Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सरकारची नोटाबंदीनंतर आता नाणेबंदी?
ऐक्य समूह
Thursday, January 11, 2018 AT 11:17 AM (IST)
Tags: na3
टांकसाळींमध्ये नाण्यांचे उत्पादन थांबवले
5नवी दिल्ली, दि. 10 (वृत्तसंस्था) :भ्रष्टाचार, काळे धन आणि दहशतवाद्यांना मिळणारी आर्थिक रसद रोखण्याच्या उद्देशाने 2016 मध्ये नोटाबंदीसारखा धाडसी निर्णय घेणार्‍या केंद्रातील मोदी सरकारने आता देशात नाण्यांचे उत्पादन 8 जानेवारीपासून बंद केले आहे. त्यामुळे सरकारने नोटाबंदीनंतर आता ‘नाणेबंदी’ केल्याची चर्चा सुरू झाली आहे.
चार वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणार्‍या नरेंद्र मोदी सरकारने आर्थिक सुधारणा घडवून आणण्यासाठी नोटाबंदीसारखा धाडसी निर्णय घेतला. आता सरकारने नाणेबंदीचे पाऊल उचलल्याचे सूत्रांनी सांगितले. देशात नोएडा, मुंबई, कोलकाता आणि हैद्राबाद येथील टांकसाळींमध्ये नाण्यांचे उत्पादन केले जाते. मात्र, या चारही टांकसाळींमध्ये मंगळवारपासून नाण्यांचे उत्पादन बंद करण्यात आले आहे. नोटाबंदीनंतर मोठ्या प्रमाणावर नाणी चलनात आणण्यात आली होती. त्यामुळे नाण्यांचे प्रचंड उत्पादन करण्यात आल्याने रिझर्व्ह बँकेच्या गोदामांमध्ये नाण्यांचा भरमसाट अतिरिक्त साठा झाला आहे. त्याचबरोबर कोट्यवधी रुपयांची नाणी अद्याप रिझर्व्ह बँकेने घेतलेली नाहीत. त्यामुळे पुढील आदेश मिळेपर्यंत टांकसाळींमध्ये नाणी पाडण्याचे काम बंद करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतल्याचे सूत्रांनी सांगितलं. मात्र, यावर रिझर्व्ह बँकेच्या प्रवक्त्याने प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. याबाबत टांकसाळ विभागाचे अधिकारी प्रतिक्रिया देऊ शकतील, असे या प्रवक्त्याने सांगितले. केंद्र सरकारने नाण्यांचे उत्पादन थांबवले असले तरी त्याचा परिणाम सर्वसामान्यांवर होणार नाही.  
रिझर्व्ह बँकेकडे मुबलक प्रमाणात नाण्यांचा साठा आहे.  त्यामुळे बाजारात नाण्यांचा तुटवडा भासणार नाही, असे त्याने नमूद केले.
सध्या 250 कोटी नाणी तयार असून ती टांकसाळींमध्ये पडून आहेत. सध्या 1, 2, 5 आणि 10 रुपयांची नाणी चलनात आहेत. काही दिवसांपूर्वी आलेल्या 10 रुपयांच्या नाण्यांचा वापरही दैनंदिन व्यवहारासाठी मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: