Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
माझ्यावर कोणाचे ‘प्रेशर’? : नांगरे-पाटील
ऐक्य समूह
Wednesday, October 11, 2017 AT 11:40 AM (IST)
Tags: lo1
सातारा पोलिसांची कारवाई निष्पक्षपातीपणे
5सातारा, दि. 10 ः कोजागिरीच्या मध्यरात्री आनेवाडी टोलनाक्यावर झालेली घटना आणि ‘सुरुची’ बंगल्यावर झालेल्या राजे समर्थकांच्या धुमश्‍चक्री प्रकरणात पोलीस निष्पक्षपाती भूमिकेने काम करत आहेत. या प्रकरणात माझ्यावर कोणाचेही ‘प्रेशर’ नाही, असे कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी मंगळवारी स्पष्ट केले.
पोलीस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील हे आज सातार्‍यामध्ये आले होते. सातारा शहरात आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या ‘सुरुची’ बंगल्यावर गुरुवारी (दि. 5) मध्यरात्री झालेला राडा आणि आनेवाडी टोलनाका येथे खा. उदयनराजे यांनी जाऊन टोलनाका बंद पाडल्याच्या पार्श्‍वभूमीवर ‘शिवतेज’ विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक संदीप पाटील व अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार उपस्थित होते.
राजे समर्थकांनी केलेल्या राड्यात सातारा पोलिसांनी अतिशय उत्तम आणि परिणामकारक कारवाई केली आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. या प्रकरणात सहभागी असलेल्या प्रत्येकाची भूमिका तपासण्यात येईल. जास्तीत जास्त लोकांवर गुन्हे दाखल करून पुढील कारवाई केली जाईल. गेल्या तीन दिवसांपासून संशयितांची घरपकड सुरू आहे. काही जणांचा शोध घेण्यासाठी पथके वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये रवाना झाली असून लवकरच दमदार कारवाई होईल. ही घटना काही मिनिटांत झाल्याने त्यामध्ये कोण कोण सहभागी होते, याची माहिती लगेच मिळू शकणार नाही. मात्र, सीसीटीव्ही कॅमेरे आणि मोबाईल फोन लोकेशनचा वापर करून संशयितांचा शोध घेतला जात आहे, असे नांगरे-पाटील यांनी सांगितले.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: