Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पंचवीस लाखांच्या खंडणी प्रकरणी पाचगणीतील दाम्पत्यावर गुन्हा
ऐक्य समूह
Friday, October 13, 2017 AT 11:30 AM (IST)
Tags: re2
5पाचगणी, दि. 12 : हॉटेलचे बांधकाम अवैध आहे आणि तुमचा हॉटेल व्यवसाय बेकायदेशीर असल्याचे सांगून पाचगणीतील फजल पटाईत व त्याची पत्नी शेख फराह फजल पटाईत यांच्या विरोधात पाचगणी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. पाचगणी व महाबळेश्‍वर परिसरात माहितीच्या अधिकाराचा गैरवापर आणि दमदाटी करून पैसे उकळण्या विरोधात संघर्ष समितीने नुकताच मोर्चा काढला होता. त्यातूनच पटाईत दाम्पत्याचे उदाहरण समोर आल्याचे बोलले जात आहे.
याबाबत पाचगणी पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, 25 लाख  रुपयांची खंडणी मागितल्याबद्दल अशोक दिनकर कांबळे यांनी फजल करीम पटाईत व श्रीमती शेख फराह फजल करीम पटाईत यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, 2/7/2016 पासून 30/5/2017 पर्यंतच्या कालावधीत हॉटेल राहिल प्लाझा येथे येऊन आणि वाईतील हॉटेल प्यासा कोल्ड्रिंक्स येथून फजल करीम व त्याची पत्नी फराह यांनी मोबाईलवर फोन केला होता. तुमचे हॉटेल राहिल प्लाझाचे बांधकाम अवैध आहे. तुमचा हॉटेलचा व्यवसाय बेकायदेशीर आहे, असे म्हणून त्यांनी 25 लाख रुपयांची खंडणी मागितली. पैसे दिले नाहीत तर त्याचे परिणाम काय होतील ते पहा. पैसे दिले नाहीत तर आम्ही आत्महत्या करू, अशी धमकी त्यांनी दिली.
पाचगणी परिसरात असे प्रकार सुरू असून संघर्ष समितीच्या मोर्चानंतर पाचगणी पोलीस ठाण्यात दाखल झालेला हा दुसरा गुन्हा आहे. पोलिसांनी फजल पटाईत व शेख फराह पटाईत यांच्या विरोधात भा. दं. वि. कलम 387, 389, 120, 506, 507 नुसार गुन्हा दाखल केला आहे. एस. व्ही. कदम तपास करत आहेत. पटाईत दाम्पत्याने अनेक जणांना धमक्या देवून पैसे उकळले असून त्यांच्या चौकशीत अनेक प्रकार बाहेर येतील, अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: