Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पेट्रोल 2 रुपये, डिझेल 1 रुपयाने स्वस्त
ऐक्य समूह
Wednesday, October 11, 2017 AT 11:32 AM (IST)
Tags: mn2
मध्यरात्रीपासून होणार अंमलबजावणी
5मुंबई, दि. 10 (प्रतिनिधी) :महागाईमुळे बेजार असलेल्या जनतेला राज्य सरकारने पेट्रोल व डिझेलच्या दरात घट करून दिवाळीच्या तोंडावर दिलासा दिला आहे. पेट्रोलवरील मूल्यवर्धित कर (व्हॅट) प्रतिलिटर 2 रुपयांनी तर डिझेलवरील व्हॅट 1 रुपयाने कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मंगळवारी मध्यरात्रीपासून पेट्रोल-डिझेलचे नवीन दर लागू होणार असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. यामुळे राज्य सरकारवर 2 हजार 15 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे, असे त्यांनी सांगितले. राज्य सरकारने जनतेला दिलेली ही दिवाळी भेट असल्याचेही ते म्हणाले.
दरम्यान, केंद्र सरकारच्या आवाहनानुसार सर्वप्रथम गुजरात सरकारने पेट्रोल व डिझेलवरील व्हॅटमध्ये 4 टक्क्यांनी कपात करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे गुजरातमध्ये पेट्रोल जवळपास तीन रुपयांनी तर डिझेल पावणेतीन रुपयांनी स्वस्त होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रापेक्षा गुजरातमध्ये पेट्रोल व डिझेलच्या किमती कमी राहणार आहेत.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात गेल्या काही दिवसांत मोठी वाढ झाल्याने जनसामान्यांमध्ये प्रचंड रोष होता. केंद्र सरकारला चौफेर टीकेला तोंड द्यावे लागत होते. त्याची दखल घेऊन केंद्र सरकारने जनतेला दिलासा देण्यासाठी 4 ऑक्टोबर रोजी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात 2 रुपये प्रतिलिटर घट केली होती. त्यामुळे प्रत्यक्षात पेट्रोल अडीच रुपयांनी तर डिझेल सव्वादोन रुपयांनी स्वस्त झाले होते.     
राज्य सरकारांनीही व्हॅटमध्ये किमान 5 टक्के कपात करून जनतेला दिलासा द्यावा, अशी सूचना केंद्राने केली होती. पेट्रोल व डिझेलवरील विविध करांमुळे राज्य सरकारांना अधिक महसूल मिळतो, असे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले होते.
त्यानुसार राज्य सरकारने आता पेट्रोलवरील व्हॅटमध्ये 2 रुपये प्रतिलिटर तर डिझेलवरील व्हॅटमध्ये 1 रुपया घट करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी मध्यरात्रीपासून तातडीने नवे दर लागू होणार आहेत. केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात घट केल्याने राज्य सरकारच्या महसुलात दरवर्षी 1 हजार 52 कोटी तर आता व्हॅट कमी केल्याने 2 हजार 15 अशी एकूण 3 हजार 67 कोटी रुपयांची घट होणार आहे. राज्याची अर्थव्यवस्था सध्या फारशी चांगली नसली तरी हा आर्थिक बोजा राज्य सरकार सहन करणार असल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
दरम्यान, शेजारच्या गुजरात सरकारनेही पेट्रोल व डिझेलवरील व्हॅट 4 टक्क्यांनी कपात केली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या तुलनेत गुजरातमध्ये पेट्रोल व डिझेल अधिक स्वस्त होणार आहे. गुजरातमध्ये पेट्रोल 2.93 रुपये तर डिझेल 2.72 रुपयांनी स्वस्त होणार आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: