Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

ईडन गार्डन्सवर लकमालची ‘लकाकी’
ऐक्य समूह
Friday, November 17, 2017 AT 11:22 AM (IST)
Tags: sp1
5कोलकाता, दि. 16 (वृत्तसंस्था) : भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर सुरू झालेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी पाऊस आणि अंधुक प्रकाशामुळे केवळ 11.5 षटकांचा खेळ होऊ शकला. मात्र, या खेळातही श्रीलंकेने टीम इंडियाची 3 बाद 17 अशी दाणादाण उडवली. मध्यमगती गोलंदाज सुरंगा लकमालने अनुकूल खेळपट्टी आणि ढगाळ हवामानाचा लाभ उठवत तब्बल सहा षटके निर्धाव टाकून तिन्ही बळी घेतले.
ईडन गार्डन्सवर पहिल्या कसोटीत नाणेफेक जिंकून श्रीलंकेचा कर्णधार दिनेश चंदिमलने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय सुरंगा लकमालच्या अप्रतिम गोलंदाजीमुळे सार्थ ठरला. दिवसभरात केवळ 71 चेंडूंचाच खेळ होऊ शकला. पाऊस आणि अंधुक प्रकाशामुळे खेळ लवकरच थांबवावा लागला. मात्र, लकमालने भारतीय संघाला तीन जोरदार झटके दिले. त्याने 6 षटकांच्या स्पेलमध्ये सर्व षटके निर्धाव टाकून तीन बळी घेतले. आजच्या दिवसाचा लकमाल हा हिरो ठरला. लकमालने कसोटीच्या पहिल्याच चेंडूवर लोकेश राहुलला पायचित पकडले. त्यानंतर दुसरा सलामीवीर शिखर धवनलाही त्याने शून्यावर यष्टीमागे झेल द्यायला भाग पाडले. त्यानंतर फलंदाजीस उतरलेल्या विराट कोहलीची खेळी केवळ 11 चेंडू
टिकली. त्यालाही लकमालने पायचित पकडले. या तिन्ही फलंदाजांना धावांचे खाते
उघडता आले नाही. अंधुक प्रकाशामुळे पंचांनी पहिल्या दिवसाचा खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी चेतेश्‍वर पुजारा 8 धावांवर तर अजिंक्य रहाणे शून्यावर खेळत होता. पुजाराने तब्बल 46 चेंडूंचा सामना केला. खेळ थांबल्यानंतर पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे उर्वरित दिवसाचा
खेळही गुंडाळावा लागला.
उद्या पावसाने कृपा केल्यास
खेळ निर्धारित वेळेच्या
आधी सुरू करण्यात येईल. दरम्यान, दिवसाच्या खेळात एखाद्या गोलंदाजाने एकही
धाव न देता तीन बळी घेण्याचा पराक्रम भारतात तब्बल 58 वर्षांनी घडला. यापूर्वी 1959 मध्ये ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज रिची बेनॉ यांनी दिल्लीच्या फिरोजशाह कोटलावर दिवसभराच्या खेळात एकही धाव न देता तीन बळी घेतले होते.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: