Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
तलवार दाम्पत्याची निर्दोष मुक्तता
ऐक्य समूह
Friday, October 13, 2017 AT 11:16 AM (IST)
Tags: mn1
अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निकाल
5नवी दिल्ली, दि. 12 (वृत्तसंस्था) : दिल्लीजवळ नोएडा येथे मे 2008 मध्ये झालेल्या आरूषी तलवार आणि हेमराज खून खटल्यात आरूषीचे आई-वडील राजेश आणि नूपुर तलवार यांची अलाहाबाद उच्च न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. या दोघांना जन्मठेपेची शिक्षा देण्याचा सीबीआयच्या विशेष न्यायालयाचा निकाल उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवला. उच्च न्यायालयाने तलवार दाम्पत्याची संशयाचा फायदा देत निर्दोष मुक्तता केली आहे. दरम्यान, या निकालाने न्याय मिळाल्याची आणि न्याय-व्यवस्थेवरील आपला विश्‍वास आणखी दृढ झाल्याची प्रतिक्रिया तलवार दाम्पत्याने दिली आहे.
उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद येथील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने 25 नोव्हेंबर 2013 रोजी राजेश व नूपुर तलवार यांना त्यांची मुलगी आरूषी आणि नोकर हेमराज यांच्या खून प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. गेली आठ वर्षे गाझियाबादमधील डासना तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या तलवार दाम्पत्याने या निकालाविरुद्ध जानेवारी 2014 मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सीबीआय न्यायालयाच्या निर्णयाविरोधात राजेश आणि नूपुर तलवार यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात अपील केले होते.  
उच्च न्यायालयात राजेश आणि नूपुर यांच्या अपिलावर 1 ऑगस्ट 2017 पासून पुन्हा सुनावणी सुरू झाली होती. न्या. बालकृष्ण नारायण आणि न्या. अरविंदकुमार मिश्र यांच्या खंडपीठाने सीबीआयच्या आरोपपत्रातील विरोधाभासामुळे या प्रकरणाची पुन्हा सुनावणी करणार असल्याचे म्हटले होते. न्या. नारायण आणि न्या. मिश्रा यांच्या खंडपीठाने 7 सप्टेंबर रोजी आपला निर्णय राखून ठेवला होता.
15 आणि 16 मे 2008 या दरम्यानच्या रात्री दिल्लीचे उपनगर असलेल्या नोएडा येथील दंतवैद्य डॉ. राजेश व नुपूर तलवार या दाम्पत्याच्या जलवायू विहार या निवासस्थानी त्यांची 14 वर्षांची मुलगी आरूषी हिचा मृतदेह आढळून आला होता. आरूषी आपल्या खोलीत मृत आढळून आली होती. तीक्ष्ण शस्त्राने तिचा गळा चिरण्यात आला होता. खून झाला तेव्हा आरूषीच्या 15 व्या वाढदिवसाला आठ दिवस बाकी होते. सुरूवातीला या खुनाबद्दल संशयाची सुई तलवार यांच्या घरातील नोकर हेमराजकडे वळली होती. मात्र, दोन दिवसानंतर घराच्या गच्चीवर त्याचाही मृतदेह आढळला होता.
या खून प्रकरणामुळे देशभरात खळबळ उडाली होती. देशभरातील माध्यमांमध्ये चर्चिल्या गेलेल्या या प्रकरणात उत्तर प्रदेश पोलिसांच्या तपासावर टीका होत होती. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री मायावती यांनी 15 दिवसांत या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला होता. या प्रकरणात सीबीआयचा तपासही वादग्रस्त ठरला होता. सीबीआयच्या दोन पथकांनी या खुनांचा तपास केला होता. दोन्ही पथकांचे तपासाचे निष्कर्ष वेगवेगळे होते. एका पथकाने या खुनाची उकल शास्त्रीय पुराव्यांच्या आधारे करण्यात यश आल्याचे म्हटले होते. त्यासाठी त्यांनी नार्को तज्ज्ञांच्या अहवालाचा आधार घेतला होता. या प्रकरणी सीबीआयने तलवार दाम्पत्यासह डॉ. राजेश तलवार यांचा कम्पाऊंडर कृष्णा व दोन नोकरांना अटक केली होती. मात्र, या तिघांविरुद्ध सीबीआयला योग्य वेळेत आरोपपपत्र दाखल करता न आल्याने त्यांची सुटका झाली होती.
त्यानंतर सीबीआयने या प्रकरणाच्या तपासासाठी दुसरे पथक स्थापन केले होते. हे पथक न्यायालयात प्रकरण बंद करण्याचा अहवाल सादर करण्यासाठी स्थापन करण्यात आले होते. या दोन्ही खुनांसाठी कोणावरही आरोप ठेवण्यासाठी पुरेसे पुरावे आढळले नसल्याचे या पथकाने म्हटले होते. मात्र, सीबीआयच्या विशेष न्यायालयाने या पथकाचा ‘क्लोजर रिपोर्ट’ फेटाळताना आधीच्या पुराव्यांच्या आधारे तलवार दाम्पत्यावर खटला चालवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर या खटल्यात सीबीआय न्यायालयाने परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे तलवार दाम्पत्याला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या निकालाला त्यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने आज आपला निकाल देताना सबळ पुराव्याअभावी तलवार दाम्पत्याची निर्दोष मुक्तता केली. सीबीआयच्या तपासात अनेक कच्चे दुवे असून सीबीआयला पुरेसे पुरावे सादर करता आले नसल्याचे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले.
दरम्यान, निकालाची प्रत हाती आल्यानंतर पुढील निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया सीबीआयने निकालानंतर दिली. न्यायालयाच्या या निर्णयावर तलवार दाम्पत्य खूश असल्याचे डासना तुरुंगाचे अधिकारी डॉ. मौर्य यांनी माध्यमांना सांगितले.
‘तलवार’मधून प्रकाश
आरुषी आणि हेमराज यांच्या गूढ हत्या प्रकरणाला अनेक नाट्यमय वळणे मिळाली. भारतातच नव्हे परदेशातही हे प्रकरण सतत हेडलाइनमध्ये राहिले. या गूढ हत्याकांडावर प्रकाश टाकणारा ‘तलवार’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याला समीक्षकांची पसंती मिळाली होती. जंगली पिक्चर्सच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती. विनीत जैन आणि विशाल भारद्वाज हे चित्रपटाचे निर्माता होते तर मेघना गुलजार यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. आता उच्च न्यायालयाच्या निकालानंतर चित्रपटाच्या निर्मात्यांनीही आनंद व्यक्त केला आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: