Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
गमेवाडी येथे बिबट्याची मादी मृतावस्थेत आढळली
ऐक्य समूह
Tuesday, January 09, 2018 AT 11:30 AM (IST)
Tags: re3
5कराड, दि. 8 : गमेवाडी, ता. कराड येथील खमताळ नावाच्या शिवारात सोमवारी सकाळी अंदाजे चार वर्षे वयाची बिबट्याची मादी मृतावस्थेत आढळली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बिबट्याच्या मृत्यूचा पंचनामा केला. ही मादी गरोदर असल्याचेही वन विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.
गमेवाडीतील खमताळ नावाच्याशिवारात दीपक रघुनाथ जाधव यांच्या शेतात सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास शेतकरी गोविंद जाधव हे जनावरांना चारा आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी उसाच्या सरीत बिबट्या मृतावस्थेत पडल्याचे दिसले. सुरुवातील ते घाबरले. त्यातून सावरत त्यांनी याबाबतची माहिती पोलीस पाटील चंद्रकांत जाधव यांना दिली. जाधव यांनी वन विभाग व पोलीस ठाण्यात माहिती दिल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक अशोक भापकर, हवालदार संग्रामसिंह फडतरे, धीरज पारडे, वनरक्षक बी. ए. माने, वनपाल ए. आर. येळवे, शिबे हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. वनाधिकार्‍यांनी बिबट्याची पाहणी केल्यावर ती मादी असल्याचे आणि ती गरोदर असल्याचे लक्षात आले. डॉ. पाटील यांनी शवविच्छेदन केले असता मादीला हनुवटीजवळ डाव्या बाजूला  सर्पदंश झाल्याचे आढळले. घोणस या विषारी सापाच्या दंशामुळे या मादीचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. शरीरात सगळीकडे रक्तस्राव झाला होता. पोटात मोर मारून खाल्ल्याचे आढळले. साधारण आदल्या रात्री मादीचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता डॉ. पाटील यांनी व्यक्त केली. घटनास्थळी वनक्षेत्रपाल बाबूराव शिंदे, वन्यजीव अभ्यासक रोहन भाटे व नाना खामकर उपस्थित होते.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: