Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
जिल्ह्यातील धरणग्रस्तांचे प्रश्‍न मार्गी लागणार
ऐक्य समूह
Thursday, October 12, 2017 AT 11:33 AM (IST)
Tags: mn4
5मुंबई, दि. 11 (प्रतिनिधी) :सातारा जिल्ह्यातील कोयना, धोम व कण्हेर धरणग्रस्तांना पुनर्वसन केलेल्या ठिकाणी कसण्यासाठी जमीन मिळण्याचा 50 वर्षे प्रलंबित असलेला प्रश्‍न मार्गी लागला आहे. या धरणग्रस्तांना पर्यायी जमीन किंवा नुकसानभरपाई देण्यासाठी दोन महिन्यात निश्‍चित आराखडा तयार करण्याचे आदेश महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत.
भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांच्या नेतृत्वाखालील जनजागर प्रतिष्ठानच्या प्रतिनिधींनी आज महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन त्यांनी या प्रश्‍नांवर चर्चा केली.
भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, जनजागर प्रतिष्ठानचे माधव कुलकर्णी, देवराज देशमुख, संतोष दिघे व रामचंद्र वीरकर उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यातील कोयना, धोम व कण्हेर या धरणांसाठी ज्या शेतकर्‍यांच्या जमिनी संपादित केल्या, त्यांना पुनर्वसन केलेल्या ठिकाणी कसण्यासाठी पर्यायी जमिनी देण्याचा प्रश्‍न इतकी वर्षे झाली तरी सुटलेला नाही. या जमिनी मिळण्यासाठी कब्जेहक्काची रक्कम भरण्याची तयारी धरणग्रस्त शेतकर्‍यांनी दाखवली तरी सरकारी यंत्रणा पैसे भरून घेत नसल्याने पेच निर्माण झाला होता, याकडे जनजागर प्रतिष्ठानने महसूल मंत्र्यांचे लक्ष वेधले.   
पुनर्वसन झालेल्या धरणग्रस्तांना पर्यायी जमिनी देण्यासाठी कोणत्या जमिनी उपलब्ध आहेत, याची माहिती घेऊन ज्या धरणग्रस्तांची
मागणी आहे, त्यांना तत्काळ जमीन वाटप करावे, असे स्पष्ट आदेश पाटील यांनी दिले. ज्या धरणग्रस्तांना पर्यायी जमिनीऐवजी मोबदला हवा आहे, त्यांची मागणी मान्य करून नियमानुसार पॅकेज देण्याच्या सूचनाही पाटील यांनी दिल्या.
याच बैठकीत पालघर जिल्ह्यातील लेंडी, रायगड जिल्ह्यातील खालापूर व एचओसीएल प्रायव्हेट लिमिटेड या प्रकल्पांच्या दीर्घकाळ प्रलंबित प्रश्‍नांची चर्चा झाली. त्यांची कालबद्ध सोडवणूक करण्यासाठी महसूल मंत्र्यांनी स्पष्ट सूचना दिल्या.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: