Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

‘रनमशीन’
ऐक्य समूह
Tuesday, November 21, 2017 AT 11:01 AM (IST)
Tags: sp1
5कोलकाता, दि. 20 (वृत्तसंस्था) : भारतीय क्रिकेट संघाचे ‘रनमशीन’ अशी बिरुदावली मिरवणार्‍या कर्णधार विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत शतकांचे ‘अर्धशतक’ पूर्ण करून सोमवारी आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला.
श्रीलंकेविरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटीत आज कोहलीने कसोटी कारकिर्दीतील 18 वे शतक ठोकले. कोहलीने एकदिवसीय कारकिर्दीत 32 शतके ठोकली असून आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्याच्या खात्यावर आता 50 शतके जमा  झाली आहेत. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील सर्वात जलद शतकांचे अर्धशतक करण्याच्या दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम आमलाची बरोबरी आज विराटने केली. या दोघांनीही कसोटी व एकदिवसीय क्रिकेटमध्ये 348 डाव खेळून हा पराक्रम केला आहे.
ऑगस्ट 2008 मध्ये भारताच्या एकदिवसीय संघात पदार्पण करणार्‍या विराट कोहलीने आपल्या 9 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. एकदिवसीय कारकिर्दीत त्याच्या नावावर 32 शतके असून  कसोटी कारकिर्दीतील 18 वे शतक त्याने आज कोलकाता येथे श्रीलंकेविरुद्ध ठोकले. या आधी त्याने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पाँटिंगचा 30 एकदिवसीय शतकांचा विक्रम मागे टाकला होता. आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचे अर्धशतक पूर्ण करणारा तो एकूण आठवा आणि तिसरा भारतीय फलंदाज बनला आहे. सचिन तेंडुलकर 100 शतके, रिकी पाँटिंग 71 शतके, कुमार संगकारा 63
शतके, जॅक कॅलिस 62 शतके, महेला जयवर्धने व हाशिम आमला प्रत्येकी 54 शतके आणि ब्रायन लारा 53, हे खेळाडू कोहलीच्या पुढे आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सचिननंतर सर्वाधिक शतकेही कोहलीच्या नावावर आहेत. कोहलीने आतापर्यंत 61 कसोटी सामन्यांमधील 103 डावांमध्ये 18 शतके आणि 14 अर्धशतके ठोकली आहेत. कसोटी कारकिर्दीत त्याने आतापर्यंत 50.12 च्या सरासरीने 4762 धावा केल्या असून एका डावात 235 धावा ही त्याची सर्वोच्च कामगिरी आहे. त्याचबरोबर विराटने 202 एकदिवसीय सामन्यांमधील 194 डावांमध्ये 32 शतके व 45 अर्धशतके ठोकली आहेत. त्याने 55.74 च्या अद्भुत सरासरीने 9030 धावा केल्या असून 183 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. मात्र, कोहलीला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये अजून शतक झळकवता आलेले नाही.
कोलकाता कसोटीत कोहलीच्या नावावर आणखी काही विक्रम झाले आहेत. कसोटीतील पहिल्या डावात शून्य आणि दुसर्‍या डावात शतक झळकवणारा विराट हा पहिला भारतीय कर्णधार ठरला असून ही किमया साधणारा तो 18 वा फलंदाज ठरला आहे. त्याचबरोबर एका वर्षात जास्तीत जास्त कसोटी डावांमध्ये 50 पेक्षा जास्त धावा करणार्‍या भारतीय कर्णधारांच्या यादीत विराट दुसर्‍या स्थानावर आहे. त्यामध्ये माजी कर्णधार राहुल द्रविड (19 वेळा) हा विराटच्या पुढे आहे तर माजी कर्णधार सौरव गांगुली (17 वेळा) तिसर्‍या स्थानावर आहे. भारतीय कसोटी संघाचा कर्णधार म्हणून विराटने 11 शतके ठोकताना माजी कर्णधार सुनील गावसकर यांची बरोबरी केली आहे. त्याच्यानंतर मोहम्मद अझरुद्दीन (9 शतके) व सचिन तेंडुलकर (7 शतके) यांचे स्थान आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षात 9 शतके ठोकणारा विराट हा चौथा कर्णधार ठरला आहे. या आधी रिकी पाँटिंगने 2005 आणि 2006 अशी सलग दोन वर्षे तर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार ग्रॅम स्मिथने 2005 मध्ये हा पराक्रम केला होता. त्याचबरोबर विराट कोहलीने आतापर्यंतच्या कसोटी कारकिर्दीत जलद शतक आज लंकेविरुद्ध ठोकले. कोहलीने 119 चेंडूत 12 चौकार व 2 षटकारांसह नाबाद 104 धावा करताना आपलाच 129 चेंडूंमधील वेगवान शतकाचा विक्रम मोडला. विराटने न्यूझीलंडविरुद्ध खेळताना 129 चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले होते.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: