Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
इंदू मल्होत्रा होणार सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्याच थेट महिला न्यायाधीश?
ऐक्य समूह
Friday, January 12, 2018 AT 11:25 AM (IST)
Tags: na2
नवी दिल्ली, दि. 11 (वृत्तसंस्था) : सर्वोच्च न्यायाल-याच्या न्यायाधीशवृंदाने (कॉलेजि-अम) उत्तराखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश के. एम. जोसेफ आणि सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ इंदू मलहोत्रा यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस केली आहे. या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिल्यास इंदू मलहोत्रा या सर्वोच्च न्यायालयाच्या थेट न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आलेल्या देशातील पहिल्या महिला वकील ठरतील.
न्यायाधीशवृंदामध्ये सर-न्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यासह तीन ज्येष्ठ न्यायाधीशांचा समावेश आहे. या न्यायाधीशवृंदाने दोन नावांवर शिक्कामोर्तब केले आहे. विशेष म्हणजे न्या. एम. जोसेफ यांनी उच्च न्यायालयात असताना 21 एप्रिल 2016 रोजी उत्तराखंडमध्ये हरीश रावत यांचे सरकार हटवून राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा केंद्राचा निर्णय रद्दबातल ठरवला होता. त्यामुळे त्यांच्या नियुक्तीला केंद्र सरकारकडून विरोध होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मात्र, इंदू मलहोत्रा यांच्या नावाला मंजुरी मिळाली तर सर्वोच्च न्यायालयात न्या. आर. बानुमती यांच्यानंतर त्या दुसर्‍या महिला न्यायाधीश असतील. सध्या सर्वोच्च न्यायालयात 31 पैकी 25 न्यायाधीश कार्यरत आहेत. अजूनही सहा न्यायाधीशांच्या जागा रिक्त आहेत. त्यामध्ये बानुमती या एकमेव महिला न्यायाधीश आहेत. सर्वोच्च न्यायालयात आतापर्यंत केवळ सहा महिलांची न्यायाधीशपदी नियुक्ती झाली होती. एम. फातिमा बिवी या 1989 मध्ये सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या न्यायाधीश ठरल्या होत्या. त्यानंतर न्या. सुजाता व्ही. मनोहर, न्या. रुमा पाल, न्या. ग्यानसुधा मिश्रा व न्या. रंजना प्रकाश देसाई यांनी सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम पाहिले होते.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: