Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
डांभेवाडी येथे घरफोडीत अडीच लाखाचा ऐवज लंपास
ऐक्य समूह
Thursday, January 11, 2018 AT 11:18 AM (IST)
Tags: re2
5वडूज, दि. 10 :डांभेवाडी, ता. खटाव येथे मंगळवार, दि. 9 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास संजीवनी केदारी बागल यांच्या बंद घराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी मुद्देमालासकट सुमारे 2 लाख 55 हजारांचा ऐवज लंपास केल्याची नोंद वडूज पोलीस ठाण्यात झाली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी,  डांभेवाडी येथील संजीवनी केदारी बागल या सध्या मुंबई येथे त्यांच्या नातीचे ऑपरेशन असल्याने गेल्या होत्या. त्यांचा मावस दीर गोरख सावंत हा घराची व शेतीची देखभाल करण्यासाठी त्याच ठिकाणी वास्तव्यास असतो. मंगळवार, दि. 9 रोजी रात्री 9.30 च्या सुमारास घरास कुलूप लावून गोरख सावंत हा लगत असलेल्या जनावरांच्या गोठ्यात झोपण्यासाठी गेला. बुधवारी सकाळी 6 वाजता तो झोपेतून जागा झाला व घराकडे येऊन पाहिले तर घराचा कडी-कोयंडा तुटलेला दिसल्याने त्याने हा प्रकार मुंबई येथील संजीवनी बागल यांना फोनद्वारे कळविला. याची माहिती संजीवनी बागल यांनी वाकेश्‍वर येथील त्यांचा भाऊ योगेश तुपे यांना सांगितला. यावरून डांभेवाडी येथे जाऊन घराची पाहणी केली. कपाटाची तिजोरी उघडी दिसली. या घटनेची माहिती घेऊन योगेश तुपे यांनी वडूज पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. घटनास्थळावरून घरातील कपाटाच्या तिजोरीत ठेवलेली रोख रक्कम वीस हजार  रुपये व 2 लाख 35 हजाराचे सोन्या-चांदीचे दागिने चोरट्यांनी चोरून नेल्याची फिर्याद तुपे यांनी वडूज पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक धरणीधर कोळेकर तपास करीत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: