Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
हिमाचल प्रदेशात विधानसभा निवडणुकीचे बिगुल
vasudeo kulkarni
Friday, October 13, 2017 AT 11:21 AM (IST)
Tags: na2
9 नोव्हेंबरला मतदान, 18 डिसेंबरला मतमोजणी
5नवी दिल्ली, दि. 12 (वृत्तसंस्था) : केंद्रीय निवडणूक आयोगाने हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम गुरुवारी जाहीर केला. त्यानुसार हिमाचल प्रदेशातील 68 जागांसाठी 9 नोव्हेंबरला मतदान  तर 18 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार. राज्यात आजपासूनच आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
हिमाचल प्रदेश विधानसभेची सदस्यसंख्या 68 असून विद्यमान विधानसभेची मुदत 7 जानेवारी रोजी संपत आहे. त्याचबरोबर गुजरात विधानसभा निवडणूकही 18 डिसेंबरपूर्वी होईल, असे निवडणूक आयोगाने सांगितले. गुजरातमधील 182 जागांसाठी मतदान घेण्यात येणार असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त अचलकुमार ज्योती, निवडणूक आयुक्त ओमप्रकाश रावत आणि सुनील अरोरा यांनी सांगितले. मात्र, गुजरातच्या निवडणुकीची तारीख त्यांनी जाहीर केली नाही. या कार्यक्रमामुळे आम्हाला हिमाचल प्रदेश आणि गुजरातमध्ये एकाच वेळी मतमोजणी घेता येईल, असे अचलकुमार ज्योती म्हणाले. गुजरात विधानसभेची मुदत 22 जानेवारी रोजी संपत आहे.
या दोन्ही राज्यांच्या निवडणुकांना अतिशय महत्त्व आले आहे. या निवडणुकांमध्ये केवळ तेथील जनतेची नाडीच समजणार नाही तर 2019 च्या लोकसभा निवडणुकांसाठी त्या महत्त्वाच्या ठरणार आहेत.  या निवडणुकीमध्ये काही नव्या गोष्टींचाही समावेश करण्यात येणार आहे. त्यानुसार हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीत 7521 मतदान केंद्रांवर व्होटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपीएटी) जोडलेल्या ईव्हीएम मशीन्स वापरण्यात येणार आहे. त्याचबरोबर सर्व मतदान केंद्रांवर चित्रीकरणही होणार आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. त्यात चार राज्यांमध्ये भाजपने बाजी मारली. उत्तर प्रदेश व उत्तराखंड या राज्यांमध्ये भाजपने एकहाती सत्ता मिळवली असून गोवा व मणिपूरमध्ये अपक्ष व इतर पक्षांना बरोबर घेऊन सत्ता स्थापन केली आहे. 
काँग्रेसला केवळ पंजाबमध्ये यश मिळाले. मात्र, तेथे एकहाती सत्ता स्थापन केल्याने काँग्रेसला इतर निवडणुकांसाठी नवे बळ मिळाले आहे.
दरम्यान, गुजरातमध्ये विधानसभेचा कार्यकाळ जानेवारी महिन्यातील तिसर्‍या आठवड्यात संपणार असल्याने लवकरच येथील निवडणुकीच्या तारखाही जाहीर करण्यात येतील. तेथे 50 हजारांपेक्षा जास्त मतदान केंद्रांवर यंदा व्हीव्हीपीएटी असलेली ईव्हीएम मशीन्स वापरण्यात येणार आहेत. या तंत्रज्ञानाचा पहिल्यांदा गोवा विधानसभा निवडणुकीत वापर करण्यात आला होता.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: