Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
‘आधार’ सुरक्षेसाठी आता ‘व्हर्च्युअल आयडी’
ऐक्य समूह
Thursday, January 11, 2018 AT 11:08 AM (IST)
Tags: na2
‘यूआयडीएआय’ची नवी संकल्पना; 1 जूनपासून बंधनकारक
5नवी दिल्ली, दि. 10 (वृत्तसंस्था) : ‘आधार’ची माहिती चोरली जात असल्याने आधारच्या विश्‍वासार्हतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. ही बाब ‘युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया’ने ‘यूआयडीएएआय’ने गांभीर्याने घेतली असून आधारची माहिती अधिक सुरक्षित करण्यासाठी 12 अंकी आधारक्रमांकाऐवजी 16 अंकी ‘व्हर्च्युअल आयडी’ (आभासी ओळख) संकल्पना आणली आहे. याद्वारे प्रत्येक आधारकार्डचा ‘व्हर्च्युअल आयडी’ तयार करता येणार असून तो बदलता राहणार आहे.
या संकल्पनेमुळे नागरिकांना त्यांचा 12 अंकी आधार क्रमांक कोठेही देण्याची गरज भासणार नाही तर 16 अंकी ‘व्हर्च्युअल आयडी’ आणि त्यासोबत नाव, पत्ता आणि छायाचित्र द्यावे लागेल. ‘यूआयडीएआय’ने ‘लिमिटेड केवायसी’ची कल्पना आणली असून त्यानुसार ‘व्हर्च्युअल आयडी’ची संकल्पना मांडण्यात आली आहे. हा ‘व्हर्चुअल आयडी’ कोणत्याही अधिकृत संस्थेला (उदारहणार्थ मोबाईल कंपनी) सत्यता पडताळणीसाठी देणे पुरेसे ठरणार आहे. आधारकार्डधारकाला ‘यूआयडीएआय’च्या संकेत-स्थळावरून हा ‘व्हर्चुअल आयडी’ तयार करता येईल. हा क्रमांक सतत बदलता येईल. 
नवा ‘व्हर्चुअल आयडी’ तयार केल्यानंतर आधीचा ‘व्हर्चुअल आयडी’ आपोआप रद्द होईल.
‘यूआयडीएआय’च्या माहितीनुसार, ‘व्हर्च्युअल आयडी’ची ही सुविधा 1 जूनपासून अनिवार्य करण्यात येणार आहे. 1 मार्चपासून ही सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यानंतर 1 जूनपासून ती अनिवार्य करण्यात येणार आहे. 1 जूनपासून सर्वच एजन्सीज्ना ही संकल्पना राबविण्यासाठी सोय करावी लागणार आहे. त्यानंतर कोणतीही एजन्सी ‘व्हर्च्युअल आयडी’ स्वीकारण्यास नकार देऊ शकणार नाही.
‘यूआयडीएआय’च्या माहितीनुसार, हे एक प्रकारचे मर्यादित ‘केवायसी’ असेल. त्यामुळे संबंधित एजन्सीज्नादेखील आधारचा तपशील मिळवण्याची परवानगी नसेल. या एजन्सीज केवळ ‘व्हर्च्युअल आयडी’च्या आधारे सर्व काम पूर्ण करू शकेल. बँका, मोबाईल कंपन्या किंवा इतर योजनांसाठी आधार क्रमांक देण्याऐवजी हा ‘व्हर्च्युअल आयडी’ द्यावा लागेल. या क्रमांकाबरोबर संबंधित एजन्सीला ग्राहकाचे छायाचित्र, घराचा पत्ता आणि नाव यासारखी माहिती उपलब्ध होऊ शकेल. मात्र, ग्राहकाचा आधार क्रमांक मिळणार नाही. हा ‘व्हर्च्युअल आयडी’ काही सेकंदापुरताच वैध राहणार असून त्यानंतर नवा आयडी तयार करता येईल. नवा क्रमांक तयार झाल्यानंतर आधीचा क्रमांक तत्काळ रद्द होईल. त्यामुळे कोणालाही ग्राहकाच्या आधार क्रमांकापर्यंत पोहोचता येणार नाही किंवा या क्रमांकाची गरजही पडणार नाही. त्यामुळे आधारची माहिती पूर्णपणे सुरक्षित राहील, असा दावा ‘यूआयडीएआय’ने केला आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: