पिशव्या तेथेच टाकून दिल्या. बेडरूममध्ये अंधार पडत असल्याने चोरट्यांनी लाईट व फॅन लावला होता. तो तसाच सुरू होता, असे पाटील यांनी पोलिसांनी सांगितले. त्यामुळे ही चोरी दुपारी तीनच्या काही वेळ आधी झाली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. चोरट्यांनी पाळत ठेवून फ्लॅट फोडल्याचा संशय असून पोलिसांनी त्या दृष्टीने तपास सुरू केला आहे. अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये गाड्या कोणी कुठे पार्क करायच्या, याचे फलक लावले आहेत. अपार्टमेंटच्या तीन बाजूंना झाडे लावण्यात आली असून प्रत्येक झाडाच्या शेजारी भिंतीवर फलक लावले आहेत. मात्र, सीसीटीव्ही कमेरे लावलेले नाहीत. अपार्टमेंटमध्ये स्वेच्छेने सेवा करणारेही दुपारी दोन ते तीन या वेळेत घरी गेले होते. त्याचा फायदा घेत चोरट्यांनी बनावट चावीने दरवाजा उघडला असावा. घटनास्थळी ठसे तज्ज्ञ व श्‍वानपथकाला पाचारण केले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: