Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

पहिल्याच कसोटीत टीम इंडियाचा नक्षा उतरला
ऐक्य समूह
Tuesday, January 09, 2018 AT 11:34 AM (IST)
Tags: sp1
फिलँडरच्या वादळामुळे आफ्रिका 72 धावांनी विजयी
5केपटाऊन, दि. 8 (वृत्तसंस्था) : गोलंदाजांनी यजमान दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव 130 धावांमध्येच गुंडाळल्यानंतर भारतीय संघ दुसर्‍या डावात चांगली फलंदाजी करुन विजयासाठी असलेले 208 धावांचे लक्ष्य गाठेल, असे वाटत असतानाच भारतीय फलंदाजांनी दुसर्‍या डावातही हाराकिरी केली. व्हरनॉन फिलँडरच्या वादळी गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजीच्या ठिकर्‍या उडाल्या. फिलँडरने 42 धावांतच सहा बळी घेऊन यजमान दक्षिण आफ्रिकेला पहिल्या कसोटीत 72 धावांनी विजय मिळवून दिला. भारताचा दुसरा डाव अवघ्या 135 धावसंख्येत संपुष्टात आला. मायदेशात वाघ असलेल्या भारतीय संघाचा नक्षा दक्षिण आफ्रिकेने पहिल्याच कसोटीत उतरवला आहे. भारतीय गोलंदाजांनी कमावले आणि फलंदाजांनी गमावले, हे पुन्हा एकदा वाट्याला आले.
चहापानाच्या सत्रापर्यंत भारताने आपले 7 गडी गमावत आफ्रिकेच्या हातात सामना आणून ठेवला. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांची दाणादाण उडवली. फिलँडर, मॉर्नी मॉकेल व कॅगिसो रबाडा यांनी भारतीय फलंदाजांना खेळपट्टीवर टिकू दिले नाही. अनुभवी डेल स्टेन गोलंदाजी करत असता तर भारताची अवस्था आणखी किती बिकट झाली असती, याची कल्पनाच न केलेली बरी. बर्‍यापैकी सुरुवात करुन दिल्यानंतर सलामीवीर शिखर धवन आणि मुरली विजय हे माघारी परतले. त्यानंतर भरवशाचा चेतेश्‍वर पुजाराही 4 धावा काढून माघारी परतला. विराट कोहलीने रोहित शर्मासोबत छोटी भागीदारी रचत भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोहली (28 धावा) माघारी परतल्यानंतर भारताचा डाव पुन्हा कोलमडला. पहिल्या डावात 93 डावांची खेळी करणारा हार्दिक पांड्याही दुसर्‍या डावात फारशी चमक दाखवू शकला नाही. अश्‍विनने 37 धावांची तर भुवीने 13 धावांची खेळी केली. या दोघांनी 49 धावांची भागीदारी करुन थोडा प्रतिकार केला. मात्र, संघाची धावसंख्या 131 असताना अश्‍विन बाद झाला. त्यानंतर भारताचा दुसरा डाव 135 धावांवर संपुष्टात आला. फिलँडरने दुसर्‍या डावात 42 धावांमध्ये 6 बळी घेतले. मॉकेंल आणि रबाडा यांनी प्रत्येकी दोन बळी घेऊन त्याला चांगली साथ दिली. या विजयासह
दक्षिण आफ्रिकेने तीन कसोटींच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील दुसरी कसोटी येत्या शनिवारपासून सुरु होत आहे.
तत्पूर्वी, भारतीय वेगवान गोलंदाजांच्या प्रभावी मार्‍यामुळे दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव अवघ्या 130 धावांत आटोपला. भुवनेश्‍वरकुमार (33 धावांत 2 बळी), जसप्रीत बूमराह (39 धावांत 3 बळी), मोहम्मद शमी (28 धावांत 3 बळी) आणि हार्दिक पांड्या (27 धावांत 2 बळी) यांनी अचूक मारा केल्याने दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव गडगडला. एबी डीव्हिलयर्सने यजमानांकडून सर्वाधिक 35 धावा केल्या. कालच्या 2 बाद 65 या धावसंख्येवरून पुढे खेळताना दक्षिण आफ्रिकेने अवघ्या 65 धावांत उर्वरित 8 फलंदाज गमावले. या सामन्याचा तिसरा दिवस पावसामुळे वाया गेला होता. त्यामुळे भारताचा पराभव एक दिवस टळला, असेच म्हणावे लागेल. दक्षिण आफ्रिका दौर्‍यात कसोटी मालिकेपूर्वी एकही सराव सामना न खेळण्याचा निर्णय बीसीसीआयने संघ व्यवस्थापनाच्या मागणीवरून घेतला
होता. या निर्णयाचा फटका भारतीय
संघाला बसला आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: