Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
भारत-पाक सुरक्षा सल्लागारांची थायलंडमध्ये दहशतवादावर चर्चा
ऐक्य समूह
Friday, January 12, 2018 AT 11:12 AM (IST)
Tags: na1
परराष्ट्र मंत्रालयाकडून अधिकृत दुजोरा
5नवी दिल्ली, दि. 11 (वृत्तसंस्था) : भारत आणि पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये 26 डिसेंबर रोजी बैठक झाल्याच्या वृत्ताला परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी दुजोरा दिला. मात्र, या चर्चेचा मुख्य रोख सीमाभागातील दहशतवादावर होता. द्विपक्षीय चर्चा आणि दहशतवाद एकत्र सुरू राहू शकत नाही, हे भारताचे सध्याचे धोरण आहे; परंतु ही चर्चा फक्त दहशतवादाच्या मुद्द्यापुरती केंद्रित राहिल्यास त्याला हरकत नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी सांगितले.
भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल आणि पाकिस्तानचे सुरक्षा  सल्लागार  नसीर  खान  जंजुआ  यांची   26 डिसेंबर रोजी बँकॉक येथे भेट झाल्याच्या वृत्ताला रवीशकुमार यांनी आज दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत दुजोरा दिला. याबाबतचे वृत्त आधीच प्रसारमाध्यमांमध्ये आले होते. मात्र, परराष्ट्र मंत्रालयाने त्याबाबत मौन पाळले होते. परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत आज सविस्तर भूमिका मांडली.
चर्चा आणि दहशतवाद एकत्रपणे चालू शकत नाहीत, असे आम्ही वारंवार सांगितले आहे; पण अशी काही माध्यमे आहेत ज्यांच्याद्वारे भारत आणि पाकिस्तानमधील चर्चा सुरू असते. सीमा सुरक्षा दल आणि पाकिस्तानी रेंजर्समध्ये चर्चा होत असते. त्याच पद्धतीने दोन्ही देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक झाली होती. दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाहीत, अशी भारताची भूमिका असली तरी दहशतवादाच्या मुद्द्यावर चर्चा पुढे जाऊ शकते, असे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी दोवाल आणि नसीर खान जंजुआ यांच्यात झालेल्या चर्चेवर प्रकाश टाकला. कुलभूषण जाधव यांच्या आई व पत्नीने त्यांची पाकिस्तानात भेट घेतल्याच्या दुसर्‍याच दिवशी दोन्ही देशांचे सुरक्षा सल्लागार एकमेकांना भेटले होते. या चर्चेत सीमेपलीकडून सुरू असलेल्या दहशतवादी कारवायांचा प्रश्‍न भारताकडून उपस्थित केला गेला. ही चर्चा केवळ दहशतवादाच्या मुद्द्यावरच केंद्रित राहिली. दहशतवादाच्या झळा संपूर्ण देशाला बसू नयेत, हे निश्‍चित करण्याला आमचे प्राधान्य असल्याचे रवीशकुमार यांनी सांगितले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: