Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
संशयित महिलांच्या शोधासाठी पोलिसांचे छापे
ऐक्य समूह
Tuesday, January 09, 2018 AT 11:22 AM (IST)
Tags: re1
अशोकराव पोतलेकर यांच्याकडे खंडणीची मागणी
5कराड, दि. 8 : कराड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अशोकराव पाटील-पोतलेकर यांना खंडणी मागून आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या भूमाता ब्रिगेडच्या महिला कार्यकर्त्यांसह पाच संशयित महिलांच्या शोधासाठी कराड शहर पोलिसांनी सोमवारी ठिकठिकाणी छापे टाकले. मात्र, संशयित महिला पोलिसांच्या हाती लागल्या नाहीत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, कराड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अशोकराव पाटील - पोतलेकर यांनी आठ-दहा दिवसांपूर्वी आपल्या घरात विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांच्यावर पुणे येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तेथे पोतलेकर यांनी पोलिसांना जबाब दिला. त्यामध्ये त्यांनी माधुरी सोनटक्के, माधुरी टोणपे व अन्य तीन महिलांविरोधात तक्रार दिली आहे. माधुरी सोनटक्के हिच्या फिर्यादीवरून अशोकराव पाटील - पोतलेकर यांच्यावर बलात्कार व अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्याकडून पैसे घेऊन तिने तो गुन्हा मागे घेतला होता. मात्र, त्या महिलेला प्रत्येक आठवड्याला भेटावे आणि दहा लाख रुपये व फ्लॅट घेऊन द्यावा, या मागणीसाठी पोतलेकर यांना वारंवार धमकावले जात होते. याबाबत पोतलेकर यांच्या तक्रारीवरून माधुरी प्रकाश सोनटक्के (वय 32, रा. हिंगणगाव, ता. कडेगाव, जि. सांगली), भूमाता ब्रिगेडची कार्यकर्ती माधुरी टोणपे (रा. टेंभू, ता. कराड) व अन्य तीन महिलांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या पाच संशयित महिलांनी दिलेल्या मानसिक त्रासामुळे आपण आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे पोतलेकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपिका जौंजाळ व कर्मचार्‍यांनी संशयित महिलांच्या शोधासाठी सोमवारी विविध ठिकाणी छापे टाकले. मात्र, त्यामध्ये संशयित महिला हाती लागल्या नसून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: