Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  विशेष लेख  >>  बातम्या

पाटीदार संघटनेत फूट
vasudeo kulkarni
Wednesday, November 22, 2017 AT 11:33 AM (IST)
Tags: vi1
गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा पराभव करायसाठी काँग्रेस पक्षाने धूर्तपणे पाटीदारांच्या संघटनेशी निवडणूक युती केली असली, तरी काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर करताच या संघटनेत फूट पडली आहे. गेल्या आठवडाभर पाटीदार आरक्षण आंदोलन समितीचे नेते हार्दिक पटेल आणि काँग्रेसच्या नेत्यांशी मतदार संघाच्या वाटपावरून चर्चा सुरू होती. रविवारी रात्री उभय नेत्यांत साडेचार तास चर्चा झाल्यावर काँग्रेसने 72 उमेदवारांच्या जाहीर केलेल्या  पहिल्या यादीत 22 पाटीदार नेत्यांना उमेदवारी देण्यात आली. पण, काँग्रेसने आपला विश्‍वासघात केल्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारावर बहिष्कार घालायची धमकी पाटीदार आरक्षण समितीच्या नेत्यांनी दिल्याने खळबळ उडाली आहे. ललित वसोवा आणि अमित पटेल या आंदोलन समितीच्या नेत्यांची नावे काँग्रेसने आपल्याला विश्‍वासात न घेता जाहीर केल्याचे आणि सर्व मागण्या मान्य झाल्या नसल्याचा आरोप हार्दिक पटेल यांनीही जाहीरपणे केला. काँग्रेस उमेदवारांची यादी जाहीर होताच पक्षाच्या सुरत येथील कार्यालयात घुसून पाटीदार आंदोलन समितीच्या नेत्यांनी प्रचंड गोंधळ घातला. घोषणाबाजी केली. कार्यालयातील फर्निचरची मोडतोडही केली. काँग्रेस आणि पटेल आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांत हाणामार्‍याही झाल्या. राजधानी अहमदाबादच्या काँग्रेस पक्षाच्या कार्यालयातही पाटीदार समाजाच्या संतप्त कार्यकर्त्यांनी राडा केला. मध्यरात्रीपर्यंत हा गोंधळ सुरूच होता. पाटीदार आरक्षण आंदोलन समितीचे निमंत्रक मालवीय धर्मा यांनी काँग्रेसच्या कट कारस्थानावर जोरदार हल्ला चढवत, या निवडणुकीत काँग्रेसची अवस्था भारतीय जनता पक्षासारखी करू, अशी धमकी दिली आहे. ज्या दोन नेत्यांची नावे त्यांच्या सहमतीशिवाय काँग्रेसने उमेदवार यादीत जाहीर केली, त्याबद्दल पाटीदार आरक्षण आंदोलन समितीत असंतोष निर्माण झाला आहे.
गेल्याच आठवड्यात हार्दिक पटेल याच्या चार ‘सेक्स सिडी’           उपग्रह वृत्तवाहिन्यांवरून प्रक्षेपित झाल्यानंतर, भाजपच्या नेत्यांनी अधिक आक्रमक होत पाटीदार नेत्यांच्या वर्तनाचा जाहीर पंचनामा सुरू केला आहे तर या सीडी बनावट असल्याचा पवित्रा हार्दिक पटेल याने घेतला असला, तरी याच मुद्द्यावर आरोप प्रत्यारोपांची चिखलफेक सुरूच आहे.
भारतीय जनता पक्षाने या आधीच 106 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यात 23 पटेल, 12 कोळी, 7 दलित समाजाच्या नेत्यांचा समावेश आहे. गेल्यावेळी निवडणूक लढवणार्‍या बहुतांश उमेदवारांना उमेदवारी देतानाच या पक्षाने सध्याच्या 20 आमदारांना उमेदवारी नाकारली आहे. पक्षाचे 82 वर्षे वयाचे खासदार लीलाधर वाघेला यांनी आपला मुलगा दिलीप वाघेला याला डिसा मतदारसंघातून उमेदवारी दिली नाही, तर पक्ष सोडायची धमकी दिली आहे. काँग्रेसने आपल्या सर्वच्या सर्व पाच अटी मान्य केल्या नसल्याने त्या पक्षाशी झालेला निवडणूक समझोता धोक्यात असल्याचा इशारा पाटीदार आरक्षण आंदोलन समितीच्या नेत्यांनी दिल्याने निवडणुकीत रंग भरला आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: