Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
परांजपे ऑटोकास्टचे संस्थापक एन. जी. परांजपे यांचे निधन
ऐक्य समूह
Friday, October 13, 2017 AT 11:23 AM (IST)
Tags: lo2
5सातारा, दि. 12 : येथील परांजपे ऑटोकास्ट प्रा. लि., या कंपनीचे संस्थापक एन. जी. परांजपे यांचे नुकतेच पुणे येथे निधन झाले. पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचे कुटुंबीय, कंपनीतील कर्मचारी, मित्र वर्ग व कंपनीशी संबंधितांनी त्यांना आदरांजली वाहिली.   एन. जी. परांजपे यांचा जन्म कोकणातील देवगड तालुक्यातील मुटाट या छोट्याशा खेड्यात 1929 साली झाला. साधा उद्योजक होण्यासाठी लागणारी आर्थिक परिस्थिती व घरची औद्योगिक पार्श्‍वभूमी त्यांच्याजवळ नव्हती. आपत्तींनी खचून न जाता स्वकष्टावर श्रद्धा ठेऊन सतत प्रयत्न केले तर ध्येयापासून व यशापासून कोणीही फार काळ लांब राहू शकत नाही, असा त्यांचा इतका वर्षांचा अनुभव होता.
आर्थिक परिस्थितीमुळे मॅट्रिकच्या पुढे ते शिक्षण घेऊ शकले नाहीत. पण कुठे तरी कारकुनी करायचा हा विचार त्यांना रुचला नाही. मन काही तरी वेगळे करण्यासाठी ओढ घेत होते. शहरात जाऊन लहान-मोठे उद्योग, व्यवसाय करण्याची धडपड केली. जबरदस्त आत्मविश्‍वास आणि जिद्द हेच त्यांचे भांडवल. त्या जोरावर त्यांनी फौंड्री व्यवसायात प्रवेश केला. बर्‍याच खटपटीनंतर चांगले प्रावीण्य मिळवले. आज फौंड्री व्यवसायातील एक नामवंत व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांनी नाव कमावले.
नारायणरावांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक विशेष पैलू म्हणजे सामाजिक जीवन स्वच्छ, निर्मळ व निकोप असावे, अशी त्यांची धारणा होती. सार्वजनिक जीवनात नागरिकांनी माणुसकी आणि सचोटीने वागावे अशी त्यांची धारणा होती व त्यासाठी त्यांनी भरपूर काम केले. पाचगणीस्थित ‘मॉरल रिआर्मामेंट सेंटर’ या नामवंत संस्थेला त्यांचा आधार होता. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून सुरू केलेला आणि परिश्रमाने वाढवलेला परांजपे ऑटोकास्ट उद्योग समूह आज आपल्या गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी देश-विदेशात ओळखला जातो.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: