Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
डोकलाम भागात सैन्यकपातीवर चीनचे मौन
ऐक्य समूह
Wednesday, January 10, 2018 AT 11:27 AM (IST)
Tags: mn2
जनरल रावत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया नाही
  5बीजिंग, दि. 9 (वृत्तसंस्था) :डोकलाम येथील संघर्षानंतर चीनने तेथे वाढवलेल्या सैनिकांची संख्या आता कमी केल्याचे वक्तव्य भारताचे लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी सोमवारी केले होते. मात्र, या वक्तव्यावर चीनने मौन बाळगले आहे. या संदर्भात विचारलेल्या प्रश्‍नावर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते ल्यू कँग यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, डोकलामधील पीएलएचे सैनिक आपल्या सार्वभौम अधिकारांचा वापर करत असल्याचे ते म्हणाले.
अरुणाचल प्रदेशातील तुतिंग भागात चीनच्या पीएलएच्या सैनिकांनी एक किलोमीटरपर्यंत घुसखोरी करत रस्ते बांधणीचा प्रयत्न केला होता. मात्र, इंडो-तिबेट पोलीस दलाच्या जवानांनी हाप्रयत्न उधळून लावताना चीनचीबांधकामाची यंत्रसामग्री जप्त केली होती. त्यामुळे डोकलाम-नंतर दोन्ही देशांमध्ये पुन्हाएकदा जोरदार संघर्ष होण्याचीशक्यता होती. 
मात्र, या मुद्द्यावर तोडगा काढण्यात आला असून चीनचे सैनिक आपल्या भागात माघारी गेले आहेत. त्यांची यंत्रसामग्रीही भारतीय जवानांनी परत केली आहे, असे लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. त्याचबरोबर गेल्या वर्षी दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये डोकलाम येथे झालेल्या संघर्षानंतर चीनने त्या भागात वाढवलेली सैनिकांची संख्याही कमी केल्याचे रावत यांनी सांगितले होते. या संदर्भात प्रश्‍न विचारला असता चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते ल्यू कँग यांनी थेट उत्तर दिले नाही. डोंगलांग (डोकलाम) हा भाग चीनच्या मालकीचा असून तो सध्या चीनच्या पूर्ण अधिपत्याखाली आहे. त्यामुळे या संदर्भात वादाचा मुद्दा असूच शकत नाही. डोंगलांग भागात तळ ठोकून असलेले आणि त्या भागात गस्त घालत असलेले चिनी सैनिक आपल्या सार्वभौम अधिकारांचे पालन करत आहेत. चीनच्या सार्वभौम सीमेचे रक्षण करत आहेत, अशी प्रतिक्रिया ल्यू कँग यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर अरुणाचल प्रदेशातील तुतिंग भागात भारतीय हद्दीत रस्तेबांधणी करण्याच्या चीनच्या योजनेसंदर्भात दोन्ही देशांनी चर्चेतून तोडगा काढल्याच्या रावत यांच्या वक्तव्यावरही कँग यांनी थेट प्रतिक्रिया दिली नाही. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात चीनच्या पीएलएने असा प्रयत्न केला होता. अरुणाचल प्रदेश हा दक्षिण तिबेटचा भाग असून त्यावर आपला अधिकार असल्याचा चीनचा दावा आहे. या दाव्याचा कँग यांनी पुनरुच्चार केला. या संदर्भातील प्रश्‍नांना माझ्या सहकार्‍यांनी अनेकदा उत्तर दिले आहे. भारत-चीन यांच्यातील पूर्वेकडील सीमेबाबत मोठा वाद आहे, असा पुनरुच्चार करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
रस्तेबांधणीबाबत आम्ही सहमतीने तोडगा काढला असला तरी त्यापूर्वी दोन्ही देशांनी सीमेवर शांतता आणि स्थैर्य राखणे आवश्यक आहे. दोन्ही देशांमधील सर्व वाद आधीच स्थापित असलेल्या यंत्रणेच्या माध्यमातून योग्य पद्धतीने सोडवले गेले पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: