Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सुरुची राडा प्रकरणात खा. उदयनराजेंसह 33 जणांविरोधात आरोपपत्र दाखल
ऐक्य समूह
Wednesday, January 10, 2018 AT 11:30 AM (IST)
Tags: lo1
अ‍ॅड. विक्रम पवार यांच्या फिर्यादीचा तपास पूर्ण
5सातारा, दि. 9 :  सुरुची राडा प्रकरणात आ.श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे समर्थक अ‍ॅड. विक्रम पवार यांनी दाखल केलेल्या फिर्यादीचा तपास शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक चंद्रकांत बेदरे यांनी पूर्ण केला आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर मंगळवारी त्यांनी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्यासह 33 जणांविरोधातील सुमारे 500 पानांचे दोषारोपपत्र जिल्हा न्यायालयात सादर केले.
याबाबत अधिक माहिती अशी, आनेवाडी टोलनाका हस्तांतरणाच्या कारणावरुन दि. 5 ऑक्टोबर रोजी खा. उदयनराजे आणि आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह त्यांच्या समर्थकांमध्ये सुरुचीवर राडा झाला होता. हा राडा होण्यापूर्वी शासकीय विश्रामगृहात असणार्‍या आ. शिवेंद्रसिंहराजे यांना पोलिसांनी समर्थकांसमवेत सुरुची बंगला येथे जाण्यास सांगितले होते. आ. शिवेंद्रसिंहराजे पोलिसांच्या झालेल्या चर्चेनंतर सुरुचीकडे रवाना झाले. ते सुरुची येथे पोहोचल्यानंतर काही वेळाने शासकीय विश्रामगृह येथून अ‍ॅड. विक्रम पवार हे गाडीतून सुरुची बंगला येथे निघाले होते. त्यावेळी तेथे खा. उदयनराजे आले. अ‍ॅड. विक्रम पवार त्यांना दिसले. त्यानंतर खा. उदयनराजे यांनी अ‍ॅड. पवार यांचा पाठलाग केला. पाठलाग करणार्‍या खा. उदयनराजेंनी अ‍ॅड. पवार यांना जीवे मारण्याची धमकी देत गाडी थांबवण्यास सांगितले. पाठलाग चुकवत अ‍ॅड. विक्रम पवार हे सुरुची बंगला येथे आले. त्यांच्या पाठोपाठ खा. उदयनराजे हे तेथे समर्थकांसमवेत आले.   
सुरुची बंगल्यात घुसण्याचा प्रयत्न करणार्‍या  खा. उदयनराजे व समर्थकांना पोलिसांनी अडवले. या ठिकाणी आमदार आणि खासदार समर्थकांत जोरदार राडा झाला. यावेळी अज्ञातांनी सुरुची बंगला परिसरात गोळीबार केला. याप्रकरणी अ‍ॅड. विक्रम पवार यांनी खा. उदयनराजे यांच्यासह इतरांच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली होती.
या गुन्ह्यात पोलीस निरीक्षक बेदरे यांनी केला. गुन्ह्यात बाळू ढेकणे, इम्तियाज बागवान, किरण कुर्‍हाडे, केदार राजेशिर्के यांच्यासह काही जणांना अटक करण्यात आली आहे.  गुन्ह्याचा तपास केल्यानंतर खा. उदयनराजे यांच्यासह सनी भोसले, अजिंक्य मोहिते, इम्तियाज बागवान, केदार राजेशिर्के, बाळू ढेकणे यांच्याविरोधात केलेले सुमारे 500 पानांचे दोषारोपपत्र जिल्हा न्यायालयात सादर करण्यात आले.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: